रब्बी मका, गहू, हरभऱ्याच्या दरात वाढीची शक्यता

वायदे बाजार
वायदे बाजार

सध्या बाजारपेठेत आवकेची कमतरता आणि अति पावसामुळे होणाऱ्या नुकसानीमुळे सोयाबीन खेरीज इतर सर्व पिकांच्या किमती गेल्या सप्ताहात वाढल्या. जानेवारी २०२० मध्ये रब्बी मका, गहू व हरभरा पिकांचे भाव वाढतील. मुगाचेसुद्धा भाव वाढतील.  मात्र कापूस, खरीप मका, सोयाबीन व बासमती भात यांचे भाव कमी होण्याचा अंदाज आहे.  साधारणपणे ३० सप्टेंबर रोजी अधिकृतरीत्या मान्सूनचा हंगाम संपला. भारतात या वर्षी आत्तापर्यंत सरासरीपेक्षा १० टक्क्यांनी अधिक पाऊस झाला आहे. फक्त हरयाणा, उत्तर प्रदेश व बंगाल मध्ये पाऊस लक्षणीय कमी आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत त्याचा परतीचा प्रवास सुरू होईल. लांबलेल्या मान्सूनमुळे आवक अजून वाढत नाही; पिकांचे किती नुकसान झाले आहे, त्याचाही अंदाज येत नाही. सणामुळे मागणी वाढती आहे. यामुळे किंमती वाढत आहेत. बीएसईमध्ये गेल्या सोमवारपासून एरंडी बी, हरभरा व सोयबीन यांचे फ्युचर्स व्यवहार सुरू झाले. महाराष्ट्रातील अकोला येथे हरभऱ्यासाठी व अकोला, नांदेड आणि हिंगणघाट येथे सोयाबीनसाठी अधिकची डिलिवरी केंद्रे असतील. एनसीडीइएक्सला बीएसइ हा आता पर्याय उपलब्ध होत आहे.    गेल्या सप्ताहात एनसीडीइएक्समध्ये एरंडी बीच्या भावात बरीच खळबळ झाली. सात दिवसात एरंडीचे भाव प्रती क्विंटल रु. ५,८०० वरून रु. ४,२८० पर्यंत घसरले. यामुळे व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तसेच एनसीडीइएक्सला सुद्धा बरेच करार रद्द करावे लागले. आवकेच्या कमतरतेने व अति पावसामुळे होणाऱ्या नुकसानीच्या भयाने सोयाबीन खेरीज इतर सर्व पिकांच्या किमती गेल्या सप्ताहात वाढल्या. (आलेख १).  जानेवारी २०२० मध्ये रब्बी पिकांचे (रब्बी मका, गहू व हरभरा) भाव वाढतील. मुगाचे सुद्धा भाव वाढतील.  कापूस, खरीप मका, सोयाबीन व बासमती भात यांचे भाव कमी होतील. 

गेल्या सप्ताहातील एनसीडीइएक्स आणि एमसीएक्समधील किमतीतील चढउतार   सोयाबीन     सोयाबीन फ्युचर्स (नोव्हेंबर २०१९) किमती  सप्टेंबर महिन्यात वाढत होत्या (रु. ३,४८६ ते रु. ३,८२१). या सप्ताहात त्या १.२ टक्क्यांनी घसरून रु. ३,६८७ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३,९७० वर आल्या आहेत. सोयाबीन पेंडीची निर्यात मागणी कमी झाली आहे. नवीन वर्षासाठी हमी भाव रु. ३,७१० आहे. जानेवारी डिलिवरी साठी रु. ३,७६० भाव आहे.  नंतरच्या महिन्यांसाठी (फेब्रुवारी व मार्च २०२० डिलिवरीसाठी) तो अनुक्रमे रु. ३,७९७ व रु. ३,८३४ आहे.   हळद   हळदीच्या फ्युचर्स (नोव्हेंबर २०१९) किमती सप्टेंबरमध्ये उतरत होत्या. (रु. ६,९३८ ते रु. ६,१४०). या सप्ताहात त्या २.९ टक्क्यांनी वाढून रु. ६,१०० वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ६,१४४ वर  आल्या आहेत. जानेवारीच्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने ०.१ टक्क्यांनी कमी आहेत  (रु. ६,१४०). या वर्षी उत्पादन वाढलेले असेल. व्यापाऱ्यांकडील साठा पुरेसा आहे. स्थानिक व निर्यात मागणी मर्यादित आहे.   गहू   गव्हाच्या (नोव्हेंबर २०१९) किमती सप्टेंबर महिन्यात रु. २,०७५ व रु. २,१३३ या दरम्यान होत्या.  या सप्ताहात त्या ०.७ टक्क्यांनी वाढून रु. २,१२५ वर आल्या आहेत. स्पॉट (कोटा) किमती रु. २,०६१ वर  आल्या आहेत. जानेवारीच्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ७ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. २,२०५).   गवार बी   गवार बीच्या फ्युचर्स (नोव्हेंबर २०१९) किमती ऑगस्ट पाठोपाठ सप्टेंबर महिन्यातसुद्धा घसरत होत्या (रु. ४,२१२ ते रु. ३,९८३). या सप्ताहात त्या गेल्या सप्ताहाच्या तुलनेंत १.६ टक्क्यांनी वाढून रु. ३,९१५ वर आल्या  आहेत.  स्पॉट (जोधपूर) किमती रु. ३,९२९ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपुर) किमतींपेक्षा जानेवारी मधील फ्युचर्स किमती २.७ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,०३७). या वर्षी राजस्थानमध्ये चांगला पाऊस झाला आहे. पुढील काही दिवस किमती घसरण्याचा संभव आहे.  हरभरा   हरभऱ्याच्या फ्युचर्स (नोव्हेंबर २०१९) किमती सप्टेंबर महिन्यात वाढत होत्या (रु. ४,०२५ ते रु. ४,३८६).  या सप्ताहात त्या २.९ टक्क्यांनी वाढून रु. ४,३२९ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,३११ वर आल्या  आहेत.  सध्याच्या स्पॉट (बिकानेर) किमतींपेक्षा जानेवारीमधील फ्युचर्स किमती २.९ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,४३५).  शासनाकडे पुरेसासाठा आहे.  मात्र ऑक्टोबर – नोव्हेंबरमध्ये वाढीव मागणीमुळे किमती वाढण्याची शक्यता आहे.  कापूस  एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (नोव्हेंबर २०१९) किमती सप्टेंबरमध्ये  रु. १९,०७० व रु. १९,५०० च्या दरम्यान होत्या. या सप्ताहात त्या रु. १९,०७० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. १९,७९९ वर आल्या आहेत.  जानेवारीच्या फ्युचर्स किमती रु. १९,१३० वर स्थिर आहेत. त्या सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ३.४ टक्क्यांनी कमी आहेत. आंतरराष्ट्रीय घटनांचा परिणामसुद्धा किमतींवर होत आहे. या वर्षी कापसाच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. किमतींत भाव वाढण्याची शक्यता कमी आहे.  मूग   मुगाच्या फ्युचर्स (नोव्हेंबर २०१९) किमती सप्टेंबर महिन्यात १८ तारखेपर्यंत घसरत होत्या (रु. ६,२७८ ते ५,९९३).  त्या नंतर त्या वाढू लागल्या. या सप्ताहात त्या रु. ६,१००  वर आल्या आहेत. स्पॉट (मेरता) किमती रु. ६,२३१ वर आल्या आहेत. नवीन मूग या महिन्यात बाजारात येऊ लागला आहे; पण अजून तो पुरेसा नाही. जानेवारीच्या फ्युचर्स किमती रु. ६,२७८ वर आल्या आहेत. मुगाचे हमी भाव रु. ७,०५० आहेत. गेल्या वर्षी ते रु. ६,९७५  होते.  आवक वाढेल तेव्हा भाव घसरण्याची शक्यता आहे.   बासमती तांदूळ   बासमती तांदळामध्ये अजून व्यवहार होत नाहीत. स्पॉट (कर्नाल) किमती रु. ३,९०० वर आल्या आहेत. 

मका (रब्बी) 

रब्बी मक्याच्या (नोव्हेंबर २०१९) किमती सप्टेंबर महिन्यात १३ तारखेपर्यंत उतरत होत्या (र. २,१८७ ते रु. २,०८९). त्यानंतर वाढत गेल्या. या सप्ताहात त्या १.१ टक्क्यांनी वाढून रु. २,१७५ वर आल्या आहेत.  स्पॉट किमती (गुलाबबाग) रु. २,१५९ वर आल्या आहेत. या वर्षीचा हमी भाव रु. १,७६० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,७०० होता). बाजारातील स्पॉट किमती सध्या हमी भावापेक्षा अधिक आहेत. डिसेंबर  डिलिवरीचे भाव रु. २,२०० आहेत. खरीप मक्यासाठी (सांगली) अजून व्यवहार होत नाहीत. डिसेंबर मधील भाव (रु. २,२१०) हमी भावापेक्षा अधिक आहेत.  या भावाला हेजिंग करण्यास वाव आहे.   (टीप ः सर्व किमती प्रती क्विंटल; कापसाची किमत प्रती १७० किलोची गाठी).    

- डॉ. अरुण प्र. कुलकर्णी ः arun.cqr@gmail.com  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com