शेतमाल विक्रीसाठी सर्वसमावेशक धोरण

storage, packing room
storage, packing room

जर्मनीमधील शेतमाल विक्री ही फिव्होजी मार्केटिंग फार्मस को ऑपरेटिव्ह सोसायटीमार्फत होते. सभासदांना सोसायटीमार्फत पीक उत्पादनवाढीसाठी लागणाऱ्या सर्व पायाभूत सुविधा योग्य दरामध्ये उपलब्ध करून दिल्या जातात. सोसायटीने स्वतःची विक्री केंद्रे सुरू केली आहेत. विक्रीचे सर्व व्यवहार ऑनलाइन होतात.

फिव्होजी मार्केटिंग फार्मस को-ऑपरेटिव्ह सोसायटी ही जर्मनीमधील शेतमाल विक्री करणारी मोठी सोसायटी आहे. सोसायटीची मोठी आर्थिक उलाढाल होते. ही सोसायटी मोठ्या प्रमाणात शतावरी, भाजीपाला, सफरचंद,पीच,  चेरी आणि द्राक्षांची विक्री करते. जर्मनीमधील  सहकारी संस्थांनी काही नियम केले आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांना उत्पादित फळे संबंधित केंद्रामार्फत विक्री करण्याचे बंधन आहे. परंतु वैयक्तिक पातळीवर शेतकऱ्यांना फळांच्या विक्रीतून दहा टक्के जास्त दर मिळत असेल तर त्यांना फळे विक्रीसाठी सोसायटीची परवानगी घ्यावी लागते. कोणत्या ठिकाणी दर चांगला मिळतो याची पाहणी करून फळांची विक्री केली जाते. प्रामुख्याने बाजारपेठ, मॉलमध्ये फळांची विक्री केली जाते. काही ठिकाणी सोसायटीने स्वतःची विक्री केंद्रे सुरू केली आहेत. विक्रीचे सर्व व्यवहार ऑनलाइन होतात. सोसायटीतर्फे सुविधा  सोसायटीमार्फत सभासदांना पीक उत्पादन वाढीसाठी लागणाऱ्या सर्व पायाभूत सुविधा योग्य दरामध्ये उपलब्ध करून दिल्या जातात. पिकाच्या गरजेनुसार खते, कीडनाशके, बियाणे, दर्जेदार उत्पादन मिळणेसाठी तांत्रिक सल्ला, नवीन विकसित झालेले तंत्र, फळांची विक्री होईपर्यंत  शीतगृहामध्ये साठवणीची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. विक्रीपूर्वी फळांची प्रतवारी केली जाते. प्रतवारीनुसार पॅकिंग करून बाजारपेठेत फळे पाठविली जातात. फळांच्या तोडणीपूर्वी बागेमध्ये पीक पाहणी केली जाते. योग्य गुणवत्तेच्या फळांची तोडणी केली जाते.  शेतीपासून ते विक्रीपर्यंत फळांसाठी शीतसाखळीची सोय केलेली आहे. त्यामुळे गुणवत्ता चांगली राहते.वेगवेगळ्या पिकांचा अभ्यास करण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतीवर शिवारफेरीचे आयोजन केले जाते. सोसायटी स्थापन होण्यापूर्वी  शेतकऱ्यांसमोर फळविक्रीची समस्या होती. त्यामुळे  लहान शेतकऱ्यांचे संघटन करून सोसायटी तयार झाली. या सोसायटीच्या माध्यमातून शेतमालाची विक्री केली जाते. द्राक्षाची विक्री प्रामुख्याने वाइन उत्पादक कंपन्यांना होते. दक्षिण जर्मनीमध्ये सफरचंदाची मोठी लागवड आहे.  सोसायटी शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाची काळजी घेते. संशोधन केंद्राच्या शिफारशीनुसारच खते आणि कीडनाशकांचा वापर केला जातो. काही शेतकऱ्यांनी स्वतःचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. युरोपीय संघ सोसायटीच्या सभासदांना लागवडीसाठी ५० टक्के अनुदान देते. यामध्ये पिकानुसार टक्केवारी कमी केली जाते. शेतकरी दर्जेदार उत्पादनावर भर देतात. काही वेळा नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे मोठे नुकसान होते. येथे गारपिटीसाठी विमा सेवा उपलब्ध आहे.  शेतकऱ्यांना एक महिन्याच्या आत नुकसान भरपाई मिळते. शासनाचे सहकार्य, शेतमालासाठी प्रक्रियेच्या सुविधा आणि सोसायटीचे सहकार्य यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळालेला आहे.   सर्वसमावेशक शेती धोरण  १९६०  च्या दशकापासून शेती धोरण हे युरोपीय संघामध्ये बनविले जाते. सर्व कृषी कायदे आणि नियम वाटाघाटी करून तयार केले जातात. या वाटाघाटींचा मुख्य उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्यांना चांगला दर मिळवून देणे आणि ग्राहकांना योग्य दरात शेतमाल मिळवून देणे हा आहे.  यासाठी युरोपीय संघातर्फे सर्वसमावेशक शेती धोरण, अनुदान आणि  निर्यात अनुदान योजना तयार केली जाते.  शेतकरीदेखील नियमांचे पालन करून दर्जेदार उत्पादन घेतात. 

धोरणाची वैशिष्ट्ये 

  •  युरोपीय संघातर्फे प्रति वर्षी कृषी क्षेत्रासाठी ६० अब्ज युरो अनुदान दिले जाते. अनुदानाचे प्रमाण युरोपीय संघाच्या सकल वार्षिक उत्पन्नाच्या २५ टक्के आहे .
  • युरोपीय संघाच्या एकूण वार्षिक अर्थ संकल्पात याचा वाटा सर्वाधिक आहे. एकूण वार्षिक खर्चाच्या ४० टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाण आहे.
  • शेतकऱ्यांना थेट अनुदान प्रतिहेक्टरी किंवा प्रति जनावर या प्रमाणात दिले जाते. ग्रामीण विकास योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी अनुदान दिले जाते. बाजार उपाय योजनेअंतर्गत बाजारातील कृषी उत्पादनाच्या दरांमध्ये होणारी चढ-उतार नियंत्रित करण्यासाठी अनुदान दिले जाते.
  • थेट अनुदान योजनेचा युरोपीय संघाच्या एकूण वार्षिक कृषी अर्थ संकल्पात  दोनतृतीयांश  वाटा आहे. सध्याच्या स्थितीत थेट अनुदानाचा प्रति हेक्टरी २५० युरो खर्च होतो.परंतु प्रति हेक्टरी अनुदान सर्व पिके, शेतकरी आणि  राज्यात समान पद्धतीने दिले जात नाही. 
  • लहान तसेच तरुण शेतकऱ्यांना जास्त अनुदान मिळते. शाश्वत उत्पादनास अशाश्वत उत्पादनापेक्षा जास्त अनुदान दिले जाते. लागवडीखाली कमी क्षेत्र असणाऱ्या पिकांना जादा अनुदान दिले जाते.
  • ग्रामीण विकास योजना

  • ग्रामीण भागांमध्ये कृषी उत्पादनाची स्पर्धा वाढवणे, सामाजिक सहभाग प्रस्थापित करणे, अन्न साखळी विकसित करणे, उपलब्ध साधनांचा जास्तीत जास्त उपयोग करून घेणे, पर्यावरण रक्षण हा योजनेचा उद्देश आहे.
  • पाण्याचा किफायतशीर वापर, जमिनीची धूप कमी करणे, जैवविविधता वाढवणे, कर्ब संवर्धनासाठी ही योजना फायदेशीर आहे.  
  • सद्यःस्थितीत युरोपीय संघाच्या अनुदानापैकी २५  ते ३० टक्के रक्कम ग्रामीण विकासासाठी वापरली जाते.
  • बाजार उपाय योजना 

  • ही योजना बाजारातील कृषी उत्पादनाच्या अत्यंत कमी दरावर नियंत्रणासाठी आहे. 
  •  सन १९९२  पर्यंत या योजनेसाठी सर्वसमावेशक शेती धोरणासाठी सर्वांत जास्त हिस्सा वापरला जात होता. त्यानंतर युरोपमधील कृषी बाजारपेठेत जगातील इतर देशांची निर्यात मोठ्या प्रमाणात होवू लागल्याने टप्प्याटप्प्याने हे अनुदान कमी करण्यात आले.
  • सध्यस्थितीत अनुदान फक्त बाजारदरातील तात्पुरत्या चढ-उतारासाठी दिले जाते.
  • युरोपीय संघ अनुदानाच्या सुमारे ५ टक्के रक्कम या योजनेसाठी खर्च होते.
  • - डॉ. राजेंद्र सरकाळे, ९८५०५८६२२० (लेखक सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com