दमा, खोकल्यावर गुणकारी घोळ

घोळाची फुले
घोळाची फुले
  • स्थानिक नाव    :     घोळ, भुईघोळ, मोठी घोळ, घोळू
  •    शास्त्रीय नाव    :     Portulaca                     oleraceae       
  •    इंग्रजी नाव    :     Garden purselane, Common purselane, Little hogweed,  Pigweed, Purslane 
  •    संस्कृत नाव    :     ब्रिहालोनी, लोनमळा,  लोनिका   
  •    कुळ    :     Portulacaceae       
  •    उपयोगी भाग    :     कोवळी पान        
  •    उपलब्धीचा काळ    :     कोवळी पान व फांद्या, जुलै- ऑगस्ट, 
  •    वर्षभर झाडाचा प्रकार    :     पसरट झुडूप       
  •    अभिवृद्धी     :     बिया        
  •    वापर    :     भाजी 
  • आढळ     घोळ ही रोपवर्गीय वनस्पती ओलसर, पाणथळ जागेत, शेतात व बागेत तण म्हणून सर्वत्र वाढते. तसेच जमिनीवर पसरत वाढते. सगळ्याच ठिकाणी घोळ ही वनस्पती शेतात, परसबागेत, रस्ताच्या कडेला, पाण्याच्या ठिकाणी उगवलेली दिसते.   

    वनस्पतीचे वर्णन 

  •    घोळ ही वनस्पती मुख्यत्वेकरून शेतात तसेच परसबागेत इतर झाडासोबत वाढणारे वर्षायू गवत असून ह्या वनस्पतीचे खोड नाजूक, कोवळे, रसदार व जाडसर असून फिक्कट लालसर गुलाबी रंगाचे असते. फांद्या अनेक असून त्या जमिनीला समांतर ३० ते ४० सें. मी. लांब पसरत जाणाऱ्या असतात.
  •    पाने साधी, रसदार व जाडसर, लंबवर्तुळाकार, एका आड एक येतात. पाने खोडाच्या पेरापेरात तसेच फांद्याच्या टोकावर समोरासमोर येणारी असून हिरवट गुलाबी रंगाची, देठविरहित, टोकाशी गोलाकार व १ ते ३ सें. मी. लांब ०.३ ते १.५ सें. मी. रुंद असतात.
  •    पानाच्या कडा लाल रंगाच्या असतात. फुले पिवळी, ०.५ ते १ सें. मी. व्यास असणारी, लहान द्विलिंगी व नियमित फांद्याच्या टोकावर तसेच पानाच्या बेचक्यात एक एक किंवा गुच्छात येतात.
  •    फळे लहान ०.५ ते ०.७ सें. मी लांब शंखाकृती आकाराची. बिया अनेक, लहान, काळ्या रंगाच्या गोलाकार, खरबरीत असतात.
  •    जमिनीत ओलावा असल्यास घोळ ही वनस्पती वर्षभरही वाढू शकते. साधारण ऑगस्ट- सप्टेंबरमध्ये फुले येऊन नोव्हेंबरपर्यत फळे व बिया तयार होतात. तयार झालेल्या बिया अपोआप खाली पडून थोडाश्या ओल्याव्यावरही रुजून नवीन रोपे तयार होतात. 
  • औषधी गुणधर्म 

  •    घोळचे पूर्ण झाड औषधात वापरले जाते. पाने व रसदार फांद्यापासून बनवलेला काढा (२० ते ३० मिलीपर्यंत) अडकलेले लघवी मोकळी करण्यासाठी दिला जातो. 
  •    पूर्ण वाळलेल्या झाडापासून बनवलेली पावडर २ ते ३ चमचे काविळीमध्ये रिकामी पोटी १ आठवड्यापर्यंत देतात. 
  •    घोळाच्या भाजीत लोहाचे प्रमाण जास्त असते म्हणून दमा, खोकल्यात ही भाजी खाण्यासाठी देतात. 
  •     टीप ः तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच उपचारासाठी घोळ वनस्पतीचा वापर करावा.

    पाककृती कोवळ्या पानाची पातळ भाजी साहित्य ः २ घोळ भाजीच्या जुड्या, २-३ बारीक चिरलेले कांदे, ३ ते ४ चमचे हरभरा डाळीचे पीठ, २ ते ३ चमचे लसूण-हिरवी मिरची पेस्ट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धणेपूड, चवीपुरती चिंच किंवा आमसूल, फोडणीसाठी जिरे, मोहरी, हिंग, तेल, मीठ चवीप्रमाणे, थोडा गूळ, आवश्यकतेप्रमाणे शेंगदाणे.   कृती ः प्रथम घोळ भाजीची कोवळी पाने व देठे खुडून, पाण्याने स्वच्छ धुऊन व बारीक चिरून घ्यावीत. फोडणीसाठी कढईत तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी, लसूण, हिंगाची फोडणी करून त्यात उभा चिरलेला कांदा मंद आचेवर लालसर शिजवून घ्यावा, त्यात लसूण मिरचीची पेस्ट व शेंगदाणे मिसळावे. नंतर बारीक चिरलेली भाजी चांगली परतून घ्यावी. त्यात हरभरा डाळीचे पीठ थोड्या पाण्यात कालवून थोडे थोडे करून भाजीत मिसळावे. हे पीठ घालताना सारखे ढवळत राहावे. चवीप्रमाणे चिंचेचा कोळ किंवा आमसूल व गूळ मिसळून भाजी चांगली उकळवून घ्यावी. चवीप्रमाणे मीठ मिसळावे. टीप : काही भागात ही भाजी त्याच्या फुलासोबत बनविण्याची पद्धत आहे. फुलामुळे भाजी अतिशय रुचकर लागते असे समजले जाते. तसेच तूर, मूग व मसूरच्या डाळीसोबतही घोळाची पाने शिजवून पातळ भाजी केली जाते.

    - ashwinichothe7@gmail.com (क. का. वाघ उद्यानविद्या महाविद्यालय, नाशिक)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com