सूज, अतिसारावर मायाळू उपयोगी

मायाळूचा वेल
मायाळूचा वेल

स्थानिक नाव     : मायाळू, भजीचा वेल          शास्त्रीय नाव     : Basella alba          इंग्रजी नाव     : Ceylon spinach, Indian spinach, Malabar Spinach, Red vine, spinach, Vine                         spinach, climbing spinach, Creeping spinach,  Buffalo spinach           संस्कृत नाव     : उपोदिका, कलंबी, पूतिका            कुळ      : Basellaceae         उपयोगी भाग     : कोवळी पान, कोवळी देठ             उपलब्धीचा काळ : वर्षभर, वापर : भाजी            झाडाचा प्रकार     : वेल, अभिवृद्धी : बिया          

आढळ :  परसबाग, अंगण तसेच बागेत वर्षभर येणारी वेलवर्गीय वनस्पती असून काही ठिकाणी ती शोभेचा वेल म्हणून वाढवली जाते. महाराष्ट्रात सगळीकडे याचे वेल परसबागेत लावलेले दिसतात.  वनस्पतीची ओळख 

  • मायाळू ही बहुवर्षायू, वेलवर्गीय वनस्पती आहे. वेलाचे खोड अतिशय नाजूक, हिरवे किंवा गुलाबी रंगाचे व १.५ ते २ सें.मी व्यासाचे असून ते आधाराने वाढते. 
  • पाने साधी, गडद हिरव्या रंगाची, एक आड एक येणारी, जाडसर असून साधारण ५ ते १५ सें.मी. लांब व ३ ते ७ सें. मी. रुंद लंबगोलाकार असतात. पाने वरून हिरवी तर खालून गुलाबी छटा असणारी, पानाचे देठ ०.५ ते २ सें. मी. लांब. फुले पांढरी किंवा गडद गुलाबी रंगाची, लहान, देठरहित, पानाच्या बेचक्यातून येणाऱ्या ५ ते १४  सें. मी. लांब असतात. खाली लोंबकळणाऱ्या पुष्पमंजिरीत फुले येतात.
  • फळे गोल, १ सें.मी. लांब, लहान, लाल किंवा पांढऱ्या रंगाची व पिकल्यावर काळी पडणारी. बी एक असून कठीण कवचाची असते. फुले साधारण डिसेंबर-जानेवारीत येतात, तर फळे फेब्रुवारी-मार्चमध्ये तसेच वर्षभरही येतात.
  •    औषधी उपयोग  

  •  भजीच्या वेलाचे पाने, मूळ, देठ, फुले व फळे औषधात वापरले जातात. 
  •  मूळ तुरट असून ते अतिसारामध्ये शिजवून खाण्यास दिले जाते. मुळापासून बनवलेली पेस्ट सूज आलेल्या भागावर लावली जाते.
  •  पाने आणि देठापासून बनवलेली भाजी पाचक म्हणून खाण्यास देतात. पानाचा रस जुलाब झाल्यावर देतात. 
  •  पानापासून बनवलेली पेस्ट बाह्य भागात आलेल्या फोडावर लावतात. वेलाचा काढा बाळंतिणीला वेदना कमी करण्यासाठी देतात. 
  •  फळांपासून बनवलेला लाल रस डोळ्यातील बुबुळाचे दुखणे कमी करण्यासाठी टाकतात. 
  • टीप ः तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार करावेत.
  • कोवळ्या पाने, देठाची भाजी   साहित्य : २ भजीच्या कोवळ्या पानाच्या जुड्या, २-३ बारीक चिरलेले कांदे, १-२ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, ३-४ चिरलेल्या लसूण पाकळ्या, फोडणीसाठी जिरे, हिंग, मोहरी, तेल, चवीपुरते मीठ.   कृती ः प्रथम भजीच्या वेलाची पाने कोवळ्या देठासहीत स्वच्छ धुवून बारीक कापून घ्यावे. कढईत तेल गरम करून जिरे-मोहरी, हिंग टाकून बारीक चिरलेला कांदा लालसर परतून घ्यावा. नंतर लसूण आणि बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या व भजीचा वेलाचे कापलेले पाने टाकून चांगले परतून घ्यावे. भाजी ५-१० मिनिटे झाकण ठेऊन शिजवून घ्यावी. चवीप्रमाणे मीठ घालावे. 

    पाककृती  कोवळ्या पानांची भजी   साहित्य ः १० ते १५ भजीच्या वेलाची पाने, १ वाटी चना डाळीचे पीठ, २ चमचे तांदळाचे पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर, १ छोटा बारीक चिरलेला कांदा, १-२ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, चिमूटभर हळद, बारीक चिरलेली कोंथिबीर, चिमूटभर ओवा, तळण्यासाठी तेल, चवीपुरते मीठ.   कृती ः  प्रथम भजीच्या वेलाची पाने कोवळ्या देठापासून कापून स्वच्छ धुवून घ्यावीत. एका पातेल्यात चना डाळीचे व तांदूळ किंवा कॉर्नफ्लोवरचे पीठ टाकून सैलसर कालवून घ्यावे. त्यात वरील सर्व साहित्य मिसळून पुन्हा नीट कालवून त्यात चवीप्रमाणे मीठ घालावे. नंतर एक एक पान बुडवून कढईत तेल गरम करून त्यात सोडावे व सोनेरी रंगात तळून घ्यावे.   कोवळी पाने, देठाची पातळ भाजी  साहित्य : १ भजीच्या कोवळ्या पानाची जुडी, १ बारीक चिरलेला कांदा, १-२ चमचे आले- लसूण पेस्ट, १-२ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी तुरीची डाळ, फोडणीसाठी जिरे, हिंग, कडीपत्ता, मोहरी, तेल, चवीपुरते मीठ, चिंच, गूळ, सजावटीसाठी कोंथिबीर.   कृती ः  प्रथम भजीच्या वेलाची पाने कोवळ्या देठासहीत स्वच्छ धुवून बारीक कापून घ्यावे. कुकरमध्ये धुतलेली डाळ, चिंच व भजीच्या वेलाची पाने २ शिट्या काढून शिजवून घ्यावी. कढईत तेल गरम करून जिरे-मोहरी, हिंग, कडीपत्ता टाकून बारीक चिरलेला कांदा लालसर परतून घ्यावा. नंतर त्यात आल-लसूण पेस्ट बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या व शिजवलेल्या डाळीचे घोटलेले मिश्रण घालून चांगले हलवून घ्यावे. चवीप्रमाणे गूळ व मीठ मिसळावे. भाजीला  ५-१०  मिनिटे उकळी येऊन द्यावी. वरून बारीक चिरलेली कोंथिबीर घालावी.

    इमेल - ashwinichothe7@gmail.com,

    (क. का. वाघ उद्यानविद्या महाविद्यालय, नाशिक)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com