मलेरिया, संधिवात, त्वचारोगावर फांद उपयुक्त

फांदचे झुडूप
फांदचे झुडूप
  • स्थानिक नाव     ः फांद, फांजी, फांज, सांजवेल   
  • शास्त्रीय नाव     ः Rivea hypocrateriformis
  • कूळ     ः Convolvulaceae       
  • इंग्रजी नाव     ः Midnapore Creeper,  Common Night Glory
  • संस्कृत नाव     ः फांग       
  • उपयोगी भाग     ः कोवळी पाने        
  • उपलब्धीचा काळ     ः जुलै-सप्टेंबर    
  • झाडाचा प्रकार     ः झुडूपवर्गीय वेली   
  • अभिवृद्धी     ः बिया        
  • वापर     ः भाजी, मुटकुळे
  • आढळ  भारतातील काही ठरावीक जंगलामध्येच ही वनस्पती दिसते. ही वनस्पती नदीकिनारी, रस्त्याच्या कडेला, शेताच्या बांधावर तसेच माळरानावर आढळते. कोकण, नगर, नांदेड, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात ही वनस्पती आढळून येते. वनस्पतीची ओळख  

  • झुडूपवर्गीय वेल वनस्पती असून, याचे खोड गोलाकार, मऊ, करड्या रंगाचे तसेच अनेक फांद्यांयुक्त असते. 
  • फांद्या इतर झाडावर पसरणाऱ्या तसेच सर्व भागावर नाजूक, मऊसर लव असते.
  • पाने साधी, एक आड एक, गोलाकार, हृदयाकृती आकाराची असतात. 
  • पाने २ ते ३ सें.मी. लांब व २ ते ५ सें.मी. रुंद व देठाकडे हृदयाकृती तर टोकाकडे साधारण निमुळती होत गेलेली असतात.
  •  पानांचा वरील पृष्ठभाग गुळगुळीत तर खालील भाग नाजूक लवयुक्त असतो.
  • फुले पांढरी, सुवासिक, द्विलिंगी, नियमित, ६ सें.मी. व्यास व ५ ते ८ सें.मी. लांबीची, पानांच्या बेचक्यातून एकाकी येणारी. देठ साधारण २ ते ५ सें.मी. लांब असतात.
  •  फुले जुलै ते सप्टेंबरमध्ये येतात. साधारण दुपारनंतर फुले कोमेजून तपकिरी रंगाची होतात.
  •  फळे गोलाकार १ ते १.५ सें.मी. व्यासाची असतात. फळे साधारण नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत तयार होतात.
  • बिया तपकिरी रंगाच्या असून फळात २ ते ४ बिया असतात. बिया १.५ सें.मी. लांब व १ सें.मी. रुंद असतात.
  • औषधी उपयोग 

  • पाने व मुळे औषधात वापरली जातात.
  • पाने अतिशय पौष्टिक, खनिजयुक्त आहेत. याची कोवळी पाने भाजीसाठी वापरली जातात. 
  • लहान मुलांच्या अंगावर पुरळ उठल्यास पाने व फांद्यापासून तयार केलेला रस चोळतात.
  • खोकला, मलेरिया, डोकेदुखी व त्वचारोगावारही उपयुक्त.
  • बाळंतपणानंतर मातेला याची मुळे खायला देतात. 
  • पानांपासून तयार केलेले तेल संधिवात तसेच केसांच्या टाळूवरील आजारावर वापरतात.
  • (टीप ः तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधोपचार करावेत.)

    पाककृती

    कोवळ्या पानांचे मुटकुळे   साहित्य ः ३ ते ४ वाट्या फांदची कोवळी पाने, अर्धी वाटी बेसनपीठ, १ वाटी ज्वारी किंवा बाजरीचे पीठ, २ ते ३ चमचा लसून-हिरवी मिरची पेस्ट, १ ते दीड चमचा हळद, १ ते २ चमचे लाल मिरची पावडर, १ चमचा धने पावडर, किंवा बारीक चिरलेली कोंथिबीर, फोडणीसाठी जिरे, मोहरी, तेल, चवीपुरते मीठ. कृती ः प्रथम फांदची पाने स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्यावीत. त्यात बेसन, ज्वारी किंवा बाजरीचे पीठ, लसूण-मिरचीची पेस्ट, हळद, लाल मिरची पावडर, मीठ, धने पावडर किंवा बारीक चिरलेली कोंथिबीर टाकून सगळे मिश्रण एकजीव करून घ्यावे. नंतर थोडे थोडे पाणी टाकून चांगले मळून त्याचे छोटे छोटे मुटकुळे तयार करून घ्यावे. एका पातेल्यात पाणी उकळत ठेवावे. एका लहान ताटलीमध्ये तेल लावून त्यात मुटकुळे ठेवून ते वाफवून घ्यावे. एका कढईत जिरे, मोहरीची फोडणी तयार करून, त्यामध्ये मुटकुळे कापून लालसर होईपर्यंत परतून घ्यावे. हे मुटकुळे खाण्यास छान लागतात. कोवळ्या पानांची भाजी साहित्य ः ३ ते ४ वाट्या फांदची कोवळी पाने, १ ते २ बारीक चिरलेले कांदे, ४ ते ५ ठेचलेल्या लसूण पाकळ्या, १ ते २ कापलेल्या हिरव्या मिरच्या, १ चमचा हळद, चवीपुरते शेंगदाण्याचा कूट, फोडणीसाठी मोहरी, जिरे, हिंग, तेल, चवीप्रमाणे मीठ. कृती ः कोवळी पाने व देठ धुऊन बारीक चिरून घ्यावीत. एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, हिंगाची फोडणी तयार करून, त्यात बारीक चिरलेला कांदा सोनेरी रंग येईपर्यंत शिजवून घ्यावा. नंतर त्यात हळद व बारीक चिरलेली फांद्याची पाने टाकून नीट परतवून घ्यावीत. थोडे शिजत आले की शेंगदाण्याचा कूट मिसळावा, झाकण ठेवून मऊ होईपर्यंत नीट शिजवून घ्यावे. चवीप्रमाणे मीठ मिसळावे. टीप ः काही ठिकाणी फांदची कोवळी पाने थोड्या पाण्यात शिजवून ते मिश्रण बाजरी किंवा ज्वारीच्या पिठात मळून त्याच्या भाकऱ्या करण्याची पद्धत आहे.

     - ashwinichothe7@gmail.com  (क. का. वाघ उद्यानविद्या महाविद्यालय, नाशिक)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com