बाजारपेठेत वाढतेय ‘चीज'ला मागणी

आपल्या देशामध्ये प्रामुख्याने प्रक्रियायुक्त चीज, स्प्रेड चीज आणि विशिष्ट चवीचे चीज वापरले जाते. साधारणपणे मोझारेल्ला,चेडर,एमेंटल,रिकोटा हे लोकांना आवडलेले चीजचे प्रकार आहेत. आपल्या डेअरी उद्योगांना चीज निर्मितीमध्ये संधी आहे.
cheese
cheese

आपल्या देशामध्ये प्रामुख्याने प्रक्रियायुक्त चीज, स्प्रेड चीज आणि विशिष्ट चवीचे चीज वापरले जाते. साधारणपणे मोझारेल्ला,चेडर,एमेंटल,रिकोटा हे लोकांना आवडलेले चीजचे प्रकार आहेत. आपल्या डेअरी उद्योगांना चीज निर्मितीमध्ये संधी आहे.

चीज हा जगातील सर्वांत जुना पदार्थ. सुमारे आठ हजार वर्षांपूर्वी इराकमध्ये याचा शोध लागला. हा शोध सुद्धा योगायोगानेच लागला.पूर्वी पाणी वाहून नेण्यासाठी पखालीचा (कातडी पिशवी) वापरत होत होता, त्याप्रमाणे इराकमधील काही आदिवासी जमाती अतिरिक्त दूध  साठवण्यासाठी पखालीचा उपयोग करत असत. तेथील उष्ण हवामान आणि प्रवासातील हालचालींमुळे त्याचे दह्यात रूपांतर होऊन त्यावर निवळी (व्हे) यायची. निवळीचा वापर तहान भागवण्यासाठी केला जात असे. शिल्लक दह्यावर किण्वन प्रक्रिया आणि मीठ वापरून पदार्थ तयार केला जात असे. हा पदार्थ उच्चतम प्रतीच्या प्रथिनांचा स्रोत असल्याने आहारात याचा वापर होऊ लागला. हाच पदार्थ पुढे चीज म्हणून बाजारपेठेत आला. आहारातील बदल आणि बाजारपेठेच्या मागणीनुसार या चीज उत्पादनातही बदल झाले,वेगवेगळे प्रकार यामध्ये तयार होऊ लागले.   जागतिक बाजारपेठ  आज जगामध्ये चीजमध्ये विविध प्रकार उपलब्ध आहेत. चीजमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रथिने, कॅल्शिअमसारखी खनिज द्रव्ये आणि जीवनसत्त्वे आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हा शुद्ध शाकाहारी पदार्थ आहे.  जगात चीज उत्पादन आणि आहारातील वापरामध्ये अमेरिका,नेदरलँड,जर्मनी आणि फ्रान्स हे देश आघाडीवर आहेत. येत्या काळातील उत्पादन आणि मागणी  लक्षात घेता हे देश आशिया खंडातील विकसनशील देशात चीज विक्रीसाठी प्रयत्न करत आहेत. आपल्याकडील दुग्ध व्यवसाय आणि बाजारपेठेचा विस्तार लक्षात घेता चीज निर्मितीकडे भारतीय डेअरी उद्योगाने लक्ष दिले पाहिजे.               भारताचा विचार करता दूध उत्पादनात आपण प्रथम क्रमांकावर असलो तरीसुद्धा दुग्धजन्य पदार्थ निर्मिती, उत्पादन आणि निर्यातीमध्ये आपण खूप मागे आहोत. येत्या काळात आपल्याला चांगल्या संधी उपलब्ध होत आहेत.  अमेरिका, नेदरलँड,जर्मनी आणि फ्रान्स या देशातील डेअरी उद्योग उत्पादनाच्या ४० टक्के दूध हे चीज उत्पादनासाठी वापरतात. त्यापासून विविध  चवीचे, आकार आणि स्वादाचे चीज उत्पादित करून  जगभर विक्री करतात. एकूणच नैसर्गिक, कोरडे, प्रक्रियायुक्त आणि कमी चरबीयुक्त चीजला  जागतिक बाजारपेठेत मागणी आहे. राज्यातील डेअरी उद्योगांना संधी   दोन वर्षांपूर्वी अमेरिकेत उत्पादित झालेल्या अतिरिक्त दुधाचे तेथील पशुपालकांनी चीजमध्ये रुपांतरकरून साठवणूक केली. खाजगी व्यावसायिकांच्या प्रमाणे सर्वच पातळीवर आक्रमक पद्धतीने जाहिरात करून वेगवेगळ्या ठिकाणी  चीजच्या फायद्याबाबत ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण केली. महोत्सवातून  चीजचे आरोग्यदायी महत्त्व लोकांच्यापर्यंत पोहोचविले. याचपद्धतीने भारतीय बाजारपेठेत डेअरी उद्योगांनी आपल्या उत्पादनांचा प्रसार केला पाहिजे. भारतीय लोकांच्या आवडीचे, चवीचे आणि उच्च गुणवत्तेचे चीज जर भारतामध्येच तयार झाले, तर निश्‍चितपणे मोठ्या प्रमाणात शाकाहारी लोक असलेल्या आपल्या देशात एक मोठी बाजारपेठ निर्माण होईल. राज्यात चीज उत्पादनांमध्ये खाजगी कंपन्या अग्रेसर आहेत, हळूहळू ते आपला ग्राहकवर्ग निर्माण करत आहेत. मात्र राज्यातील सहकार क्षेत्राचे म्हणावे इतके लक्ष या चीज उत्पादनाकडे नाही. अतिरिक्त दुधाचा प्रश्न सोडवण्यासाठी दूध पावडर बनवून साठा केला जातो. परंतु त्याचबरोबर सहकारी क्षेत्रातील दूध संघांनी चीज निर्मिती करून साठवणूक करावी. यातून योग्य प्रकारे विक्री करून अतिरिक्त दूध उत्पादनाचा प्रश्न सोडवता येईल.  आपल्या हवामानाचा विचार करून उच्च गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली वापरून सहकार क्षेत्राने चीज निर्मितीमध्ये पाऊल टाकले तर अतिरिक्त दुधाचा प्रश्न सुटण्या बरोबरच उच्चप्रतीच्या प्रथिनेयुक्त आहाराची गरज सुद्धा भागेल आणि एका मोठ्या उद्योगाची सुरुवात होईल. 

चीजचा वापर 

  • स्वयंपाक किंवा अल्पोपाहारामध्ये जसे की सॅंडवीचमध्ये पसरून किंवा स्नॅक्स सजवण्यासाठी चीज वापरले जाते. ड्राय चीज हे बेकरी उत्पादने, पास्ता, बिस्किटे आणि तयार जेवणामध्ये वापरतात. 
  • भारताचा विचार केला तर प्रती वर्ष प्रति व्यक्ती फक्त ०.२ किलो चीज आपल्या आहारामध्ये खातो. जगामध्ये त्याचे प्रमाण सरासरी ७ ते ८ किलो आहे. देशांतर्गत शहरी भागात ब्रेड, पाव यांच्याबरोबर चीज खाल्ले जाते, परंतु त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. मुंबई, दिल्ली, कोलकता, चेन्नई या शहरांमध्ये डोसा, पावभाजी, पराठ्यामध्ये  मर्यादित स्वरूपात चीजचा वापर सुरू झाला आहे. 
  • आपल्या देशामध्ये प्रामुख्याने प्रक्रियायुक्त चीज, स्प्रेड चीज आणि विशिष्ट चवीचे चीज वापरले जाते. साधारणपणे मोझारेल्ला,चेडर,एमेंटल,रिकोटा हे लोकांना आवडलेले चीजचे प्रकार आहेत.  आज मोठ्या सुपर मार्केट सह छोट्या शहरातील दुकानातून चीज क्यूब,ब्लॉक्स,लिक्विड आणि चौकोनी तुकड्यात चीज उपलब्ध झाले आहेत. सॅंडविच, पिझ्झा, बर्गर यामध्ये  मोठ्या प्रमाणामध्ये चीजचा वापर वाढला आहे. 
  • बाजारपेठेची मागणी लक्षात घेता विविध डेअरी उद्योगांनी चीजनिर्मितीमध्ये पुढाकार घेतला आहे. याचबरोबरीने मुक्त  
  • बाजारपेठेमुळे हळूहळू ऑस्ट्रेलिया, नेदरलॅंडमधील कंपन्यांनी आपल्या बाजारपेठेमध्ये चीज विक्रीस सुरुवात केली आहे. एकंदरीत जागतिक स्तरावर भारतीयांचा वाढलेला संचार, पाश्चात्त्य पाककृतींचा वाढता प्रभाव आणि आरोग्य सजगता यामुळे चीज उत्पादनांची मागणी वाढत आहे.  
  • लोक आरोग्याबाबत जागरूक आहेत. कमी किमतीपेक्षा चांगल्या प्रतीचे खाद्य पदार्थ लोकांना हवे आहेत. कमी फॅट, कमी मीठ आणि योग्य पोषणमूल्य असणारे चीज ग्राहकांना हवे आहे. त्याचबरोबर मागणी आणि पुरवठा यामधील संतुलन राखणे त्याचे वेगाने विपणन, विक्री करणे महत्त्वाचे आहे. 
  •   चीज उत्पादनांना चांगली चव, गुणवत्ता येण्यासाठी काही वेळ देणे आवश्यक असतो.चीज बनवणे ही एक कला आहे. काही देशांमध्ये चीजचे उत्पादन आणि वापर हा त्यांचा सांस्कृतिक ठेवा आहे. 
  • - डॉ. घोरपडे, ९४२२०४२१९५ (लेखक सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त (पशुसंवर्धन) आहेत)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com