agriculture news in Marathi, article regarding mulberry cultivation for sericulture | Agrowon

पट्टा पद्धतीनेच करा तुती लागवड

भाग्यश्री बानायत, संजय फुले
रविवार, 1 सप्टेंबर 2019

तुती लागवडीसाठी सपाट, काळी, कसदार, तांबडी, वालुकामय तांबड्या प्रकारातील जमीन निवडावी. जमीन पाण्याचा योग्य निचरा होणारी, ओलावा टिकवून ठेवणारी, भुसभुशीत असावी. लागवड ही पट्टा पद्धतीने करावी. याचा फायदा म्हणजे खते, पाणी कमी लागते. अंतरमशागतीचा खर्च कमी होतो, तुती पानांचा दर्जा व उत्पादन वाढते.

तुती लागवडीसाठी सपाट, काळी, कसदार, तांबडी, वालुकामय तांबड्या प्रकारातील जमीन निवडावी. जमीन पाण्याचा योग्य निचरा होणारी, ओलावा टिकवून ठेवणारी, भुसभुशीत असावी. लागवड ही पट्टा पद्धतीने करावी. याचा फायदा म्हणजे खते, पाणी कमी लागते. अंतरमशागतीचा खर्च कमी होतो, तुती पानांचा दर्जा व उत्पादन वाढते.

रेशीम कीटकाच्या खाद्यप्रकारावरून तुती रेशीम, टरस रेशीम, मुगा रेशीम आणि एरी रेशीम असे चार प्रकार आहेत. तुती रेशीम प्रकारात तुती पाला, टसर रेशीम प्रकारात एन, अर्जुन वृक्षाचा पाला, एरी रेशीम प्रकारात एरंडीचा पाला तर मुगा रेशीम प्रकारात सोम, सोलू वृक्षाचा पाला रेशीम कीटकाचे खाद्य आहे. जागतिक स्तरावर फक्त भारतामध्ये चारही प्रकारच्या रेशमाचे उत्पादन घेतले जाते. या सर्व प्रकारात तुती रेशीम उच्च प्रकारचे असल्याने त्याचे उत्पादनही जास्त असून, (९२ टक्के) मागणीही प्रचंड आहे. आपल्या राज्यात तुती व टसरचे उत्पादन घेतले जाते. रेशीम कीटकांच्या संगोपनासाठी तुतीचा पाला व कीटक संगोपनगृहाची आवश्‍यकता आहे. त्यासाठी शेतात तुतीची लागवड आणि शेतामध्ये कीटकसंगोपनगृह उभारावे लागते.

तुती लागवड 

 •  उच्च प्रतीच्या कोष उत्पादनासाठी तुती पाल्याची प्रत व पाला उत्पादन हे दोन घटक अतिशय महत्त्वाचे आहेत. यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने तुती लागवड करणे महत्त्वाचे आहे. 
 • तुती लागवडीसाठी सपाट, काळी, कसदार, तांबडी, वालुकामय तांबड्या प्रकारातील जमीन निवडावी. जमीन ही खोल, पाण्याचा योग्य निचरा होणारी, चांगल्या प्रकारे ओलावा टिकवून ठेवणारी, भुसभुशीत असावी. जमिनीचा सामू ६.२ ते ६.८ च्या दरम्यान असावा. मातीचा थर कमीत कमी ६० सें. मी. खोलवर असावा. 
 • तुती लागवड केलेल्या जमिनीजवळ कीटक संगोपनगृह असावे. पाण्याची सोय असावी. तंबाखू, मिरची आदी पिकापासून कमीत कमी १०० मीटर दूर असावी. खताचे खड्डे, कुक्कुटपालन, मोठी झाडे, इमारती इत्यादींपासून दूर असावी. 
 • एप्रिल - मे महिन्यात जमिनीची नांगराने ३० ते ५० सें. मी. खोल उभी, आडवी नांगरट करावी. जमिनीला वाफसा आल्यानंतर जमिनीतील दगड, तण काढून पुन्हा नांगरट करावी. त्यानंतर प्रती एकरी १५ ते २० बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून वखरणी करून जमीन एकसारखी करावी. त्यानंतर ३० ते ४० सें. मी. खोलीच्या सऱ्या तयार करून जमीन लागवडीसाठी तयार करावी. 

पट्टा पद्धतीने तुती लागवड

 • लागवड ५x२x१, ५x३x२, ६x२x१, ४x२x१ फूट अशा विविध पट्टा पद्धतीने केली जाते.  याचा फायदा म्हणजे खते, पाणी कमी लागते. अंतरमशागतीचा खर्च कमी होतो, तुती पानांचा दर्जा व उत्पादन वाढते, तुतीची फांदी सरळ दिशेने वाढून जाडीही कमी होते. ज्यामुळे फांदी पद्धतीने कीटकसंगोपन करणे सुलभ होते. 
 •  लागवडीकरिता व्ही-१ या तुती जातीची निवड करावी. 
 •  लागवडीसाठी तुतीची जात निवडताना ६ ते ८ महिन्यांच्या जुन्या बागेतील निवडावे. बेण्याची उंची किमान ८ फूट असावी. आकार बोटाएवढा असावा. बेण्यापासून कलमे तयार करताना प्रत्येक कलमावर कमीत कमी तीन जिवंत डोळे व कलमाची लांबी ६ ते ८ इंच असावी. कोवळी, बारीक, हिरवी शेंड्याकडील कोवळी किंबा बुडख्याकडील जाड तुतीची काडी कलमासाठी निवडू नये. 
 • कलमे तयार करताना धारदार कोयत्याने एकाच घावात तोडावीत. कलमाची साल निघणार नाही, दुभंगणार नाही तसेच डोळ्यावर तुकडा पडणार नाही याची काळजी घ्यावी. यासाठी सिकेटरचा देखील चांगला उपयोग होतो. 
 •     तयार केलेली कलमे सुकू नये, यासाठी सावलीत बसून कलमे तयार करावीत. कलमावर पाणी मारावे किंवा ओल्या गोणपाटाने झाकावे. लागवडीपूर्वी कलमे १ टक्का कार्बेन्डाझिमच्या द्रावणात अर्धा तास बुडवून ठेवावीत. या प्रक्रियेनंतर कलमे लगोलग जमिनीत लावून घ्यावीत. दोन डोळे जमिनीत जातील व एक डोळा जमिनीत जाईल याची खबरदारी घ्यावी. कलमाभोवतीची माती हाताने दाबून घ्यावी. कलमे उलटी लागणार नाही, कलमाची जमिनीकडील भागाची साल निघणार नाही याची काळजी घ्यावी. 
 • पाऊस नसल्यास लागवडीपूर्वी दोन दिवस अगोदर जमीन भिजवून घ्यावी. कलमे समोरासमोर लागणार नाही याची काळजी घ्यावी. 
 •  तुती लागवड पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याने मोकळ्या पट्ट्यात किमान १००० ते १५०० कलमांची रोपवाटिका करावी. याचा उपयोग तुटाळ भरून काढण्यासाठी होतो. तुती लागवड कलमाऐवजी तयार तुती रोपांद्वारे केल्यास बागेतील १०० टक्के तुती झाडे जिवंत राहण्यास मदत होते.
 • तुती लागवडीनंतर भारी जमिनीकरिता महिन्यातून दोनदा, मध्यम जमिनीसाठी १२ ते १४ दिवसाने तर हलक्‍या जमिनीसाठी ८ ते १० दिवसाने पाण्याची पाळी द्यावी. ठिबक सिंचन पद्धतीचा वापर तुतीसाठी अतिशय फायदेशीर आहे. तुती बागेस खारवट, क्षारयुक्त पाणी कधीही देऊ नये याचे अनिष्ट परिणाम होतात.
 • तुतीची वाढ योग्य होऊन पोषक, भरघोस व दर्जेदार पाला निर्मितीसाठी खत व्यवस्थापन  गरजेचे आहे. वर्षभरात ठराविक अंतराने पाच ते सात वेळा बॅचेस घेतो त्यामुळे जमिनीची सुपिकता कमी होऊन उत्पादकता कमी होते. जमिनीची कमी झालेली सुपिकता टिकवून ठेवणे, वाढविणे या करिता सेंद्रिय खते, जैविक खते, हिरवळीची खते, गांडूळ खत, सूक्ष्म अन्नद्रव्ये त्याचबरोबर योग्य प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या रासायनिक खतांच्या माध्यमातून जमिनीची सुपिकता वाढवता येते. 
 • तुती लागवडीनंतर दोन ते अडीच महिन्यांत तुती कलमांना मुळे फुटतात. त्या वेळी एकरी २४ किलो नत्र आणि दुसरी मात्रा तीन ते चार महिन्यांनी २४ किलो पालाशची द्यावी. दुसऱ्या वर्षापासून एकरी नत्र १२० किलो, स्फुरद ४८ किलो आणि पालाश ४८ किलो ही खतमात्रा  पाच मात्रेमध्ये विभागून द्यावे. माती परीक्षण अहवालानुसार रासायनिक खतांची मात्रा द्यावी. 

कीटकसंगोपनगृहाची रचना

 • तुती लागवड केल्यापासून साडेचार महिन्यांनी कीटक संगोपनाच्या बॅचेस घ्यायला सुरवात होते. पहिल्या वर्षी तुती बाग नवीन असल्याने तुतीला कमी फांद्या असतात, त्यामुळे कमीत कमी दोन बॅचेस होतात. या उद्योगाचे खरे अर्थशास्त्र तुती लागवडीच्या दुसऱ्या वर्षांपासून पंधरा वर्षांपर्यंत आहे. रेशीम कीटकांच्या संगोपनासाठी स्वतंत्र कीटकसंगोपनगृहाची उभारणी करावी. रेशीम कीटकांच्या पाच अवस्था असून पहिल्या दोन अवस्थांना बाल्य अवस्था तर उरलेल्या तीन अवस्थांना प्रौढ अवस्था म्हणतात. 
 •  एक एकर तुती लागवड क्षेत्रासाठी बाल्य अवस्थेसाठी स्वतंत्र १४ x १० फूट क्षेत्रफळ आणि ९ ते १० फूट उंची असलेले बाल कीटकसंगोपनगृह पुरेसे आहे. प्रौढ अवस्थेसाठी एक एकर तुती लागवड क्षेत्रासाठी प्रौढ अवस्थेसाठी स्वतंत्र ५० x २० फूट क्षेत्रफळ आणि ९ ते १० फूट उंची असलेले बाल कीटकसंगोपनगृह पुरेसे आहे.
 •     कीटकसंगोपनगृह उभारण्याअगोदर त्याचे स्थान, दिशा, अंतर्बाह्य वातावरण इत्यादी बाबी महत्त्वाच्या असतात. कीटकसंगोपनगृह तुती बागेजवळ असावे, खताचे खड्डे, उघडी गटारे, पोल्ट्रीशेड या पासून लांब असावे. वर्षभर जास्त तापमान असलेल्या ठिकाणी कीटकसंगोपनगृहाची दिशा उत्तर-दक्षिण तर वर्षभर थंड तापमान असलेल्या ठिकाणी संगोपनगृहाची दिशा पूर्व-पश्‍चिम असावी.
 •  कीटकसंगोपनगृहातील तापमान, आर्द्रता, प्रकाश, हवा इत्यादी बाबी रेशीम अळ्यांच्या निरोगी वाढीवर, दर्जेदार व भरघोस कोष उत्पादनावर थेट परिणाम करत असल्याने कीटकसंगोपनगृहातील तापमान २४ ते २८ अंश सेल्सिअस व आर्द्रता ७० ते ८६ टक्के असणे गरजेचे आहे.
 •   ज्या कीटकसंगोपनगृहात आपण हजारो रेशीम अळ्या एकत्र ठेवणार आहोत, त्यांच्या उर्त्सजनामुळे, विष्ठेमुळे त्यांना खाद्य म्हणून वापरात येणाऱ्या तुती पाल्याच्या उर्त्सजनातून कार्बनडाय ऑक्‍साइड, कार्बन मोनॉक्साइड, अमोनिया इत्यादी वायू निर्माण होऊन वातावरण दूषित होते. रेशीम कीटक रोगास बळी पडण्याची शक्‍यता असते. हे टाळण्यासाठी कीटकसंगोपनगृहात वायूविजनाची व्यवस्था असावी. खिडक्‍यांची रचना करताना संगोपनगृहातील भिंतीच्या वरच्या व खालच्या दोन्ही बाजूंनी योग्य प्रमाणात व्हेंटिलेटर असतील असे पाहावे, जेणेकरून संगोपनगृहातील खालच्या व्हेंटिलेटरमधून बाहेरील ताजी व स्वच्छ हवा आत येईल. वरच्या खिडक्‍यांमधून संगोपनगृहातील अशुद्ध हवा बाहेर जाऊन संगोपनगृहातील वायूविजनात, हवा खेळती राहण्यास समतोल राखला जाईल. 
 •  कीटकसंगोपनगृहातील खिडक्‍या व व्हेंटिलेटरला तारेच्या जाळ्या लावाव्यात. 
 •  एक एकर तुती क्षेत्रासाठी वीस फूट रुंद व पन्नास फूट लांबीचे (एक हजार चौ. फूट चटई क्षेत्र) कीटकसंगोपनगृह असावे.
 • कीटकसंगोपनगृहाची मधली बाजूची उंची १२ फूट, तर दोन्ही बाजूंची उंची १० फूट असावी.
 • रेशीम अळ्यांना ठेवण्यासाठी पाच कप्प्यांचे दोन रॅक तयार करावे. रॅकवरील तळातील पहिला कप्पा जमिनीपासून दीड फुटावर व उर्वरित प्रत्येक कप्प्यांमधील अंतर २ फूट असेल अशी योजना असावी. प्रत्येक रॅकची लांबी ४५ फूट तर रुंदी ५ फूट असेल. संगोपनगृहात रॅक मांडताना दोन रॅकमधील अंतर ५ फूट तर भिंतीकडील सर्व बाजूंनी भिंती पासूनचे अंतर अडीच फूट असावे. कीटकसंगोपनगृहाची भिंत ३ फूट आणि कोबा केलेली असावी. कीटकसंगोपनगृहाच्या दरवाज्याला लागूनच ८ x ८ फूट खोली तुती फांद्या साठविण्यासाठी असावी. 
 • संगोपनगृहाबाहेर साहित्यांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी पाण्याचा हौद असावा.

- संजय फुले  ः ९८२३०४८४४०

(भाग्यश्री बानायत या रेशीम संचालनालय, नागपूर येथे संचालक आणि संजय फुले हे जिल्हा रेशीम कार्यालय, सातारा येथे रेशीम विकास अधिकारी आहेत.)


इतर कृषिपूरक
धिंगरी अळिंबीचे उत्पादन तंत्रधिंगरी आळिंबी ही कमी खर्चात चांगला आर्थिक फायदा...
जनावरातील सर्पदंशाचे निदान अन्‌ उपचार सध्याच्या काळात चराईला जाणाऱ्या जनावरांच्यामध्ये...
गाभण शेळी तपासणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानशेळी गाभण झाल्यानंतर शरीरात विविध बदल होतात....
मधमाशीपालनातून मिळवा प्रोपोलिस, रॉयल...प्रोपोलिस मानवी आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत....
मधमाशी पालनामध्ये मोठी व्यावसायिक संधीमधमाशी पालनामध्ये मधाच्या बरोबरीने सात विविध...
पावसाळ्यामध्ये कोंबड्यांचे व्यवस्थापनपावसाळ्यामध्ये वातावरणातील दमटपणा वाढलेला असतो....
`मनरेगा‘च्या माध्यमातून पशुसंवर्धन योजनाग्रामीण भागात राहणाऱ्या अकुशल कामगारांना गावातच...
स्वच्छ दूध निर्मितीसाठी उपाययोजनागोठा नेहमी स्वच्छ, कोरडे, खाच खळगेविरहित असावा....
प्रयोगशाळांतून होईल पशू आजाराचे योग्य...जनावरांचे आरोग्य अबाधित राखणे, जनावरातील आजारांचे...
स्वच्छ दूधनिर्मितीवर लक्ष द्यादुधाची प्रत ही दुधातील फॅट, एस.एन.एफ.चे प्रमाण...
नवजात वासराची घ्यावयाची काळजीआरोग्याच्या दृष्टीने वासराचे जीवन हे  पहिले...
गोड्या पाण्यातील कोळंबी संवर्धनकोळंबी संवर्धनासाठी तलावाचे क्षेत्रफळ ०.१ ते ०.२...
जनावरांतील सर्पदंशांवर प्राथमिक उपचारसर्पदंश झालेले जनावर बेचैन होते.हालचाल करत नाही....
जनावरांच्या आजाराकडे नको दुर्लक्षपशूतज्ज्ञ आजार निदानासाठी जनावर आजारी असतानाची...
शेळ्यांना द्या सकस आहार...शेळ्यांच्या विविध शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी...
बायोफ्लाक मत्स्यपालनाचे तंत्रबायोफ्लाक तंत्रज्ञानातील महत्त्वाचे घटक म्हणजे...
व्यवस्थापन गाई-म्हशींचेसाधारणपणे गाई,म्हशींचा गाभण काळ अनुक्रमे २८० ते...
दुग्ध व्यवसाय ठरतोय शेतीला आधारपनवेल येथील बांधकाम व्यावसायिक अनिल लक्ष्मण...
जनावरांच्या आहारात असावीत खनिज मिश्रणेखनिज कमतरतेचा परिणाम जनावरांची वाढ तसेच प्रजनन...
सामूहिक प्रयत्नातूनच प्राणिजन्य आजारावर...जगातील सुमारे ७० टक्के आजार हे प्राणिजन्य आहेत,...