पोषक चाऱ्यासाठी ओट लागवड

ओट पिकाचा चारा हा कोवळा, लुसलुशीत, पालेदार, भरपूर फुटवे असणारा, पाचक व कसदार असून, जनावरे आवडीने खातात. हिवाळी हंगामात तो जनावरांना चांगला मानवतो.
oat cultivation
oat cultivation

जनावरांच्या हिरव्या चाऱ्यासाठी अधिक पोषणमूल्य असलेल्या ओट लागवडीकडे प्राधान्याने लक्ष दिले पाहिजे. ओट पिकाचा चारा हा कोवळा, लुसलुशीत, पालेदार, भरपूर फुटवे असणारा, पाचक व कसदार असून, जनावरे आवडीने खातात. हिवाळी हंगामात तो जनावरांना चांगला मानवतो. ओट हे गव्हासारखे दिसणारे पण उंच वाढणारे, रब्बी हंगामातील महत्त्वाचे चारा पीक आहे. काही भागात या पिकास ‘’सातू’’ म्हणूनही ओळखले जाते. ओट चारा पिकास थंडी चांगली मानवत असल्याने याची लागवड उत्तर भारतात जास्त प्रमाणात केली जाते. अलीकडे या महाराष्ट्रातही या चारा पिकाखालील क्षेत्र वाढत आहे. शिवाय वेळेवर पेरणी केल्यास त्याद्वारे दोन कापण्या मिळतात.  ओट हे सरळ १५० ते १६० से.मी. उंच वाढणारे तृणधान्य वर्गीय चारा पीक आहे. त्यास भरपूर फुटवे येतात. याचा चारा कोवळा, लुसलुशीत, पालेदार, पथ्थकर तसेच रुचकर आहे. सर्व प्रकारची जनावरे उदा. गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या अत्यंत आवडीने खातात. लुसलुशीत असल्याने त्यास चाफ कटरची आवश्यक्ता नसते. ओटचे खोड रसाळ व लुसलुशीत असल्याने जनावरांना टाकलेल्या ओटच्या वैरणीचा जास्तीत जास्त भाग फस्त करतात. यातील भरपूर प्रमाणातील प्रथिने, शर्करायुक्त पदार्थ व खनिजे पुरवठा यामुळे  दुभत्या जनावराचे दुधाचे प्रमाण चांगले वाढते. चाऱ्यात कोणतेही अपायकारक द्रव्ये नसल्याने तो कोणत्याही अवस्थेत जनावरांना खाऊ घालता येतो. या शिवाय त्याचा मुरघास किंवा वाळलेला चाराही करता येतो. जमीन  मध्यम प्रतीची काळी किंवा भारी, परंतु पाण्याचा निचरा होणारी जमीन या पिकास चांगली मानवते. खत व पाणी भरपूर प्रमाणात उपलब्ध असल्यास हलक्या जमिनीतही ओटची लागवड करता येते. पूर्व मशागत  या पिकास भुसभुशीत व खोल मशागतीची जमीन मानवते. पूर्वीच्या पिकाचे अवशेष नष्ट करण्यासाठी तसेच जमिनीत हवा खेळती राहण्यासाठी एक खोल नांगरणी करून एक ते दोन कुळवाच्या पाळ्या देऊन अथवा रोटाव्हेटर मारून जमीन भुसभुशीत करावी. पाणी देण्याच्या दृष्टीने ६ ते ७ मीटर लांब व ४ ते ५ मीटर रुंद आकाराचे वाफे बांधणे जरुरीचे आहे. त्यामुळे पुढे क्रमाक्रमाने कापणीचे नियोजनही करणे शक्य होते. खते  पूर्व मशागतीच्या वेळी हेक्टरी १० ते १२ बैलगाड्या शेणखत अथवा कंपोस्ट खत जमिनीत चांगले मिसळावे. ओट या पिकास १२० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ४० किलो पालाश प्रति हेक्टरी लागतो. पेरणीच्या वेळी ४० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ४० किलो पालाश द्यावा. पेरणीनंतर २५ दिवसांनी (खुरपणी झाल्यावर) ४० किलो नत्र द्यावा. पुढे पहिल्या कापणीनंतर उर्वरित ४० किलो नत्र  प्रति हेक्टरी द्यावे. यामुळे भरपूर चारा मिळतो. शिवाय तयार होणाऱ्या चाऱ्यात प्रथिनांचे प्रमाणही भरपूर असते.  सुधारित वाण 

  • ओट या पिकाचे केन्ट, जे.एच.ओ.८२२ व फुले हरिता हे वाण अखिल भारतीय स्तरावर वापरले जातात. 
  • महात्मा फुले कृषी विद्यापीठाने फुले हरिता (आर.ओ.१९) हा वाण सन २००७ साली अखिल भारतीय पातळीवर प्रसारित केलेला आहे. या उत्पादनक्षम वाणाचा चारा पोषक व चविष्ट असून त्याचा वापर जनावरांना हिरवा चारा, वाळलेली वैरण, भुसा अथवा मुरघास या स्वरूपात केला जातो. हा वाण १५० ते १६० सें.मी पर्यंत उंच वाढतो. भरपूर फुटवे, हिरवागार, रुचकर, पौष्टिक पाला आणि मऊ रसाळ व लुसलुशीत खोड यामुळे या वाणाचा चारा जनावरे आवडीने खातात. दुभत्या जनावरांना या पिकाचा चारा दिल्यास त्यात ८ ते ९ टक्के प्रथिने असल्यामुळे दुधाच्या प्रमाणात वाढ होते. तसेच दुधातील  स्निग्धतेचे प्रमाणही वाढते.
  • पोषण मूल्ये  ओट या पिकाची कापणी ५० टक्के फुलोऱ्यात असताना केल्यास त्यामध्ये ७ ते १० टक्के प्रथिने, १० टक्के खनिजे, २ टक्के स्निग्ध पदार्थ (तेलयुक्त पदार्थ), ३५ टक्के कास्टयुक्त पदार्थ व ४५ टक्के शर्करायुक्त पदार्थ असतात. बियाणे व पेरणी  ओट हे प्रामुख्याने थंडीला चांगला प्रतिसाद देणारे  चारा पीक आहे. त्यामुळे पेरणी वेळेत केल्यास भरपूर उत्पादन तर मिळतेच. शिवाय पुढील कापणी (खोडवा) चांगला येते. पेरणी ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. हेक्टरी १०० किलो बियाणे वापरून पेरणी ३० सें.मी अंतरावर करावी. लगेच पाणी द्यावे. बियाणे फोकू नये, अन्यथा पुढे वाढ झाल्यावर पीक लोळते. अनेक शेतकरी पहिली व दुसरी कापणी चाऱ्यासाठी घेतात. पुढील कापणी बिजोत्पादनासाठी करतात. त्यातून बियाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्णता प्राप्त करता येते.  आंतर मशागत  योग्य व सुधारित व्यवस्थापनाखाली ओटची वाढ जलद होते. पेरणीनंतर आवश्यकतेनुसार खुरपणी करावी अथवा हात कोळपे मारावेत. पुढे पिकाच्या वाढीमुळे व वसाव्यामुळे तणाचा जोर कमी होतो. पाणी व्यवस्थापन  या पिकास पाणी भरपूर लागते. नियमित दहा दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. पाण्याची पाळी लांबल्यास उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो. या पिकास जमिनीच्या मगदुराप्रमाणे व पिकाच्या गरजेप्रमाणे १० ते १२ दिवसाच्या अंतराने एकूण ५ ते ६ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.  हिरव्या चाऱ्याची कापणी व उत्पादन फुले हरिता या सुधारित जातीद्वारे हिरव्या चाऱ्याचे भरपूर उत्पादन मिळते. चाऱ्याचा सकसपणा मिळण्यासाठी ओट पीक ५० टक्के फुलोऱ्यात असताना एकच कापणी ७० ते ७५ दिवसांनी केल्यास ४०० ते ४५० क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळते. हा चारा वाळवून मुरघास करून अथवा भुसा करून ठेवता येतो. हा चारा कडब्यापेक्षा उत्तम, सरस व पौष्टिक असतो. मात्र, फुले हरिता हा वाण दुबार कापणीसाठी योग्य आहे. पहिली कापणी पेरणीनंतर ५० ते ५५ दिवसांनी व दुसरी कापणी पहिल्या कापणीनंतर ४० ते ४५ दिवसांनी केल्यास हेक्टरी ५५० ते ६०० क्विंटल प्रति हेक्टरी दोन कापण्याद्वारे हिरवा चारा उत्पादन मिळते. किंवा पहिली कापणी चाऱ्यासाठी ५० ते ५५ दिवसांनी केल्यास हेक्टरी ४०० ते ४५० क्विंटल हिरवा चारा मिळतो. दुसरी कापणी बियाण्यासाठी करावयाची असल्यास पहिल्या कापणीनंतर ७० ते ७५ दिवसांनी करावी. त्याद्वारे हेक्टरी १० ते १२ क्विंटल बियाणे मिळते.  संपर्क- डॉ. सर्फराजखान पठाण, ८१४९८३५९७०,  (सहयोगी प्राध्यापक, कृषी विद्या विभाग व पदव्युत्तर महाविद्यालय, प्रक्षेत्र प्रमुख, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com