सकस चाऱ्यासाठी ओट

चाऱ्यासाठी ओट पिकाची लागवड
चाऱ्यासाठी ओट पिकाची लागवड

ओट पेरल्यापासून ते पूर्ण वाढ होईपर्यंत पिकास जास्तीत जास्त थंडीचा कालावधी मिळणे आवश्यक आहे. दुबार कापणी चांगली येण्यासाठी या पिकाची लागवड ऑक्टोबर ते नोव्हेंबर यादरम्यान करावी. 

ओट हे तृणधान्य वर्गातील चारा पीक आहे. ओट हे काहीसे गहू पिकासारखेच दिसणारे, परंतु गव्हापेक्षा थोडे उंच वाढणारे महत्त्वाचे चारा पीक आहे. त्याचा वापर जनावरांना हिरवा चारा, वाळलेली वैरण, भुस्सा अथवा मुरघास म्हणूनसुद्धा केला जातो. दुभत्या जनावरांना चारा दिल्यास दुधाच्या प्रमाणात वाढ होते, शिवाय दुधातील स्निग्धांशाचे प्रमाणही वाढते.  लागवडीचे तंत्र 

  • मध्यम ते भारी, चांगली निचरा होणारी जमीन लागवडीसाठी आवश्यक आहे. क्षारयुक्त किंवा पाणथळीच्या जमिनी वगळून इतर सर्व प्रकारच्या जमिनीत हे पीक घेतले जाते.  
  • जाती ः फुले हरिता (आर. ओ. १९), केंट, यू. पी. ओ.-०४-१, जे. एच. ओ. २००४-४, जे. एच. ओ.- ७२२, यू. पी. ओ. ८५१ 
  • पेरणी ३० से.मी. अंतरावर पाभरीने करावी, अथवा बियाणे फोकून सारे पाडावेत व दंड पाडून पाणी द्यावे. 
  • ऑक्टोबर ते नोव्हेंबर हा कालावधी पेरणीसाठी उपयुक्त आहे. दुबार कापणी चांगली येण्यासाठी या पिकाची लागवड ओक्टोंबर ते नोव्हेंबर या दरम्यान करावी. 
  •  चारा पीक उत्पादनासाठी १०० किलो/हेक्टरी उत्तम प्रतीचे बियाणे वापरावे. 
  • पिकास सम प्रमाणात पाणी देण्याच्या दृष्टीने व जमिनीचा चढ उतार लक्षात घेऊन ६ ते ७ मीटर लांब व ३ ते ४ मीटर रुंद वाफे तयार करावेत. 
  •  दुबार कापणीस योग्य जातींची लागवड केल्यास (उदा. फुले हरिता (आर. ओ. १९), केंट, इत्यादी) हेक्टरी १२० किलो नत्र (२६० किलो युरिया) तीन समान हप्त्यात द्यावा. म्हणजे ४० किलो नत्र (८६ किलो युरिया), ५० किलो स्फुरद (३१२ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) आणि ४० किलो पालश (६६ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) पेरणीच्या वेळी द्यावे आणि पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी ४० किलो नत्र (८६ किलो युरिया) द्यावे. पहिली कापणी झाल्याबरोबर उर्वरित ४० किलो नत्र (८६ किलो युरिया) द्यावे, म्हणजे उत्पादन वाढण्यास निश्चित मदत होते. 
  • पेरणीनंतर एक खुरपणी ३० दिवसांच्या आत करावी व पीक तणविरहित ठेवावे. 
  • सकस, चवदार व पौष्टिक भरपूर हिरवा चारा उत्पादनासाठी जर एकच कापणीच्या जातीची लागवड केली तर, पीक पन्नास टक्के फुलोऱ्यात असताना म्हणजेच पेरणीपासून ७० ते ७५ दिवसांनी कापावे. त्यापासून ४०० ते ४५० क्विंटल उत्पादन मिळते. दुबार कापणीच्या जातीची लागवड केल्यास जास्त उत्पादन मिळण्यासाठी पेरणी ऑक्टोबरअखेर ते नोव्हेंबेरच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. पहिली कापणी पेरणीनंतर ५० ते ५५ दिवसांनी आणि दुसरी कापणी ४५ ते ५० दिवसांनी केल्यास हेक्टरी ५५० ते ६०० क्विंटल इतके हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळते.  
  • पोषक घटक 

    ५० टक्के फुलोऱ्या‍तील पिकामध्ये जास्तीत जास्त पोषणमूल्ये असतात. यामध्ये प्रथिने ८ ते ९ टक्के, काष्टमय पदार्थ ३५.१ टक्के, स्निग्ध पदार्थ १.८ टक्के, खनिजे १०.१ टक्के व पिष्टमय पदार्थ ४५.५ टक्के असतात. 

    - तुषार भोसले, ८००७६५६३२४.  (पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com