विषारी वनस्पती, कीडनाशकांची जनावरांना विषबाधा

जनावरांना योग्य गुणवत्तेचा चारा खाद्यामध्ये द्यावा.
जनावरांना योग्य गुणवत्तेचा चारा खाद्यामध्ये द्यावा.

ॲस्परजीलस बुरशीची वाढ झालेला मका जनावरांच्या खाण्यात आल्यास त्याचा यकृत व किडनीवर विपरीत परिणाम होतो. नुकतीच कीटकनाशकाची फवारणी झालेले मका पीक चारा म्हणून जनावरांच्या खाद्यात आले असल्यास विषबाधा होते. शेती बांधावरील विषारी वनस्पतीमुळे देखील जनावरांना विषबाधा होते. हे लक्षात घेऊन नेमक्या उपाययोजना कराव्यात. 

सध्या लष्करी अळीचा प्रादुर्भाव झालेला मका खाऊन जनावरांचा मृत्यू झाला, अशी बातमी सध्या व्हाट्सअपच्या माध्यमातून सर्वत्र पसरत आहे.  खरे पाहिले तर लष्करी अळी पोटात गेल्यामुळे जनावर मरते हे मुळात खरे नाही किंबहुना असे आजपर्यंत कुठेही सिद्ध झालेले नाही. मग अशा अफवा का पसरत आहेत ? याचा विचार करता काही बाबी समोर येत आहेत.

ॲस्परजीलस बुरशीचा प्रादुर्भाव  

  • मका पिकावर ॲस्परजीलस बुरशीचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे मक्याची गुणवत्ता कमी होते. असा मका कोंबडी खाद्यामध्ये आल्यास त्यांचा मृत्य होतो. हे कुक्कुटपालकांना चांगले माहिती आहे. परंतु, महत्त्वाचे असे की बुरशीजन्य मक्याचा प्रतिकूल परिणाम जनावरांच्या आरोग्यावर देखील होतो. 
  • सध्याच्या वातावरणातील ओलावा ॲस्परजीलस बुरशीच्या वाढीस उपयुक्त आहे. सध्या सर्वत्र पाऊस पडत आहे. कापून ठेवलेला मका  पावसात भिजला आहे किंवा भिजत आहे. यामुळे ही बुरशी मक्यावर वाढते. असा बुरशीची वाढ झालेला मका जनावरांच्या खाण्यात आल्यास त्याचा यकृत व किडनीवर विपरीत परिणाम होऊन जनावर मरते.
  • जनावरांच्या मृत्यूला केवळ हेच कारण आहे असे नाही, कारण बुरशीने बाधित मक्याचा कोणता भाग जनावराच्या खाद्यात आला हे महत्त्वाचे आहे. ही बुरशी शक्यतो मक्याच्या दाण्यावर वाढते. असा बाधित मका खाद्यात आल्यास त्यापासून जनावरांना धोका असतो. अशावेळी शेतकऱ्याने प्रथम आपण पशुखाद्यात वापरत असलेला मका या बुरशीमुळे बाधित झालेला आहे की नाही, याची खात्री करून घ्यावी. हा मका चांगला असेल तरच पशुखाद्यामध्ये वापरावा.
  • ॲस्परजीलस बुरशीचा प्रादुर्भाव केवळ मक्यावर नव्हे, तर इतर वनस्पतींवर देखील होऊ शकतो. त्यामुळे पशुखाद्यात वापरण्यात येणारा चारा हा जास्त दिवस पावसात भिजलेला असू नये.
  • उपचार 

  •     चाऱ्यावर कोणत्या प्रकारच्या बुरशीचा प्रादुर्भाव झालेला आहे, हे तपासूनच उपचाराची दिशा ठरवावी लागते. त्यासाठी पशुवैद्यकाचा सल्ला महत्त्वाचा ठरतो. 
  • विषारी वनस्पतीची विषबाधा

  • केवळ कीटकनाशकांमुळे नव्हे, तर शेती बांधावर सर्वत्र उगवलेल्या विषारी वनस्पतीमुळे देखील जनावरांना विषबाधा होते. सध्या बऱ्याच भागात माठ किंवा काटे माठ या नावाने ओळखली जाणारी वनस्पती शेती बांधावर दिसत आहे. शिवाय बऱ्याच भागात निळ्या रंगाचे फुले असलेली वनस्पती (निळीफुली) शेती बांधावर दिसत आहे. अशा वनस्पती जनावरांच्या आहारात आल्यास विषबाधा होते. 
  • या विषबाधेवर उपचार उपलब्ध आहेत. विषबाधेची शंका जरी आली तरी तत्काळ पशुवैद्यकाद्वारे आपल्या जनावर उपचार करावेत.
  • विषबाधा होऊ नये यासाठी उपाययोजना 

  • कीटकनाशकांच्या रिकाम्या बाटल्या वापरात आणू नयेत.
  • कीटकनाशक फवारलेल्या पिकांचा चारा जनावरांना देऊ नये.
  • विषारी वनस्पती असलेले बांध तसेच कीडनाशक फवारलेल्या शेताच्या परिसरात जनावरे चरायला सोडू नयेत.
  • जनावरास विषबाधा झाली आहे, अशी शंका येताच सर्वप्रथम सध्या वापरात असलेले खाद्य बदलून नवीन खाद्य तपासणी नंतरच जनावरांच्या आहारात द्यावे. बाजूला ठेवलेले खाद्य पशुवैद्यकास दाखवावे.
  • जनावराच्या अंगावर जखमा किंवा खरचटलेले असेल तर गोचीड, उवा यांच्या नियंत्रणासाठी रासायनिक कीडनाशकांचा वापर करू नये.
  • कीटकनाशकांची विषबाधा      

  • शेतकरी पिकावर कीटकनाशकांची फवारणी करतात. नुकतेच कीडनाशकाची फवारणी केलेले पीक चारा जनावरांच्या खाद्यामध्ये आले तर त्यापासून विषबाधा होते.  
  • असाच काहीसा प्रकार काही भागात झालेला असावा, कारण आज मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांची फवारणी केली जात आहे. त्यामुळे नुकतीच फवारणी झालेले मका पीक चारा म्हणून जनावरांच्या खाद्यात आले असल्याने जनावरांना विषबाधा झालेली आहे. परंतु, आपला समज असा झाला की चाऱ्याबरोबरीने लष्करी अळी पोटात गेल्यामुळे जनावरांचा मृत्यू झाला आणि हे सर्वत्र पसरले.
  • बऱ्याच वेळा असे होते, की कीडनाशकाची फवारणी केली परंतु पाऊस आल्यामुळे फवारणी केलेले  कीटकनाशक पिकावरून धूवून गेले आणि असे पीक जनावराने खाल्ले. पावसामुळे कीडनाशक पिकावरून वाहून गेले, तरीदेखील जनावराला विषबाधा कशी झाली किंवा लष्करी अळी जनावरांच्या पोटात गेल्याने मृत्यू झाला का ? हा शेतकऱ्यांचा प्रश्न असतो. खरे पाहता पिकावरून पावसामुळे वाहून गेलेले कीटकनाशक शेतातच साठलेल्या पाण्यात काही प्रमाणात असते. जनावरे चरताना असे शेतात साचलेले पाणी पितात किंवा बऱ्याच वेळा शेताच्या शेजारी पिण्याच्या पाण्याचा स्रोत, तळे, ओढा असतो. या पाण्यात वाहून गेलेले कीटकनाशक असू शकते. अशा  पाण्यापासून देखील जनावरांना विषबाधा होते.
  • जनावरांमध्ये विषबाधा होण्याची कारणे 

  •  कीटकनाशकांच्या फवारणीनंतर रिकाम्या बाटल्या शेती बांधावर फेकून दिल्या जातात किंवा त्या धुऊन इतर कामासाठी वापरल्या जातात. हे अतिशय धोकादायक आहे. अशा बाटल्यांपासून विषबाधा होण्याची शक्यता असते.
  • बऱ्याच वेळा फवारणीकरून उरलेली कीटकनाशके ही घराच्या बाहेर, गोठ्याच्या भिंतीशेजारी ठेवली जातात. अनावधानाने ही कीटकनाशकांची बाटली किंवा पावडर जनावरांनी चाटली तरीदेखील विषबाधा होते.
  • विषबाधा झालेली गाय, म्हशीपासून तिचे दूध पिणाऱ्या वासरास विषबाधा होऊ शकते. 
  • बऱ्याच वेळा जनावरांच्या अंगावर उवा, गोचीड  नियंत्रणासाठी शिफारशीत कीडनाशकांची फवारणी केली जाते. जर जनावरांच्या अंगावर जखम किंवा खरचटलेले असेल तर कीटकनाशकाची विषबाधा होते. 
  • कोणत्या प्रकारचे कीटकनाशक पिकावर फवारलेले आहे, हे तपासून उपचाराची दिशा ठरवावी लागते. त्यासाठी पशुवैद्यकाचा सल्ला महत्त्वाचा ठरतो.
  • - डॉ. सुधीर राजूरकर, ९४२२१७५७९३ (औषधी व विशेष शास्त्र विभाग, पशुवैद्यक महाविद्यालय, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com