जनावरांतील विषबाधा टाळा

आजारी जनावरांची योग्य काळजी घ्यावी.
आजारी जनावरांची योग्य काळजी घ्यावी.

शेतात बियाणे प्रक्रिया करताना नजरचुकीने काही वेळा बुरशीनाशकाच्या पुड्या तशाच शेतात टाकल्या जातात. या पुड्या जनावरांच्या आहारात आल्यास त्यांना विषबाधा होते. त्यामुळे सध्याच्या पेरणीच्या काळात जनावरांना बुरशीनाशकांची विषबाधा होणार नाही याची काळजी घ्यावी.

बियाण्यासोबत बुरशीनाशकाची पुडी दिलेली असते. कंपनीच्या मार्गदर्शक माहितीनुसार प्लॅस्टिक हातमोजे घालून बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करणे महत्त्वाचे असते. परंतु काही शेतकरी बुरशीनाशक हाताने बियाण्यामध्ये मिसळतात. चुकीच्या पद्धतीने बीजप्रक्रिया केल्याने हाताची चणचण होणे, डोळ्यांत जळजळ अशी लक्षणे दिसून येतात. हे सर्व टाळण्यासाठी बहुतांश शेतकरी बीजप्रक्रिया करणेच टाळतात. बियाण्यासोबतची बुरशीनाशकाची पुडी शेती किंवा बांधावर फेकून देतात. अजाणतेपणे फेकून दिलेल्या बुरशीनाशकाच्या पुड्या शेतात चरणाऱ्या जनावरांच्या खाद्यात जाण्याची शक्यता असते. त्यामुळे विषबाधा होते. 

विषबाधेची शक्यता 

  • जनावरांना बुरशीनाशकाची विषबाधा दोन पद्धतीने झाल्याचे आढळून येते. जर बुरशीनाशकाची पुडी पेरणी करताना शेतात फेकून दिली असेल तर मशागत करतेवेळी बैल अजाणतेपणे अशी पुडी चघळतात किंवा पूर्णपणे खाऊन टाकतात. अशा घटना सध्याच्या काळात घडलेल्या आहेत. 
  • बुरशीनाशकाची पुडी बांधावर फेकून दिली असेल तर मशागतीनंतर बैल किंवा इतर जनावरे त्या बांधावर चरण्यासाठी आणल्यावर गवताच्या बरोबरीने ही पुडी जनावरांच्या आहारात जाते. त्यामुळे विषबाधा होण्याची शक्यता असते. 
  •  जनावरांच्या आहारात बुरशीनाशक पावडर जास्त प्रमाणात (एक पुडी) गेली असेल तर त्यांना तीव्र विषबाधा होऊन दगावू शकतात. 
  •  बुरशीनाशकाची विषबाधा ही बैलांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येते. काही प्रमाणात सोयाबीन पेरणी केलेल्या शेताच्या बाजूस चरावयास सोडलेल्या गायी-म्हशींमध्येही आढळून येते. 
  • विषबाधा टाळण्यासाठी उपाययोजना

  • बियाणे व बुरशीनाशकासोबत दिलेल्या मागर्दर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे. 
  •  बियाणे प्रक्रिया करण्यासाठी प्लॅस्टिक हातमोजे, गम बूट व टोपी परिधान करावी, जेणेकरून शेतकऱ्यांना विषबाधा होणार नाही.
  • बुरशीनाशक पावडर हाताळताना ती तोंडावाटे किंवा श्वसनातून शरीरात जाणार नाही याची काळजी घ्यावी. 
  •  बियाणे तसेच शेतीमध्ये लागणारी कीटकनाशके जनावरांच्या गोठ्यात ठेवणे कटाक्षाने टाळावे, जेणेकरून जनावरांना अपघाती विषबाधा होणार नाही. 
  • शेतीसाठी लागणारी कीटकनाशके, बुरशीनाशके ही शेती, जनावरांचा गोठा किंवा परिसरात फेकून देऊ नयेत. याउलट ती सुरक्षित ठिकाणी जतन करून ठेवावीत. 
  •  शिल्लक राहिलेल्या कीडनाशकांच्या पुड्या किंवा पाकिटे यांची योग्य विल्हेवाट लावावी. कोणत्याही परिस्थितीत कीडनाशकांच्या पिशव्या किंवा डबे शेत तसेच गोठ्याच्या परिसरात फेकून देऊ नये.
  • विषबाधेची लक्षणे 

  •  अंग थरथर कापणे, सुस्तपणा येतो.
  •  तोंडातून मोठ्या प्रमाणात लाळ पडते. 
  •  दाताचा कर कर असा आवाज येतो.
  •  पोटदुखीमुळे जनावर ऊठ-बस करते. 
  •  पोट फुगते, हगवण लागते. 
  •  तीव्र विषबाधा झाल्यास जनावर दगावते.
  •  काळजी 

  • बुरशीनाशकाच्या विषबाधेवर उपचारासाठी कोणतेही प्रतिऔषध उपलब्ध नाही. त्यामुळे बाधित जनावरांना तत्काळ पशुवैद्यकाच्या सल्ल्याने योग्य उपचार करून घ्यावेत. 
  • जनावराचे पोट रिकामे करण्यासाठी रेचक औषधे, सलाइन, ॲट्रोपीन सल्फेट व तत्सम उपचार करून घ्यावेत. 
  •  विषबाधेने ग्रस्त जनावर साधारणपणे ३ ते ५ दिवस देखरेखीखाली ठेवावे. योग्य उपचार केल्यास कमी ते मध्यम विषबाधा झालेली जनावरे वाचवता येतात. 
  •    - डॉ. जाधव, ९४०४२७३७४३  - डॉ. भिकाने, ९४२०२१४४५३ (पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com