रेबीजकडे नको दुर्लक्ष...

कुत्र्यांच्या चाव्यामुळे रेबीज आजाराचा प्रसार होतो. प्रभावी औषधोपचार नसल्यामुळे लसीकरण हा एकमेव उपाय आहे. त्यासाठी सर्व पाळीव आणि भटक्या कुत्र्यांना लसीकरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
 rabies disease in dogs
rabies disease in dogs

कुत्र्यांच्या चाव्यामुळे रेबीज आजाराचा प्रसार होतो. प्रभावी औषधोपचार नसल्यामुळे लसीकरण हा एकमेव उपाय आहे. त्यासाठी सर्व पाळीव आणि भटक्या कुत्र्यांना लसीकरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. रेबीज हा अत्यंत घातक विषाणूजन्य आजार आहे. सन २०३० पर्यंत या आजाराचे उच्चाटन करायचे ध्येय ठेवण्यात आले आहे. कुत्र्यापासूनच या आजाराचा प्रसार होतो. जगातील सर्वात गंभीर असा हा प्राणिजन्य आजार आहे. कुत्र्याबरोबरच मांजर, कोल्हा, वटवाघूळ यासह ज्या प्राण्यांना त्यांच्याकडून चावे होतात ते सर्व या रोगामुळे संक्रमित होतात.

  • १८८५ मध्ये लुई पाश्चर यांनी या आजाराच्या प्रतिबंधक लसीच्या संशोधनानंतर अमेरिकेसारख्या देशांनी मानवातील मृत्यूचे प्रमाण प्रति वर्षी दोन पर्यंत खाली आणले.
  • डिसेंबर, २०१५ मध्ये जिनिव्हा येथील जागतिक रेबीज परिषदेत जागतिक आरोग्य संघटनेने सन २०३० पर्यंत या आजाराच्या समूळ उच्चाटनासाठी जागतिक समुदायाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्याला अनुसरून प्रतिसाद देत भारत सरकारच्या असोसिएशन फॉर प्रिव्हेन्शन अॅंड कंट्रोल ऑफ रेबीज इन इंडिया (एपीसीआरआय) या संस्थेने बेंगलूरू येथील जुलै, २०१६ मध्ये झालेल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्युरो सायन्स अँड मेंटल हेल्थ येथे आयोजित रेबीजच्या अठराव्या राष्ट्रीय परिषदेत जागतिक आरोग्य संघटनेच्या आव्हानाला पाठिंबा दिला.
  • आपल्याकडे सार्वजनिक आरोग्याच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. रेबीजचा प्रादुर्भाव झाल्यावर मृत्यू हा ठरलेला आहे. रेबीज लस आणि इम्युनोग्लोब्युलीन मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून देखील आजही आपण या आजारावर नियंत्रण मिळवू शकलो नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्नांची गरज आहे. सर्वच ठिकाणी आरोग्य विभागात रेबीज आजाराविषयी एकूणच उदासीनता ही काळजी वाढवणारी आहे.
  • जागतिक आरोग्य संघटना (डब्लुएचओ) जागतिक प्राणी आरोग्य संघटना (ओआयई) आणि अन्न व कृषी संघटना (एफएओ) यांनी रेबिजचा समावेश ‘वन हेल्थ कन्सेप्ट'मध्ये केला आहे.
  • आजाराच्या नियंत्रणासाठी नियमित कुत्र्याचे रेबीज आजार प्रतिबंधक लसीकरण त्याचबरोबर जिल्हास्तरावर स्थानिक पशुवैद्यकीय अधिकारी, शासनाचे आरोग्य अधिकारी, खासगी वैद्यकीय अधिकारी यांच्यामध्ये चर्चासत्रे, कार्यशाळा आयोजित करणे महत्त्वाचे आहे. जगातील काही देश या आजारापासून मुक्त झाले आहेत. आपण देखील नियमितपणे प्रभावी लोकशिक्षण, लसीकरण आणि त्यासाठी शासनाची भक्कम साथ मिळाली तर निश्चितपणे या आजारातून मुक्त होऊ शकतो.
  • मानवातील आजाराची लक्षणे 

  • पिसाळलेले कुत्रे किंवा इतर बाधित जनावरे चावली की साधारण दोन महिने या आजाराची लक्षणे दिसण्यास सुरूवात होते. त्यातही चावलेली जागा आणि प्रत्यक्ष त्यावेळी किती विषाणूंची संख्या त्या जखमेतून शरीरात गेली, यावर आजाराची लक्षणे दिसण्याचा कालावधी अवलंबून आहे. तो एक आठवड्यापासून एक वर्षांपर्यंत असू शकतो. काही ठिकाणी दोन-तीन वर्ष सुद्धा लागण्याची उदाहरणे आहेत.
  • चावलेल्या जागेतून हे विषाणू मज्जातंतूच्या साह्याने मेंदूकडे जातात. डोकेदुखी, ताप येणे यासारखी प्राथमिक लक्षणे दिसतात. नंतर हळूहळू स्नायूंचा लकवा, पॅरॅलिसिस यामुळे पाणी पिण्यासाठी, बोलण्यासाठी अडथळा निर्माण होतो. पाण्याची भीती वाटते. त्यामुळे या रोगाला हायड्रोफोबिया म्हणतात.
  • आजारामुळे आवाज स्पष्ट निघत नाही. उत्साहितपणामुळे धडपड वाढते. आवाजातील बदलामुळे ओरडणे देखील विचित्र वाटते.
  • ठराविक काळानंतर मेंदूला सूज येऊन त्या ठिकाणी रक्त जमा होते. हृदयक्रिया बंद पडून मृत्यू होतो.
  • जनावरांतील आजाराची लक्षणे 

  • जनावरांच्यामध्ये विविध लक्षणे दिसतात. जनावरे जादा उत्साहित होऊन धावतात, चावा घेण्याचा प्रयत्न करतात. पाणी पिताना त्रास होतो.
  • डोळ्यांमध्ये एक प्रकारचे रितेपण जाणवते, मालकाला देखील ओळखत नाहीत.
  • पुष्कळ वेळेला जनावरांतील रेबीज सुरवातीच्या काळात ओळखणे खूप अवघड असते. त्यामुळे सर्व पशुपालकांनी खूप सावध असावे.
  • कुत्रा, मांजराच्या वागणुकीतील बदल आपल्याला नोंदवता आला पाहिजेत. त्याचबरोबर पशुवैद्यकाचा सल्ला महत्त्वाचा ठरतो.
  • लसीकरण महत्त्वाचे 

  • कुत्र्यांच्या चाव्यामुळे आजाराचा प्रसार होतो. प्रभावी औषधोपचार नसल्यामुळे लसीकरण हा एकमेव उपाय आहे. त्यासाठी सर्व पाळीव व भटक्या कुत्र्यांना लसीकरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
  • कोणतेही कुत्रे पाळीव किंवा भटके असेल आणि ते चावले तर जास्त काळजी घेणे आवश्यक आहे.
  • चावल्यानंतर तत्काळ तीन तासाच्या आत डॉक्टरांच्या सल्ल्याने लसीकरण सुरू करावे, जखम तत्काळ वाहत्या पाण्यात धुऊन घ्यावी. साबण,पोव्हिडन आयोडीन किंवा निर्जंतुक द्रावणाचा वापर करावा.
  • डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. लसीकरण करून घ्यावे.
  • वेळ पडल्यास जखम आणि चावा पाहून इम्युनोग्लोब्युलीनचा वापर केल्यास जीव निश्चित वाचू शकतो.
  • पाळीव कुत्रा,मांजरांना वार्षिक रेबीज रोग प्रतिबंधक लसीकरण करून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
  • लसीकरणाबाबत लोक जागृती ही अत्यंत गरजेची आहे. विशेषतः प्रयोगशाळेतील तंत्रज्ञ, पशुवैद्यकीय अधिकारी, कर्मचारी जंगलातील वनविभागाचे कर्मचारी, अधिकारी तसेच जंगलाच्या आसपास राहणारे रहिवासी यांना देखील प्रतिबंधक लसीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे.
  • संपर्क- डॉ.व्यंकटराव घोरपडे, ९४२२०४२१९५ (सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त(पशुसंवर्धन), सांगली.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com