सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’ उपयुक्त

सांडपाणी शुद्धीकरणासाठी रीड बेड पद्धतीचा वापर फायदेशीर ठरतो
सांडपाणी शुद्धीकरणासाठी रीड बेड पद्धतीचा वापर फायदेशीर ठरतो

रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची कार्यक्षमता उत्तम असते. प्रक्रिया केलेले पाणी स्वच्छ असते, त्याला दुर्गंधी येत नाही, त्याला रंग नसतो. त्यामध्ये मस्त्यपालन होऊ शकते. हे पाणी झाडांच्या चांगल्या वाढीसाठी उपयोगी पडते. एकदा व्यवस्थित सुरू झाल्यावर रीड बेड पद्धती सर्वसाधारणपणे पाणी कमीजास्त प्रमाणात आले तरीही उत्तम  प्रकारे काम करते.

मागच्या भागामध्ये आपण नागरी आणि ग्रामीण भागातील पर्जन्यजल संधारणाबद्दल माहिती घेतली. तंत्रज्ञान वापरून आधुनिक यंत्रणेच्या सहाय्याने सांडपाणी व्यवस्थापन करणे सहजशक्य आहे. पण ही पद्धत वापरताना त्याचा भांडवली खर्च, यंत्रणा चालवण्यासाठी लागणारी ऊर्जा, त्यासाठी आवश्यक स्रोतांची उपलब्धता, त्यासाठी होणारा खर्च, या यंत्रणेचा देखभाल खर्च इत्यादी गोष्टींचा विचार झाल्यावर बरेच लोक हा पर्याय वापरणे टाळतात. पण पाणीटंचाई तर वस्तुस्थिती आहे आणि सांडपाणी व्यवस्थापन हा अत्यंत गंभीर मुद्दा झाला आहे. महानगरांमध्ये तर परिस्थिती आणखी वाईट झाली आहे कारण सांडपाणी एकत्र होते, पण त्यावर पुरेशी प्रक्रिया करणे सध्यातरी जवळपास अशक्य दिसते. अशा परिस्थितीमध्ये जर तुमच्याकडे पुरेशी मोकळी जागा किंवा छोटी बाग उपलब्ध असेल, तर एक पर्यावरण स्नेही मार्ग आहे ज्याचा उपयोग करून आपण सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी दुय्यम वापरासाठी परत वापरू शकतो. या तंत्राला रीड बेड पद्धती असे म्हणतात. 

अशी आहे रीड बेड पद्धती 

  • वनस्पतींच्या ज्या प्रजाती जास्त पाण्यामध्ये चांगल्या जगू शकतात, ज्यांना पाणी आवडतं, त्यांना इंग्रजीमध्ये रीड्स (Reeds – water loving plants) असे म्हणतात. या प्रकारची झाडे वापरून केली जाणारी प्रक्रिया म्हणून याला तसं नाव आहे. या पद्धतीला  कंस्ट्रटेड वेटलॅंड पद्धती असंही नाव आहे, कारण यामध्ये आपण बांधकाम करून एक अशी जागा तयार करतो, ज्यात एका बाजूने सांडपाणी सोडले जाते आणि त्यावर प्रक्रिया होऊन ते दुसऱ्या बाजूने बाहेर पडते. हे पाणी दुय्यम वापरासाठी उपयोगी पडू शकते.
  • विशिष्ट वातावरणात वाढवून प्रक्रियेसाठी तयार केलेली झाडे आणि सांडपाण्याच्या प्रतीप्रमाणे त्यात वापरण्यासाठी तयार केलेले विशिष्ट जीवाणू मिश्रण अशा दोन घटकांच्या सहाय्याने सांडपाणी प्रक्रिया यशस्वी करता येते. ही सर्व प्रक्रिया या झाडांची मुळे आणि जिवाणू यांच्या कामामुळे होत असल्याने या पद्धतीला  ‘रूट झोन’ पद्धती असंही म्हटले जाते. सुमारे चार दशकांपूर्वी जर्मनी, युरोप आणि अमेरिकेत झालेल्या सांडपाणी प्रक्रियेच्या अनेक प्रयोगांमधून या पद्धतीचा उगम झाला. जर्मनीमध्ये संशोधकांच्या असं लक्षात आलं की नैसर्गिक पाणथळ जागांमध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. त्या पद्धतीचा अभ्यास करून त्यानंतर बंदिस्त जागेत झाडे आणि जिवाणू मिश्रण वापरून सांडपाणी प्रक्रिया करणे यावर प्रयोग झाले आणि ही पद्धत वापरात आली.
  • अशी होते शुद्धीकरण प्रक्रिया

  •  या पद्धतीमध्ये विशिष्ट प्रकारे वाढवलेल्या झाडांची मुळे आणि अत्यंत प्रभावशाली जिवाणू मिश्रण यांचा वापर करून सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. यात झाडांच्या मुळांचा उपयोग पाणी गाळून घेण्यासाठी आणि विघटनासाठी लागणारा प्राणवायू पुरवण्यासाठी होतो आणि जिवाणू कचरा विघटन करण्याचे काम करतात. प्रक्रिया झालेले पाणी दुय्यम वापरासाठी उपयोगात आणता येते.
  •  या पद्धतीमध्ये सांडपाणी एका सुयोग्य ठिकाणी एकत्र करून आणले जाते. आवश्यकता असेल तर अस्तित्त्वात असलेल्या सेप्टीक टॅंकमध्ये काही सुधारणा केल्या जातात. त्यातून सांडपाणी पुढे पाठवले जाते. हे पाणी त्यानंतर रीड बेड सिस्टिममधून पुढे पाठवले जाते. एका टोकाकडून हे सांडपाणी दुसऱ्या टोकापर्यंत जाईपर्यंत त्यावर झाडांच्या मुळांशी जिवाणूंच्या सहाय्याने प्रक्रिया केली जाते.
  •  यामध्ये प्रक्रियेसाठी उपलब्ध पाण्याचे गणित मांडून त्यानुसार एका जलरोधक टाकीचे बांधकाम केले जाते. त्या टाकीला एक ठरावीक उतार दिला जातो. त्या टाकीमध्ये योग्य प्रकारे दगडगोटे, रेती, माती यांचे थर रचले जातात. मातीचा थर भरताना त्यात तयार केलेलं विशिष्ट जिवाणू मिश्रण नीट मिसळले जाते. त्यानंतर या टाकीमध्ये प्रक्रियेसाठी विशेष पद्धतीने वाढवलेली निवडक झाडे लावली जातात. या सर्व झाडांची मुळे जमिनीखाली एक उत्तम जाळं तयार करतात आणि जिवाणूंच्या सहाय्याने सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते शुद्ध करतात. 
  •  प्रक्रिया केलेले पाणी टाकीच्या दुसऱ्या टोकाकडून एका छोट्या तलावात किंवा उघड्या टाकीत आणले जाते. तिथे त्यामध्ये सूर्यप्रकाश जाईल याची सोय केली जाते आणि काही काळ हे पाणी त्या टाकीत ठेवून मग दुय्यम वापरासाठी आवश्यक तिथे नेले जाते.
  •  ही पद्धत व्यवस्थापन आणि देखभाल करायला अत्यंत कमी खर्चाची आहे. यासाठी फार प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता नसते. त्यातूनही, जर योग्य जागा मिळाली तर ही पद्धत रोज वापरण्यासाठी तसेच देखभालीसाठी अजिबात खर्च करावा लागत नाही. 
  • रीड बेड पद्धतीची वैशिष्ट्ये 

  •  कार्यक्षमता  ः या प्रक्रिया पद्धतीची कार्यक्षमता उत्तम असते. प्रक्रिया केलेले पाणी स्वच्छ असते, त्याला दुर्गंधी येत नाही, त्याला रंग नसतो. त्यामध्ये उत्तम मस्त्यपालन होऊ शकते. तसेच हे पाणी झाडांच्या चांगल्या वाढीसाठी उपयोगी पडते.
  •  स्वच्छ आणि दुर्गंध न येणारी प्रक्रिया ः  यामध्ये सांडपाणी प्रक्रिया पूर्णत: पृष्ठभागाखाली घडवली जाते. झाडांची मुळे पुरेसा प्राणवायू पुरवठा करतात आणि त्यामुळे कुठेही दुर्गंध येत नाही. त्याचप्रमाणे, पाणी पृष्ठभागाच्या खाली राहत असल्याने डासांचा प्रादुर्भाव होत नाही.
  •  ऊर्जेची आवश्यकता ः  पारंपरिक प्रक्रिया यंत्रणांमध्ये पाण्यामध्ये प्राणवायूचा पुरवठा व्हावा आणि जिवाणूंना आवश्यक तो प्राणवायू मिळावा, यासाठी सतत बाहेरून प्राणवायू पुरवठा करावा लागतो. रीड बेड पद्धतीमध्ये या प्रकारच्या यंत्रणेवर खर्च करावा लागत नाही कारण आवश्यक तो प्राणवायू झाडे पुरवतात.
  •  देखभाल खर्च ः  यामध्ये यांत्रिक भाग कमीतकमी असल्याने त्यांची देखभाल, दुरुस्ती, बदल, इत्यादी गोष्टी कराव्या लागत नाहीत. सर्व प्रक्रिया झाडे आणि जिवाणू यांच्या कामामुळे होत असल्याने यासाठी अतिशय कमी, कधी कधी तर शून्य देखभाल खर्च लागतो. 
  •  प्रक्रिया यंत्रणा म्हणजेच उत्तम बाग  ः पारंपरिक प्रक्रिया पद्धतीमध्ये यंत्र असल्याने ती वेगळी दिसते आणि त्याचाही देखभाल खर्च असतो. पण रीड बेड सिस्टीममध्ये विशेष प्रकारे वाढवलेली झाडं, विशेषत: फुलझाडं, असल्याने ती एखाद्या बागेसारखी दिसते आणि त्या परिसराचं सौंदर्य वाढवते. 
  •  बांधा, सुरू करा आणि विसरून जा  ः एकदा व्यवस्थित सुरू झाल्यावर रीड बेड पद्धती सर्वसाधारणपणे पाणी कमीजास्त प्रमाणात आले तरीही उत्तमप्रकारे काम करते. या पद्धतीला परत परत सुरू करायची गरज पडत नाही. अगदी एखादा महिना सांडपाणी आले नाही तरीही ही पद्धत चांगल्या कार्यक्षमतेने परत काम करू शकते.
  •  वापर ः दररोज अगदी हजार लिटर्स पासून अगदी काही लाख लिटर्स पर्यंत सांडपाणी या पद्धतीने उत्तमरित्या प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर दुय्यम कारणांकरिता आणि शेतीकरिता केला जाऊ शकतो. ही पद्धत नागरी भागातील इमारती, शाळा, निवासी शाळा आणि महाविद्यालये, हॉटेल्स, व्यापारी आस्थापने, उद्याने, इत्यादी ठिकाणी वापरली जाते. मात्र, हे करताना योग्य आणि अनुभवी तज्ज्ञाचा सल्ला आणि मार्गदर्शन दूरगामी यशासाठी अनिवार्य आहे. काय काम करायचं, कुठे करायचं, किती प्रमाणात करायचं इत्यादी तांत्रिक बाबींमध्ये तज्ज्ञाचा सल्ला आणि मत हे अत्यावश्यक आहे.
  • - डॉ. उमेश मुंडल्ये, ९९६७०५४४६०

    (लेखक पाणी, पर्यावरण आणि शेती विषयाचे अभ्यासक आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com