ग्रामविकास, शिक्षण अन् शेतीतील दिशान्तर

दुर्गम भागात पाणी पुरवठा टाकीची उभारणी.
दुर्गम भागात पाणी पुरवठा टाकीची उभारणी.

आर्थिक दुर्बल, भूमिहीन व अल्पभूधारक शेतकरी, विद्यार्थी, महिलांच्या जीवनात सक्षमता निर्माण करण्यात चिपळूण (जि. रत्नागिरी) येथील दिशान्तर संस्थेला यश आले आहे. लोकसहभागातून सह्याद्री डोंगररांगांतील वाड्या-वस्त्यांमध्ये पाणी, वीज, आरोग्य, निवारा, शिक्षण अशा पायाभूत सेवासुविधा संस्थेने विकसित केल्या आहेत. दुर्गम भागातील लोकांच्या शाश्वत विकासासाठी चिपळूण (जि. रत्नागिरी) येथील दिशान्तर या स्वयंसेवी संस्थेचे काम सुरू आहे. संस्थेची नोंदणी २०१२ मध्ये झाली असली तरी पूर्वीपासून संस्थेच्या सदस्यांचे ग्रामविकासाचे काम सुरू होते. संस्थेच्या माध्यमातून गावातील कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यातून विविध विकासकामे ग्रामीण भागात सुरू आहेत. अन्नपूर्णा प्रकल्पाची सुरवात  महिला बचत गटाच्या माध्यमातून संस्थेने अन्नपूर्णा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला. वेहेळे गावातील राजवीरवाडीमध्ये सामुदायिक शेतीसाठी भाग्यश्री व प्रगती हे दोन महिलांचा गट आत्माअंतर्गत नोंदणीकृत करण्यात आले. तुकड्यातुकड्याच्या शेतीवर सामुदायिक शेतीची सुरवात झाली. अल्पभूधारक व भूमिहीन शेतकऱ्यांसाठी गट शेतीतून नवी अर्थव्यवस्था उभी राहिली. त्यामुळे खरिपात भात शेती आणि रब्बी हंगामात सामूहिक शेतीतून भाजीपाला लागवड वाढली. संस्थेने महिला शेतकऱ्यांना पीक व्यवस्थापनाबाबतचे मार्गदर्शन केले. काही कंपन्यांच्या माध्यमातून या गटांना सुधारित बियाणे, खते, यंत्रसामग्रीची मदत करण्यात आली. शाश्वत पाणी व्यवस्थापनासाठी लोकसहभागातून नदीवर बंधारे बांधण्यात आले. संस्थेच्या माध्यमातून गटाला पॉवर टिलर, मोबाइल राइस मिल, भात मळणी यंत्र देण्यात आले. याशिवाय पाइप, पंप, बियाणे खरेदीसाठी सहकार्य करण्यात येते. सामूहिक शेतीच्या माध्यमातून गटातर्फे मेथी, पालक, मिरची, माठ, कोबी, वांगी, भेंडी, फ्लॉवर, पडवळ, कारले, दोडके, तोंडली, दुधी भोपळा, भोपळा तसेच कलिंगड लागवड केली जाते. सेंद्रिय पद्धतीने पीक उत्पादनावर गटाचा भर आहे. महिला गटाने चिपळूण शहरात स्वतःची विक्री व्यवस्था उभी केली आहे. वाहतुकीसाठी चार चाकी गाडीदेखील घेतली. गेल्या तीन वर्षांत सहकारातून शेतीचे क्षेत्र पंचवीस एकरांवर पोहोचले आहे. या प्रकल्पातून लाखो रुपयांची उलाढाल होते.  संस्थेच्या माध्यमातून सामूहिक शेतीचे काम चिपळूण तालुक्यातील मोरवणे- खालचीवाडी, मोरवणे- गुरववाडी, कळवंडे-सातीनवाडी, मांडवखरी या गाव- वाड्यांत सुरू झाले आहे. याठिकाणच्या सहकारातून सामुदायिक शेतीचा आवाका १०० एकरांवर पोहोचला आहे. शेतीच्या बरोबरीने शेळी व कुक्कुटपालन, गो-पालन, आळिंबी उत्पादन, मसाला पिकांच्या लागवडीवर भर देण्यात आला आहे. गेल्या तीन वर्षांतील सामूहिक शेतीमधील प्रगती लक्षात घेऊन महिला गटांना राज्य शासनातर्फे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. स्वच्छता, आरोग्य आणि पाणीपुरवठा योजना 

  •  निरबाडे, दळवटणे, पोफळी येथील आर्थिकदृष्ट्या दुर्बल ९८ कुटुंबीयांसाठी वैयक्तिक शौचालये.
  •  आकले येथील ३०० लोकवस्तीसाठी १० सीटर सार्वजनिक शौचालय, १२५ कुटुंबांसाठी जलशुद्धीकरण यंत्राची उपलब्धता. ओवळी- कातकरवाडीमध्ये कूपनलिका आणि दहा हजार लिटर क्षमतेची टाकी.
  •  देवखेरकी येथील सुतारवाडीमध्ये विहीर दुरुस्ती तसेच पाणी पंप, एक कि.मी. पाइपलाइन, दहा हजार लिटर क्षमतेची पाणी टाकी उभारणी.
  •  निरबाडे- खिंडवाडी येथे आदर्शवत वनवासी वस्ती सुधारणा कार्यक्रम. घर दुरुस्तीच्या बरोबरीने प्रत्येकाच्या घरात वीज, पाणी, शौचालये, सौरदिवे, शुद्ध पाण्यासाठी वॉटर प्युरिफायर. अशाच पद्धतीचे काम आकले, तिवरे, नांदिवसे, दळवटणे, ओवळी, पोसरे यांसारख्या गावखेड्यांतील वस्त्यांवर सुरू आहे. 
  •  दुर्बल घटकांना एक दिवसाचे आरोग्य शिबिर न ठेवता औषधोपचार. पाठपुराव्यासोबत जास्तीचे उपचार, विशेष तज्ज्ञांकडून घ्यावे लागणारे उपचार, शस्त्रक्रिया यांसारख्या दीर्घकालीन आणि खर्चिक प्रक्रियेसाठी संस्थेकडून आर्थिकदृष्ट्या सहकार्य. 
  • ग्रामविकास, आरोग्य, शिक्षण आणि कृषी क्षेत्रातील कामाबद्दल संस्थेला नेहरू युवा केंद्र, कृषी विभाग, वालावलकर रुग्णालयाने सन्मानित केले आहे.
  • महिला सक्षमीकरणाचे ‘उडान'  ग्रामीण भागातील गरीब व निम्न मध्यमवर्गीय कुटुंब हे केंद्रस्थानी ठेवून संस्थेतर्फे उडान प्रकल्प राबविण्यात येत आहे. प्रत्येक गरीब कुटुंबातील किमान एका महिलेचा समावेश असलेल्या स्वयंसाहाय्यता समूहाचे बळकटीकरण करणे, आर्थिक सहकार्यासह गट स्वयंपूर्ण होण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य या प्रकल्पाच्या माध्यमातून करण्यात येते. व्यवसाय व रोजगाराच्या निरंतर उपक्रमातून आर्थिक सबलतेकडे जाण्यासाठी महिलांना यंत्रसामग्रीदेखील देण्यात आली. यासाठी कोणत्याही स्वरूपाची प्रशिक्षण रक्कम, प्रारंभीचा कच्चा माल, यंत्रे हा व यापैकी इतर कोणताही अधिभाराचा बोजा गटातील महिलांना भरावा लागत नाही. संस्थेच्या सचीव सीमा यादव या उपक्रमाचे नियोजन करतात.

  •  दहिवली (ता. चिपळूण) येथील जय हनुमान महिला स्वयंसाहाय्यता गटाशी चर्चा करून कागदी पत्रावळी, द्रोण, डिश निर्मिती उद्योगाची निवड करण्यात आली. महिलांना पुणे येथे व्यवसायाचे रीतसर प्रशिक्षण घेण्यात आले. दीड लाख रुपयांची यंत्रणा आणण्यात आली. केवळ दोन महिन्यांत पन्नास हजारांची उलाढाल महिला गटाने केली. 
  •  मुंढे येथील आराधना गटाला लेदर बॅगनिर्मिती प्रशिक्षण देण्यात आले. विविध प्रकारच्या पर्स, बॅज, पाऊच, शर्ट व साडी कीट अशा वस्तूंच्या निर्मितीसाठी कच्चा माल व उत्पादित वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध झाली. या गटाला दुसऱ्या टप्प्यातील कच्चा माल आणि चार शिलाई यंत्र श्रीसाई स्वाध्याय मंडळ, गोवा यांच्याकडून देण्यात आली. या गटाने बनविलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री पुणे शहरातील मॉलमध्ये झाली. स्थानिक बाजारपेठेसह मुंबई, पुणे येथील बाजारपेठेत महिलांनी बनविलेल्या वस्तू विक्रीला जाऊ लागल्या आहेत.
  • संस्थेचे उपक्रम 

  •   वंचित व आर्थिक दुर्बल वस्ती विकास  
  • जीवनावश्‍यक साहित्याचे वाटप
  •   शुद्ध पाण्यासाठी बीएआरसी वॉटर फिल्टरचे वाटप  
  • दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी पुस्तकपेढी, शाळांसाठी संगणक भेट
  •   वस्तीसाठी सार्वजनिक शौचालयाची उभारणी  
  • वाडी-वस्तीमध्ये पाणीपुरवठा योजना    
  • आरोग्य शिबिरांचे आयोजन    
  • बचत गटांना मार्गदर्शन व साहाय्य
  •  मुलींसाठी विविध कृतीयुक्त उपक्रम, तसेच मानसिक व बुद्ध्यांक परीक्षा
  • व्यसनाधीनता, अशिक्षितपणा, अनारोग्य याबाबत जाणीव-जागृती    कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्वाच्या सहकार्याने शेतीविकास, पाणीपुरवठा, आरोग्यविषयक उपक्रम
  • शिष्यवृत्ती आणि पुस्तक पेढीचा उपक्रम    आर्थिक परिस्थितीमुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये अडथळे येतात. हे लक्षात घेऊन संस्थेने गरजू विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरू केली. या योजनेत शिष्यवृत्तीची रक्कम ८ लाख ९९ हजारांपर्यंत गेली आहे.    ज्ञानयज्ञ प्रकल्पाच्या माध्यमातून प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासह दप्तर, एसटी पास दिला जातो.    श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास आणि संस्थेच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्ह्यातील २७ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये मोफत पुस्तक पेढी उपक्रम राबविला जातो. गेल्या पाच वर्षांत पंचवीस हजार विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे.    गेल्या पाच वर्षांपासून विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. गतवर्षी सर दोराबजी टाटा ट्रस्टने मदत केली. यातून २८ विद्यार्थ्यांना २ लाख ८० हजारांची शिष्यवृत्ती देण्यात आली.

     - राजेश जोष्टे, ९८२२९८७४१० (लेखक दिशान्तर संस्थेचे अध्यक्ष आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com