नंदुरबारची वैशिष्ट्यपूर्ण सातपुडी कोंबडी

गावठी कुकडी
गावठी कुकडी

बाएफ संस्थेतील तज्ज्ञांनी सातपुडी कोंबड्यांच्या शारीरिक गुणधर्माची नोंदणी केली. सर्वेक्षणात असे आढळून आले की, या कोंबडीवाढीचा वेग चांगला, अधिक अंडी उत्पादन क्षमता, चांगली रोगप्रतिकारक्षमता असल्याने परसातील कुक्कुटपालनासाठी ही योग्य जात आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेकडे सातपुडा ही पर्वतरांग आहे. ही पर्वतरांग महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांना जोडते. महाराष्ट्रात एका बाजूला पश्चिम घाट (सह्याद्री) हा जैवविविधतेचा हॉटस्पॉट आहे. याचबरोबरीने उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांगेतील विविध प्रकारच्या वनस्पती, प्राणी, पक्षी, एवढेच नव्हे तर जगाच्या पाठीवर दुर्मीळ होत चाललेली जंगली कुरणे या पर्वतरांगेत दिसतात. सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव व अक्कलकुवा या दोन तालुक्यात बहुतांशी निसर्गासोबत जगणाऱ्या आदिवासी बांधवांचे वास्तव्य आहे. आदिवासी आणि जंगले, निसर्ग, पर्वतरांग हे जणू एकमेकांस पूरक असे समीकरणच आहे. जंगलांचे संरक्षण आदिवासी बांधवांनी करावे  आणि त्यांचे पालनपोषण या पर्वताने  करावे.

सातपुडा परिसराचा अभ्यास  बायफच्या कार्यकर्त्यांनी सातपुडा पर्वताच्या सानिध्यात जाऊन काही बाबी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला या पर्वतरांगेत पारंपरिक पिके कोणती?, ती या लोकांनी का सांभाळून ठेवली आहेत; या पर्वतात कोणती वनोपज आढळतात, जंगली वृक्षांची या आदिवासी लोकांच्या जीवनात काय भूमिका हे जाणून घेत असताना विचारातही न घेतलेल्या बऱ्याच बाबी आमच्या समोर येत गेल्या. हेच सारे अभ्यासात असताना आपसूकच त्यांच्या गरजा जाणून घेतल्या. आदिवासींच्या जगण्यासाठीच्या गरजा जरी कमी असल्या तरी त्यात निसर्गाचा किती वाटा हे जाणून घेण्यासाठी आदिवासी लोकांच्या उदरनिर्वाहाच्या साधनांचा प्राधान्यक्रम लावण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये असे आढळून आले की, जशी या लोकांना स्थानिक पिके महत्त्वाची वाटतात, मोह, आंब्यासारखे मोठाले वृक्ष जवळचे वाटतात, तशीच आणखी एक बाब म्हणजे या आदिवासी संकृतीत आयुष्यातील प्रत्येक घटनेत असलेले स्थानिक कोंबड्यांचे स्थान!  कोंबडीला महत्त्वाचे स्थान आदिवासी आपल्या प्रत्येक कार्यात कोंबडीला फार महत्त्वाचे स्थान देतात. घरच्या कोणत्याही शुभ कार्यात किंवा गावातील सामूहिक स्थानिक सण साजरा कराताना या कोंबड्यांचा नैवेद्यासाठी उपयोग होतो. यात इंदल, नवाई, वाघदेव यात्रा, होळी यांसारख्या पारंपरिक सणांचा समावेश होतो. कोंबडी हा त्यांच्यासाठी उदरनिर्वाहाचे एक उत्तम साधन आहे. ज्या वेळी शेतात कोणतीही पिके नसतात, त्या वेळी हा स्थानिक शेतकरी कोंबड्यांना विकून आपल्या परिवाराचे पालनपोषण करतो.

कोंबड्यांचा अभ्यास 

  •  महाराष्ट्र जनुक कोष कार्यक्रमांतर्गत या स्थानिक गावठी कोंबड्यांचा सखोल अभ्यास करण्याचे आम्ही ठरविले. वयस्कर लोकांच्या म्हणण्यानुसार, पूर्वी शहादा परिसरातील काही व्यापारी नेहमी धडगाव, अक्कलकुवा तालुक्यात गावठी कोंबड्या विकत घेण्यासाठी येत असत. या कोंबड्यांची विक्री ‘सातपुड्यातील सातपुडी कोंबडी’ या नावाने करत. सातपुडी गावठी कोंबडीचे पालन किती लोक करतात हे जाणून घेण्यासाठी काही कुटुंबांचे सर्वेक्षण केले. परंतु यात असे आढळले की, या परिसरात वेगवेगळ्या शारीरिक गुणधर्माच्या, एकमेकांपासून भिन्न असलेल्या सातपुडी कोंबड्यांचे प्रकार दिसतात. या साऱ्यांना स्थानिक लोक सातपुडी नावाने ओळखत असल्याने यात नेमकी सातपुडी कोणती ते शोधणे फार मोठे आव्हान समोर उभे राहिले.
  • या अनुषंगाने एक हजार गावठी कोंबडीपालन करणाऱ्या कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. या दरम्यान त्या स्थानिक कोंबड्यांचे प्रकार जाणून घेता आले. त्याप्रमाणे सातपुडी गावठी कोंबडीचे एक चित्र उभे करता आले. काही वयस्कर लोकांशी चर्चा करून सातपुडी कोंबडीची ओळख करून घेता आली. फार पूर्वी कोणती कोंबडी लोक पाळत होते आणि आज त्यात इतकी शारीरिक भिन्नता कशी आली याचा अभ्यास केला. यावर लोकांनी असे सांगितले की, पूर्वी लग्न समारंभात मुली सासरी जाताना सोबत गायी, शेळ्या, कोंबड्या देण्याची प्रथा होती आणि याच कारणामुळे इतर भागातील कोंबड्यांचे प्रमाण या भागात वाढल्याचे दिसून येते. मग यातील खरी स्थानिक कोंबडी कोणती? हा प्रश्न विचारल्यास मिश्र रंग, मध्यम उंच, तपकिरी रंगाचे डोळे आणि आखूड पायांची कोंबडी म्हणजे सातपुडी कोंबडी, असा निष्कर्ष या साऱ्यातून काढता आला.
  • संस्थेतील तज्ज्ञांनी शारीरिक गुणधर्म टिपण्याची रूपरेषा तयार केली. त्यानुसार एकूण ५००० कोंबड्यांचे शारीरिक गुणधर्म नोंदविण्यात आले. सर्वेक्षणात असे आढळून आले की या कोंबडीवाढीचा वेग चांगला, अधिक अंडी उत्पादन क्षमता, चांगली रोगप्रतिकारक्षमता असल्याने 
  • परसातील कुक्कुटपालनासाठी ही योग्य जात आहे.
  • सर्वेक्षणातील माहितीवरून आनुवंशिकरीत्या शुद्ध कोंबड्यांची निवड करून त्याचे ‘मदर युनिट’ काही शेतकऱ्यांकडे तयार केले. या मदर युनिटमधील कोंबड्यांपासून मिळालेली अंडी गोळा केली. ही अंडी उबवण केंद्रात उबवून पिले तयार केली जातात. या अंडी उबवण केंद्राचे व्यवस्थापन सहभागी शेतकऱ्यांकडूनच केले जाते. अंडी उबवण केंद्रामध्ये तयार झालेली पिले निवडक शेतकऱ्याकडे वाढविण्यात येतात. अशा प्रकारे आनुवंशिकदृष्ट्या शुद्ध कोंबड्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करून त्यांचे संवर्धनाचे काम सुरू आहे. 
  • पुढील कामाची दिशा  

  • सातपुडी कोंबडी पालनासाठी स्थानिक लोकांची मागणी जास्त आहे, त्यामुळे अंडी उबवण केंद्रांची संख्यावाढीसाठी वाव आहे.
  • सातपुडी कोंबडीला वेगळी जात म्हणून मान्यता प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. 
  •  भविष्यामध्ये या कोंबडीच्या गुणविशेषांचा प्रसार प्रचार व बाजारपेठेची उपलब्धता ही महत्त्वाची पावले असतील.
  • सातपुड्यात आढळणाऱ्या कोंबड्यांची विविधता

    हायली कुकडी (उलट्या पंखांची कोंबडी)  १) या कोंबड्यांचे प्रमाण सातपुड्यात अधिक आहे. या कोंबडीला शेतकरी कोणत्याही शुभकार्यात समाविष्ट करीत नाही.  २) स्थानिक शेतकरी या प्रकारच्या कोंबड्यांना अशुभ मानतात. यांची विक्रीदेखील केली जात नाही. 

    टाल्या कुकडी (नेकेड नेक)   १) कोंबडीची उंची इतर कोंबड्यांपेक्षा उंच आहे. कोंबडीच्या मानेवर पिसे नसतात.  २) कोंबडीमध्ये आजारांना प्रतिकार करण्याची क्षमता इतर कोंबड्यांपेक्षा अधिक असते.  ३) कोंबडीचे आनुवंशिक गुणधर्म जसेच्या तसे पुढच्या पिढीत उतरताना दिसतात. परंतु या कोंबडीच्या शारीरिक गुणधर्मास लोकांकडून पसंती कमी असल्याचे दिसून येते. 

    काभऱ्यो कुकडी (मिश्र रंगाच्या)  १) कोंबड्या उंचीला कमी, मिश्र रंगात आढळून येतात.  २) पायाची लांबी इतर जातींपेक्षा आखूड असून, रोगप्रतिकारकता अधिक आहे.  ३) अंड्याचा रंग फिक्कट तपकिरी आहे. अंडे मध्यम आकाराचे असल्याने लोकांकडून चांगली मागणी आहे. 

    कल्यो कुकडी (काळा रंग)  १) कोंबड्या काळ्या रंगाच्या आहेत. कडकनाथ जातीशी साम्यता दर्शविणारे शारीरिक गुणधर्म आहेत.  २) पायांचा रंग फिक्कट पिवळसर, डोळ्यांचा रंग तपकिरी असतो. 

    गावठी कुकडी  १) कोंबड्या आकाराने मोठ्या, मिश्र रंग, डोळे फिक्कट काळसर तपकिरी असतात. वजनाने अधिक असतात.  २) या जातीचे साधर्म्य गुजरात राज्यातील अंकलेश्वर जातीशी आहे.  ३) गावठी कुकडीचे मास लवकर शिजते. बाजारात चांगली मागणी आहे.  संपर्क : डॉ. विठ्ठल कौठाळे ९९६०५३६६३१ 

    (लेखक बाएफ विकास अनुसंधान प्रतिष्ठान, उरुळी कांचन, जि. पुणे येथे कार्यरत आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com