agriculture news in Marathi, article regarding seed storage techniques. | Agrowon

पारंपरिक साठवण पद्धतीला नव्या तंत्रज्ञानाची जोड

संजय पाटील, ओजस सु. वि
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

पारंपरिक साठवण पद्धतींना नव्या तंत्रज्ञानाची जोड देण्याचा प्रयत्न बायफ, पुणे आणि आयआयटी, मुंबई या संस्थेतील तज्ज्ञांनी केला आहे. पारंपरिक साठवणूक पद्धतींचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करून त्यात काही सुधारणा सुचवण्यात आल्या आहेत. 

पारंपरिक साठवण पद्धतींना नव्या तंत्रज्ञानाची जोड देण्याचा प्रयत्न बायफ, पुणे आणि आयआयटी, मुंबई या संस्थेतील तज्ज्ञांनी केला आहे. पारंपरिक साठवणूक पद्धतींचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करून त्यात काही सुधारणा सुचवण्यात आल्या आहेत. 

मागील लेखात आपण महाराष्ट्रातील गडचिरोली, नगर, पालघर, नंदुरबार जिल्ह्यांतील आदिवासी भागात वापरात असलेल्या धान्य आणि बियाणे साठवणुकीच्या विविध पद्धतीची माहिती पहिली. या सर्व पद्धती स्थानिक उपलब्ध वस्तू, धान्य आणि बियाण्याचे प्रमाण, धान्य प्रकार अशा विविध निकषांवर अवलंबून आहेत, तसेच एका (किंवा दोन) हंगामापुरते बियाणे साठवणूक करण्यासाठी उपयुक्त आहेत. या पारंपरिक साठवणूक पद्धतीबद्दल आणि त्याच्या दीर्घकालीन उपयोगितेबद्दल पुरेसा अभ्यास झालेला नाही.
   उत्तम आणि सुयोग्य पाऊसमान राहते तेव्हा स्थानिक पातळीवर पारंपरिक पद्धतीने बियाणे आणि धान्य साठवण योग्य होते. बदलते हवामान, पावसाचा अनियमितपणा, दुष्काळ यांचा सर्वाधिक दुष्परिणाम निसर्गावर अवलंबून राहणाऱ्या समाजावर आणि त्यांच्या पारंपरिक पद्धतींवर होतो, ही आजचे वास्तव नाकारता येणार नाही. 
या परंपरांना नव्याची जोड देण्याचा प्रयत्न करण्यासाठी बायफ, पुणे आणि  आयआयटी, मुंबई या संस्थांमार्फत पारंपरिक साठवणूक पद्धतींचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करून त्यात काही सुधारणा सुचवण्यात आल्या आहेत. 

स्थानिक बियाणे साठवणूक पद्धतीच्या मर्यादा 

 •  स्थानिक बियाणे साठवणूक पद्धतीमध्ये एका वर्षानंतर बियाणे उगवण क्षमता कमी होते.
 •  साठवणूक केल्यानंतर कीड, बुरशी आणि उंदीर- घुशीपासून संरक्षण ही बदलत्या हवामानातील आव्हाने आहेत.
 •  साठवणूक पद्धतीमधील उच्च तापमान, वाढणारी सापेक्ष आर्द्रता यामुळे 
 • बियाणे उगवण क्षमता कमी होते. 
 •  वातावरण बदलाच्या काळात शेतीतील उत्पन्नाची शाश्वती कमी झालेली असताना स्थानिक पातळीवर दोन ते तीन वर्षे उगवण क्षमता उत्तम ठेवणारी साठवणूक पद्धती गरजेची आहे.
 •  पारंपरिक पद्धतीत कापणीनंतर बीज व्यवस्थित सुकलेले असणे आवश्यक असते. सध्याच्या बेभरवशाच्या पावसाच्या वेळापत्रकामुळे उघड्यावर सुकवलेल्या बियाण्यात साठवणीपूर्वी आर्द्रता शिल्लक असण्याची शक्यता जास्त आहे.     

पारंपरिक बियाणे साठवणूक  पद्धतीचा शास्त्रीय अभ्यास 

 •  ‘बायफ’सोबत आयआयटी, मुंबई मधील संगीत शंकर यांनी जव्हार येथे भाताच्या स्थानिक बियाणे साठवणूक पद्धतीचा अभ्यास केला. बियाणे उगवण क्षमता, बियाणे ओलावा प्रमाण, साठवणूक पद्धतीमधील तापमान आणि आर्द्रता आणि सा    ठवणूक पद्धतीमधील किडीचे प्रमाण तपासले गेले.
 •  बांबू कणगे, मातीचे मडके, प्लॅस्टिक डबा या स्थानिक साठवणूक पद्धतींच्या बरोबर ग्रेन प्रो पिशव्या, झिओलाइटचा वापर आणि त्यामध्ये ‘कसबई’या भाताच्या जातीचे ९६ टक्के उगवण क्षमता आणि १० टक्के आर्द्रतेचे बियाणे वापरले.  सेंन्सरचा वापर करून तापमान आणि आर्द्रतेचे मोजमाप केले. सदर अभ्यासात खालील बाबी आढळून आल्या.
 •  ग्रेन प्रो पिशव्या आणि प्लॅस्टिक डब्बा पद्धतीमध्ये ८० टक्क्यांपर्यंत उगवण क्षमता दिसून आली.
 •  बांबू कणगे, मातीचे मडके या पद्धतीमध्ये पावसाळ्यात ओलाव्याचे प्रमाण १३ टक्के आणि १४.५ टक्क्यांपर्यंत वाढले आणि नंतर ते अनुक्रमे ७ टक्के आणि ९ टक्क्यांपर्यंत दिसून आले त्याचा परिणाम 
 • म्हणून दोन्ही पद्धतीत बुरशी दिसून आली.
 •  पाचही साठवणूक पद्धतीमध्ये आतील आणि बाहेरील तापमान सारखेच दिसून आले. त्यामुळे वरील पैकी कोणतीच पद्धती आतील योग्य तापमान कायम राखू शकले नाही.
 •  बांबू कणगे, मातीचे मडके ह्या पद्धतीमध्ये सापेक्ष आर्द्रता बाह्य वातावरणाच्या परिस्थितीप्रमाणे बदलताना दिसली.  
 •  पारंपरिक व आधुनिक पद्धतींचा योग्य मिलाप केल्यास स्थानिक शेतकऱ्यांचा फायदा होईल असे लक्षात येते. सध्या प्रचलित असलेल्या काही आधुनिक साठवणूक पद्धती जसे की, ओलसरपणा शोषून घेणारे फूड ग्रेड पदार्थ, चिनीमातीपासून बनवलेले २०-२२ टक्के पाणी शोषून घेणारे झिओलाइट यांचा वापर पारंपरिक साठवण पद्धतीसोबत करून बियाण्यांची आर्द्रता कमी ठेवणे, उगवण क्षमता वाढवणे साध्य करता येऊ शकते. 

पारंपारिक बीज साठवणपद्धती

टांगण  
परिपक्व झालेल्या चवळीच्या शेंगा, भेंडी, ज्वारीची कणसे, वांगीची फळे यांसाठी ही पद्धत वापरली जाते. यामध्ये पिकाच्या चांगल्या दर्जाच्या परिपक्व शेंगा/ फळे एकत्रित बांधून छताला टांगून ठेवल्या जातात. कोरड्या हवेशीर जागी ही टांगण बांधतात, जेणेकरून बीज पेरणीपर्यंत चांगले टिकते. 

सितारी 
दुधी, दोडका, घोसाळ्यासारखी परिपक्व फळे/ कणसे तसेच मक्याची पात अर्धी सोलून उलटे करून कणसे चुलीच्या वर टांगली जातात. चुलीच्या धुरामुळे बीज खराब होत नाही. उंदराने बीज कुरतडण्याचा धोका कमी होतो. 

लिंपण 
काकडी, भोपळा, कोहळा, टरबूज अशा गर असलेल्या फळभाज्या परिपक्व झाल्या, की गरासाहित बिया काढून घेतल्या जातात. त्यांचे मातीच्या किंवा कारवीपासून बनवलेल्या कुडाच्या भिंतींवर शेणाने लिंपण केले जाते. वर्षभर त्या बिया भिंतीवर चिकटून असतात. पेरणीच्या वेळी अलगद हाताने भिंतीचे पोपडे काढले जातात आणि बिया वेगळ्या करून पेरणीसाठी वापरतात. काकडी बियाण्याला हळद व मध वापरून ते भिंतीला लिंपून ठेवतात. सागाच्या पानावर शेणाचे लिंपण करून त्यावर काकडी, कारली, भोपळ्याच्या बिया ठेवल्या जातात.

वेटिया 
भाताच्या पेंढ्या/तणसपासून जाड दोरी तयार करतात. नंतर त्याला बांबूच्या आधाराने गोल वेटोळ्यासारखे विणून खोलगट आकार बनवला जातो. त्यामध्ये तांदूळ, उडीद, मूग इत्यादी प्रकारचे धान्य तसेच बियाणे साठवले जाते. वेटिया बनवणे हे खूप जिकरीचे आणि कौशल्याचे काम असते. वेटियाची साठवणूक क्षमता ५० किलो पासून ५०० किलो पर्यंत असते. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड, एटापल्ली तालुक्यात ही पद्धती आजही प्रचलित आहे.

वेण्याकरून साठवणूक 
लसूण, कांदा पातीसहित काढणी करून उन्हात वाळवून त्याच्या वेण्या बांधतात. या वेण्या घरात टांगून ठेवल्या जातात. नंतर गरजेप्रमाणे बियाणे किंवा विक्रीसाठी काढल्या जातात. ही पद्धत सिंधुदुर्ग, नंदुरबार, नाशिक इत्यादी ठिकाणी वापरली जाते.

सुधारित बियाणे साठवणूक यंत्र

 • पारंपरिक साठवण पद्धतीचा अभ्यास करून त्यात आधुनिक तंत्रज्ञान व साहित्य वापरून बायफ आणि आयआयटी ने आदिवासी शेतकऱ्यांच्या सामूहिक बीजबँकेसाठी स्वस्त बीजसाठवण पद्धती तयार केली आहे. 
 •  या साठवणूक यंत्राची क्षमता २०० किलो आहे. यातील बियाण्यांची उगवण क्षमता २ ते ३ वर्षे टिकते. यंत्राच्या आतले तापमान १५ ते १८ अंश सेल्सियस व सरासरी सापेक्ष आर्द्रता ४० टक्के राहते. यासाठी थर्मास इलेक्ट्रिक कूलिंग तंत्रज्ञान वापरले आहे, त्यासाठी २५  वॉट वीज वापरली जाते. 
 •   हे यंत्र बाजारात असलेल्या बीज शीतगृहापेक्षा बरेच स्वस्त आहे. सामूहिकरीत्या घेतल्यास प्रतिव्यक्ती खर्चही कमी येईल.

-  संजय पाटील, ९६२३९३१८५५( लेखक बाएफ संस्थेत कार्यरत आहेत)

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


फोटो गॅलरी

इतर टेक्नोवन
जलशुद्धीकरणासाठी सौर शुद्धजल संयंत्रदुर्गम भागांत तसेच समुद्रकिनाऱ्यावर पिण्यायोग्य...
शून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्षशून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्षाची उभारणी कमी खर्चात...
ऊर्जेशिवाय शीतकरणाचे तंत्रकोणत्याही ऊर्जेच्या वापराशिवाय शीतकरणाची एक...
जास्त अन्न शिजविण्यासाठी शेफलर सौरचूल...शेफलर सौर चूल पेटी सौरचूल आणि पॅराबोलिक...
...ही आहेत आंतरमशागतीसाठी अवजारेशेती मशागतीमध्ये आता ट्रॅक्टर, पॉवर टिलर अशी...
बटाटा प्रक्रिया उद्योगासाठी यंत्रेतळलेल्या पदार्थामध्ये बटाट्याचे चिप्स किंवा...
मेथी वाळवण्याचे तंत्रभारतामध्ये मेथी (शा. नाव - ट्रिगोनेला फीनम -...
फ्राइम्स प्रक्रिया उद्योगातील यंत्रेतळलेल्या पदार्थांच्या बाजारपेठेमध्ये फ्राइम्स...
..अशी आहे डाळनिर्मितीची प्रक्रियामागील भागात मिनी डाळ मिल व त्या माध्यमातून डाळ...
सौर ऊर्जा उपकरणाचे उपयोग, फायदेभविष्यात ऊर्जेचे पर्याय शोधणे महत्त्वाचे ठरणार...
फळप्रक्रिया उद्योगासाठी उपयुक्त यंत्रेकोणत्याही अन्नप्रक्रिया उद्योगामध्ये येणाऱ्या...
नत्रयुक्त खतांच्या वापराशिवाय उत्पादन...कडधान्याच्या मुळावरील गाठीमध्ये वसाहती करणाऱ्या...
सौर ऊर्जेवर आधारीत उपकरणांचा वापरपारंपरिक ऊर्जास्त्रोतांच्या तुटवड्यामुळे व जास्त...
किफायतशीर बैलचलित अवजारेबैलचलित बहूपीक टोकण यंत्रामध्ये पिकानुसार...
सोयादूध, पनीर बनवण्याची यंत्रेसोयाबीनपासून दूध आणि त्याचे पनीर ही उत्पादने...
जवसापासून जेल, कुरकुरीत पदार्थविविध आजारांवरील उपचारामध्ये जवस उपयुक्त असूनही...
यांत्रिक पद्धतीने युवकाने केली खारे...मासा (ता. जि. अकोला) येथील प्रफुल्ल फाले या...
मातीरहित शेतीचे हायड्रोपोनिक्स तंत्रमातीची सुपीकता कमी होत असून, जमिनी क्षारपड होत...
बैलचलित अवजारे ठरताहेत फायदेशीरशेतीमध्ये बैलशक्तीचा वापर मुख्यत: नांगरणी, वखरणी...
ट्रॅक्टरचलित कौशल्यपूर्ण अवजारांची...पिलीव (जि. सोलापूर) येथील सुनील सातपुते या अवलिया...