बांबूच्या नवीन प्रजातींचा अभ्यास महत्त्वाचा

बांबू जात टुल्डा
बांबू जात टुल्डा

आपल्या भागातील हवामान, भौगोलिक परिस्थिती आणि जमिनीचा प्रकार यांचा विचार करूनच बांबूच्या विविध प्रजातींची लागवड करावी. कृषी विद्यापीठे आणि कृषी विज्ञान केंद्रांनी शास्त्रीय पद्धतीने बांबूच्या नवीन जातींचा अभ्यास करून लागवडीबाबत शिफारशी करणे शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणार आहे. 

गेल्या महिन्यात महाराष्ट्र शासनातर्फे 'अटल बांबू समृद्धी योजना' राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. सदर योजनेअंतर्गत उत्तम गुणधर्म असलेल्या टिश्यू कल्चर बांबू रोपांची निर्मिती राज्यामध्येच करून ती शेतकऱ्यांना शेतजमिनीवर तसेच शेताच्या बांधावर लागवडीकरिता सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लागवडीस बांबू रोपे सहज आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. साहजिकच  बांबू लागवडीमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास या योजनेमुळे मदतच होईल. 

बांबू लागवडीसाठी उपक्रम  बदलत्या हवामानाचा विचार करता सध्या बांबूकडे शेतकरी एक खात्रीशीर पीक म्हणून पाहात आहेत. कारण अवकाळी पाऊस, रोग व किडीचा फारसा दुष्परिणाम या पिकावर होत नाही. सध्या कोकणापुरता जरी विचार केला तरीही हे लक्षात येते की बांबू लागवडीसाठी हातभार लागावा या हेतूने शासकीय संस्था त्यांच्या परीने विविध उपक्रम राबवित आहेत. उदाहरणार्थ, बांबूचे फायदे लक्षात घेऊनच  दापोली येथील वनशास्त्र महाविद्यालयामार्फत ''राष्ट्रीय कृषी विकास'' योजनेअंतर्गत कृषी महाविद्यालयाच्या माजी शिक्षण घेतलेल्या होतकरू विद्यार्थ्यांना बांबू रोपे तयार करण्यासाठी दापोली, देवरुख (जि. रत्नागिरी) आणि कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग (जि. सिंधुदुर्ग) या ठिकाणी रोपवाटिका उपलब्ध करून दिल्या आहेत. या रोपवाटिकांमधून स्थानिक ‘माणगा' प्रजातीची बांबू रोपे शाखीय पद्धतीने विकसित करून रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच इतर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जातात. परंतु शेतकऱ्यांची वाढती मागणी पाहता या पद्धतीने रोपे मुबलक प्रमाणात तयार करणे फार जिकरीचे आहे. अशा परिस्थितीत म्हणूनच शेतकऱ्यांना टिश्यू कल्चर रोपे उपलब्ध करून देण्याचा शासनाचा निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे.

नवीन प्रजातींच्या अभ्यासाची गरज 

  • शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये माणवेल, कळक या प्रजाती विदर्भात तर माणगा ही प्रजाती कोकण पट्ट्यात मोठ्या प्रमाणात आढळतात. येथील शेतकरीदेखील स्थानिक प्रजातींची वाढ चांगल्या प्रकारे होत असल्यामुळे या रोपांची लागवड करतात. तरीदेखील सदर तीन स्थानिक प्रजातींव्यतिरिक्त बांबूच्या टिश्यू कल्चर रोपांच्या प्रचार प्रसारासाठी राज्य सरकारने बांबूच्या पाच नवीन प्रजातींचा (बल्कोआ, टूल्डा, न्यूटन्स, ब्रँडीस, ऍस्पर) आपल्या योजनेमध्ये अंतर्भाव केला आहे. आता मुळात प्रश्न हा उद्भवतो की जर का स्थानिक प्रजाती संबंधित भौगोलिक परिस्थितीत अगोदरच चांगल्या प्रकारे वाढत असतील तर नवीन प्रजातींची लागवड करणे व्यावसायिक दृष्टिकोनातून कितपत फायदेशीर ठरेल? 
  •    नवीन प्रजाती शेतकऱ्यांना लागवडीसाठी शासन उपलब्ध करून देणार असेल तर या प्रजातींच्या वाढीचा अगोदर व्यावसायिक हेतूने विदर्भ आणि कोकणात अभ्यास होणे महत्त्वाचे आहे. या प्रजाती मुख्यत्वे आसाम, ओरिसा, नागालॅंड, मिझोराम, उत्तराखंड येथील मूळ प्रजाती असून त्यांची वाढ त्या भौगोलिक वातावरणात जोमाने होते. त्याप्रमाणे महाराष्ट्रात होईल का आणि आपल्या येथील वातावरण सदर प्रजातींच्या वाढीस कितपत पोषक ठरू शकेल याचा अभ्यास होणे गरजेचे आहे. 
  •    बांबूच्या नवीन प्रजातींचा महाराष्ट्रात लागवडीसाठी विचार करताना पहिल्यांदा कृषी विद्यापीठे आणि कृषी विज्ञान केंद्र या ठिकाणी नव्या प्रजातींची लागवड करून त्याचा सखोल शास्त्रीय अभ्यास होणे गरजेचे आहे. मूळ ईशान्य भारतातील प्रजाती महाराष्ट्रातील हवामानात नीट रुजतात का, त्यांची अपेक्षित मापदंडांप्रमाणे वाढ होते का यावर संशोधन होणे गरजेचे आहे. म्हणजे शेतकऱ्यांना उत्पादनाची खात्री पटेल.
  •    सद्यस्थितीत, कोकणात या नवीन प्रजातींसोबत इतर काही प्रजातींची सिंधुदुर्ग येथील सामाजिक वनीकरण, मुळदे, (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) आणि वनशास्त्र महाविद्यालय, दापोली, (जि. रत्नागिरी) या ठिकाणी बांबू संग्रहालयाच्या स्वरूपात पूर्वापार लागवड केलेली आहे, परंतू व्यावसायिक दृष्टीने या प्रजातींचा वाढीसंदर्भात अभ्यास अद्याप झालेला नाही.
  • - सतीश वनगे, ९४२२४२३२९२    

     (लेखक वनशास्त्र विषयाचे पदवीधर आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com