धान्य, बियाणे साठवणुकीसाठी झिल्ले, टिपरी, बलद

कणगी
कणगी

महाराष्ट्रातील आदिवासीबहुल जिल्ह्यांत अनेक पिढ्यांपासून स्थानिक पातळीवर विकसित झालेल्या पारंपरिक धान्य व बियाणे साठवणूक पद्धती आजही वापरात आहेत. बाएफ संस्थेच्या कार्यकर्त्यांनी धान्य आणि बियाणे साठवण पद्धतींचा सखोल अभ्यास केला आहे.

धान्य आणि बियाणे साठवणूक हे अन्नसुरक्षा आणि बियाणे स्वयंपूर्णतेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. उत्तम साठवणुकीसाठी धान्य/बियाण्याला कीड, रोगापासून सुरक्षित ठेवून योग्य प्रकारचे वातावरण उपलब्ध करून देणारी आदर्श साठवणूक पद्धती गरजेची आहे. महाराष्ट्रातील आदिवासीबहुल जिल्ह्यात गेल्या अनेक पिढ्यांपासून स्थानिक पातळीवर विकसित झालेल्या पारंपरिक धान्य व बियाणे साठवणूक पद्धती आजही वापरात आहेत. आदिवासी भागात शेतकऱ्यांसोबत काम करणाऱ्या ‘बाएफ’ संस्थेच्या कार्यकर्त्यांनी अकोले (नगर), जव्हार (पालघर), धडगाव (नंदुरबार), भामरागड आणि एटापल्ली (गडचिरोली) या आदिवासी बहुल क्षेत्रात वापरात असणाऱ्या धान्य आणि बियाणे साठवण पद्धतींचा सखोल अभ्यास केला. साठवण पद्धतीमध्ये बांबूपासून तयार केलेली साठवण साधने, मातीपासून बनवलेली विशेष साठवणूक रचना आणि झाडाच्या पानांपासून केलेली पात्र असे मुखत्वे तीन प्रकार आढळतात.

बांबूपासून केलेली धान्य/बीज साठवण साधने

कणगी/ताटकी 

  • बांबूच्या पट्ट्यांपासून केलेली कणगा किंवा ताटकी मुख्यत्वे धान्य साठवण्यासाठी वापरतात. याची साठवण क्षमता ५०० ते १००० किलो असते. तळाला सागाची पाने पसरवली जातात.
  •  उन्हात वाळवलेले धान्य भरले की त्यामध्ये कडुनिंब, निर्गुडी, काळा कुडा इत्यादींची वाळलेली पाने मिसळतात. कणगा/ताटकी वरपर्यंत भरली की त्यावर सागाची पाने पसरून शिवून घेतात आणि नंतर शेण-मातीच्या मिश्रणाने लिंपून घेतात. 
  •  कणगीमध्ये तांदूळ ३-४ वर्षे आणि नाचणी, वरई १-२ वर्षे सहज टिकतात. 
  • झिल्ले

  • झिल्ले हे कणगीसारखेच पण लहान आकाराचे बांबूपासून बनवलेले असते. याची २०० ते ३०० किलो साठवणूक क्षमता असते.
  • यामध्ये नाचणी तसेच तांदूळ साठवणूक केली जाते. यात आठ महिन्यांपर्यंत धान्य ठेवले जाते. 
  • मुस्का 

  • उभट निमुळत्या आकाराचे आणि निमुळत्या तोंडाचे बांबूपासून बनवले जाते.
  • हे मुख्यत्वे तूर, उडीद, कुळीथचे बियाणे साठवण्यासाठी वापरले जाते. बियाणे साठवताना राखेचा वापर केला जातो.
  • पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा भागात याचा वापर केला जातो.
  • टिपरी 

  • बांबूचे लांब व रुंद पोकळ पेर एका बाजूने बंद राहतील अशा प्रकारे कापतात. काकडी, राजगिरा, दुधी भोपळा, तांबडा भोपळा इत्यादींचे बियाणे टिपरीत साठवतात. यात सुमारे १०० ग्राम ते एक किलोपर्यंतचे बियाणे आठ महिने टिकते. 
  • टोपली

  •  बांबूची इंग्रजी U आकाराची टोपली विणून तिला शेणाने लिपतात. यात अळू, करांदे इत्यादी कंद साधारण आठ महिन्यांपर्यंत साठवतात. 
  • टोपलीत कंद ठेवून भात पिकाच्या पेंढ्याने/तनसाने टोपली भरून टाकतात वरून शेण आणि मातीने लिंपून घेतात. ही टोपली घरात अंधाऱ्या ठिकाणी ठेवतात.
  • मातीपासून बनवलेल्या बीज साठवण वस्तू आणि पद्धती

    घागर/मडके 

  • ३ ते १० किलो क्षमता असलेले मडके साठवणीसाठी वापरतात. कडधान्याचे बियाणे कापणीनंतर साफ करून उन्हात सुकवून लाकडाच्या राखेत मिसळले जाते आणि घागरीत/मडक्यात ठेवून तोंड भाताचे पेंढा/तणसाने बंद करून शेण आणि मातीचे मिश्रणाने लिंपून घेतले जाते. पुढच्या वर्षीच्या पेरणीच्या हंगामापर्यंत सुमारे आठ महिने ते तसेच ठेवले जाते. 
  • पेरणीच्या वेळी शेणाचे लिंपण फोडून बीज बाहेर काढले जाते. गडचिरोलीमध्ये कंद मडक्यात 
  • ठेवून शेण व मातीने त्याचे तोंड बंद करतात.
  • गाडगे 

  • घागरीचे/मडक्याचे लहान स्वरूप म्हणजे गाडगे. यात अर्धा ते एक किलो बीज साठवले जाते. मुख्यत तूर, वाल, हरभरा, वाटाणा इत्यादी कडधान्याच्या बियाणे साठवण्यासाठी याचा वापर केला जातो.
  • बलद 

  • बलद म्हणजे घराच्या भिंतीला तिन्ही बाजूंनी मातीच्या विटांचे आयताकृती बांधकाम करून बनवलेली उभट रचना होय. यामध्ये मुख्यत भात/साळची साठवणूक केली जाते. 
  • याची उंची ५ ते ७ फुटांपर्यंत असून यामध्ये ५०० किलो ते १००० किलोपर्यंत साठवणूक क्षमता असते. बलदमध्ये ३ वर्षापर्यंत भात/साळ टिकते.
  •  बलदच्या समोरील बाजूस एक लहानसे छिद्र ठेवलेले असते. ज्यायोगे आतील धान्य काढून घेता येते. हे छिद्र शेणमातीच्या मिश्रणाने बंद केले जाते. 
  •  बलदचा वरचा भागसुद्धा शेणमातीचे मिश्रणाने लिंपून बंद केला जातो आणि शक्यतो तो शेवटपर्यंत उघडला जात नाही. अशा हवाबंद रचनेमुळे ठेवलेले धान्य ओलावारहित आणि कीडमुक्त राहते. अकोले तालुक्यातील कळसुबाई आणि हरिश्चंद्रगड परिसरात आजही बलद वापरात आहेत.
  • बियाणे साठवणुकीसाठी दुधीचा वापर

  • परिपक्व होऊन व्यवस्थित सुकलेल्या दुधी भोपळ्याला एका बाजूने भोक पाडून त्याच्या आतला गर, तंतू व बिया काढून टाकले जाते. 
  • यामध्ये अंबाडी, माठ, भेंडी, खुरासणी, करडई इत्यादीचे बीज राखेत मिसळवून साठवले जाते. दुधीची उघडी बाजू बांबूच्या ठोकळ्याने किंवा मका कणसाचा बुचासारखा वापर करून बंद केली जाते.
  • झाडांच्या पानांपासून पेट्या

  • नाचणीवर्गीय भरडधान्याची परिपक्व कणसे तसेच साफ केलेले नाचणीचे बियाणे साठवणुकीसाठी साग करवळ, पेटार, चामेलच्या पानापासून पेटीच्या आकाराचे बनवलेले साधन म्हणजे पेट्या. 
  • पाने विशिष्ट प्रकारे गुंडाळून त्यामध्ये बियाणे किवा कणसे भरून अंबाडीच्या सालीने बांधले जाते. पेट्या छताला टांगून ठेवतात. यात १ किलो ते ५ किलो र्यंत बियाणे ठेवले जाते.
  • - संजय पाटील, ९६२३९३१८५५  ( लेखक बाएफ संस्थेत कार्यरत आहेत)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com