आदिवासींच्या पारंपरिक अन्न प्रक्रिया अन् साठवणपद्धती

आंबा पिकवण्यासाठी कणगीचा वापर
आंबा पिकवण्यासाठी कणगीचा वापर

शहादा तालुक्यात गेली तीस वर्षे आदिवासींसोबत काम करणाऱ्या जनार्थ आदिवासी विकास संस्थेने आदिवासींकडील पारंपरिक ज्ञानाचे दस्तावेजीकरण केले आहे. कमीत कमी साधनांत नैसर्गिक हवामानाचा उपयोग करून आदिवासी समाजाने काही सोप्या; पण विलक्षण काढणी, प्रक्रिया आणि साठवणपद्धती शोधल्या आहेत.

सातपुड्यातील आदिवासी समाज जंगलावर आधारित जीवनशैलीने जगतो. अजूनही या समाजाची बाजारावरील निर्भरता फार कमी आहे. बहुतांश जीवनयोग्य वस्तू आणि विक्रीकरिता येण्याजोग्या वस्तू जंगलातूनच मिळतात. जंगलातील संसाधने विशिष्ट हंगामात ठरावीक प्रमाणातच मिळतात. या संसाधनांचा शाश्वत परिपूर्ण वापर करायचा असेल, तर त्यासाठी योग्य काढणी पद्धत आणि साठवण पद्धत अवलंबली पाहिजे. कमीत कमी साधनांत नैसर्गिक हवामानाचा उपयोग करून आदिवासी समाजाने काही सोप्या; पण विलक्षण काढणी, प्रक्रिया व साठवणपद्धती शोधल्या आहेत. पिढ्यान् पिढ्या या पारंपरिक पद्धती वापरून वनोपजाचा विनियोग केला जातो. कालोघात आदिवासी समाजही विविध कारणांमुळे वेगाने बदलत आहे. शहादा तालुक्यात गेली तीस वर्षे आदिवासींसोबत काम करणाऱ्या जनार्थ आदिवासी विकास संस्थेला या पारंपरिक ज्ञानाचे दस्तावेजीकरण गरजेचे वाटले. त्यानुसार विरपूर, भुते, पिंप्राणी गावातील सोता शिवाजी पवार, रायसिंग खेत्या पवार, सिंगा चमाऱ्या पवार, ठोबा सुभान पवार, नागझिरीचे नाथाकाका आणि कोटबांधणीचे बारसिंग भील या प्रौढ व्यक्ती यांच्याशी गप्पा मारत संस्थेच्या सदस्यांनी माहिती गोळा केली.  यापैकी काही महत्त्वाच्या वनोपज कापणी, प्रक्रिया व साठवण पद्धतीची नोंद येथे मांडत आहोत.   

जंगली आंबा   जंगलात अनेक प्रकारचे आंबे मिळतात. आंब्याचा आकार, गोडी, रसदारपणा यावरून आंब्याच्या जातींना स्थानिक नावे असली; तरी बाजारात मात्र ते जंगली आंबे म्हणूनच विकले जातात. अनेक वर्षे जुन्या मोठ्या झाडांवरून हे नाजूक आंबे अलगद उतरवणे हे जिकिरीचे काम असते. आंबे तोडण्याची पद्धत  साधारणत: १५ ते २० फुटांपर्यंत लांब बांबू घेऊन त्याच्या शेवटी टोकाला बांबूच्या काडीने बनवलेली ‘छकली’ (झेला) बांधतात. बांबू व छकलीला मध्यभागी भेंडीच्या देठापासून बनवलेली दोरी बांधून आंब्याला छकलीमध्ये अडकवून तोडतात. एक जण आंब्याच्या फांदीवर बसून बादलीमध्ये तोडलेली फळे ठेवतो. बादली पूर्ण भरली की बादलीला हळूहळू दोराच्या साह्याने खाली जमिनीवर असलेल्या लोकांकडे देतात. बादलीमधील आंबे काढून खाली पळसाच्या पानावर ठेवतात; जेणेकरून आंबे खाली पडून खराब होऊ नयेत. चांगल्या आंब्याचे लोणचे करतात तसेच आंबे पिकवून खातात. आंबे पिकवण्याची पद्धत  जुनी बांबूची कणगी किंवा ढालक्याला सारवून कणगीच्या आतल्या भागाला जंगलातून तोडून आणलेली पळसाची पाने, रिसळी मुहवीची व टेंबूरणीची पाने लावून मध्ये चांगली असलेली आंब्याची फळे कणगी किंवा ढालक्यात ठेवून वरून पाने ठेवून कणगीचे तोंड शेण व मातीमिश्रण करून सारवून देतात. अशा हवाबंद ढालक्यात आंबे लवकर पिकतात. सात-आठ दिवसांत कणगीचे सारवलेले तोंड विळ्याच्या साह्याने फोडून शेण, माती बाहेर काढतात, पानेही बाहेर काढतात. अशा पद्धतीने आंबे पिकविले जातात. मोह ः  टोळंबीचे तेल मोह वृक्ष आदिवासींसाठी कल्पवृक्ष आहे. त्यातील प्रत्येक भागाचा काही ना काही उपयोग केला जातो. त्यापैकी मोहाच्या बीचे तेल हे खाद्यतेल म्हणून वापरले जाते. 

टोळंबीचे तेल काढण्याची पद्धत   मोहच्या झाडावरून पडलेली पिकलेली टोळंबी वेचून आणतात किंवा पक्की झालेली मोह टोळंबी तोडून आणतात. तोडून आणलेली टोळंबी कडक उन्हात सुकवतात आणि उखळात बारीक कुटून सुपामध्ये बारीक बारीक एका बाजूला व जाड मोठमोठे तुकडे एका बाजूला काढून परत जाड तुकड्यांना उखळात कुटायला घेतात. नंतर चूल पेटवून चुलीवर हांडलीमध्ये (पातेले) पाणी भरून त्या पाण्यावर कुटलेली टोळंबी बांबूच्या टोपलीत भरून ठेवतात. त्या टोपलीवर झाकणाने झाकतात. कुटलेली टोळंबी पूर्णतः वाफेत शिजवतात. नंतर फडक्यात काढून घेतात. चिपळा म्हणजे लाकडाच्या फळीच्या पाट्यामध्ये ठेवून दोराच्या साह्याने खांब्याला बांधून ताणून घेतात. ताणल्यानंतर वाफलेल्या टोळंबीचे तेल निघते.

चारोळी   आदिवासींसाठी चारोळी हे पूर्वापारपासून महत्त्वाचे वनोपज आहे. चारोळी शहरांमध्ये सुकामेवा प्रकारात विकली जाते. मात्र, आजही आदिवासींना चारोळीचा योग्य तो मोबदला मिळत नाही. नाजूक फांद्यांच्या चारोळीचे फळ झाडावरून उतरवणे किंवा झाडाखाली गवतातून वेचणे व त्यावर प्रक्रिया करणे हे चिवट काम असते. 

बिया काढण्याची पध्दत   झाडावर पिकलेली चारोळी फळे तोडून आणतात किंवा खाली पडलेली चारोळी वेचतात. उखळात कुटून चारोळीचा वरचा गर काढतात. नंतर कुटलेल्या बिया पाण्यात भिजवून ठेवतात. हवेत वाळवतात. त्यानंतर घरटी (जात्या)मध्ये भरडून सुपामध्ये घेऊन बिया व फोतरे बाजूला वेगवेगळे काढतात. या बियांचा वापर खाण्यामध्ये होतो. 

 - विक्रम कान्हेरे, ८२७५१२३६२२,  janarthorg@rediffmail.com   (लेखक जनार्थ आदिवासी विकास संस्थेमध्ये कार्यरत आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com