अमेरिकेतील भातशेतीची शिवारफेरी

कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या संशोधन केंद्रामध्ये भाताच्या विविध जातींची लागवड
कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या संशोधन केंद्रामध्ये भाताच्या विविध जातींची लागवड

अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यामध्ये सॅक्रामेंटो जिल्हा आहे. अमेरिकेत हा एकमेव भात उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथे उन्हाळ्यात भातशेती केली जाते. विद्यापीठातील भात संशोधनासाठी आर्थिक पाठबळ उभे करण्यासाठी शेतकऱ्यांकडून दोन टक्के रॉयल्टी भात विक्रीतून घेतली जाते. या मिळकतीतून संशोधनाचा पूर्ण खर्च केला जातो. त्याचा चांगला फायदा शेतकऱ्यांना होत आहे.

ऑगस्ट महिन्यात मी अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात कौटुंबिक दौऱ्यासाठी गेलो होतो. या दौऱ्यामध्ये मला कॅलिफोर्निया राज्यातील काही कृषी संशोधन संस्था तसेच परिसरातील प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतीला भेट देण्याची संधी मिळाली. कॅलिफोर्निया राज्यात प्रामुख्याने द्राक्ष, बदाम, अक्रोड, लिची, सफरचंद, पीच, कलिंगड तसेच विविध प्रकारच्या भाजीपाला पिकांची लागवड केली जाते. याचबरोबरीने विस्तीर्ण क्षेत्रावर गहू, बार्ली लागवड असते. या राज्यात प्रचंड मोठी चराऊ कुरणे आहेत. कॅलिफोर्निया राज्यामध्ये सॅक्रामेंटो जिल्हा हा भात उत्पादनासाठी ओळखला जातो. अमेरिकेतील भातशेती  कॅलिफोर्निया राज्यामध्ये सॅक्रामेंटो जिल्हा (काउंटी) आहे. संपूर्ण अमेरिकेत हा एकमेव भात उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथे पावसाळ्यात भातशेती न करता उन्हाळ्यात केली जाते. सॅक्रामेंटो व्हॅली म्हणून ओळख असलेला हा भाग पूर्वापारपासून भातशेतीसाठी प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यातील शेतीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध होण्यासाठी धरण बांधण्यात आले आहे. यामुळे या खोऱ्यामध्ये १,७९,४१५ हेक्टर क्षेत्रावर भातशेती होते. लागवड क्षेत्र मोठे असल्याने याठिकाणी शेताची चिखलणी करून विमानाने मोड आलेले भात बियाणे पेरले जाते. या पूर्ण परिसरामध्ये भाताशिवाय कोणतेही अन्य पीक नाही. गवताचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी विमानाने तणनाशक फवारणी केली जाते.    पावसाळ्यात भात पिकावर रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याने या ठिकाणी उन्हाळ्यात कालव्याच्या पाण्यावर भातशेती केली जाते. येथील शेतकऱ्यांचे प्रति हेक्टरी सरासरी भात उत्पादन ४५ क्विंटल आहे. विद्यापीठात भात संशोधनासाठी विविध प्रयोग सुरू आहेत. या संशोधनासाठी आर्थिक पाठबळ उभे करण्यासाठी शेतकऱ्यांकडून दोन टक्के रॉयल्टी भात विक्रीतून घेतली जाते. या मिळकतीतून संशोधनाचा पूर्ण खर्च केला जातो. मात्र त्या बदल्यात शेतकऱ्यांना नवीन संशोधन, नवीन जाती तात्काळ उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे येथील भात उत्पादन आणि गुणवत्तेमध्ये चांगली वाढ दिसून आली आहे. भात संशोधन केंद्रातील शिवारफेरी  मला अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठात जाण्याची संधी मिळाली. या विद्यापीठात २८ ऑगस्ट रोजी भात संशोधन केंद्रामध्ये राईस फिल्ड डे आयोजित करण्यात आला होता. मी कोकणातील भात उत्पादक शेतकरी असल्याने विद्यपीठातील शिवारफेरीला जाण्याचे नियोजन केले. २८ ऑगस्ट रोजी संशोधन केंद्रामध्ये सकाळी ७.३० ते ८.३० नोंदणीची वेळ होती. माझ्यासोबत कुटुंबातील चार जण होते. आम्ही या संशोधन केंद्रापासून ३०० किलोमीटर अंतरावर राहात होतो, परंतु अमेरिकेतील रस्ते मोठे प्रशस्त असल्याने हे अंतर आम्ही केवळ अडीच तासांमध्ये पार करत संशोधन केंद्रामध्ये वेळेवर पोचलो. आमच्या अगोदर येथे परिसरातील शेतकरी जमले होते. बरोबर आठ वाजता शिवार फेरीला सुरवात झाली. विशेष म्हणजे शिवारफेरीच्या ठिकाणी कोणताही समारंभ नव्हता की, प्रमुख पाहुणेदेखील नव्हते. संशोधन केंद्रातील तज्ज्ञांनी नोंदणीच्या ठिकाणी दिवसभराचे नियोजन समजावून सांगितले. यामध्ये पहिल्यांदा नोंदणी, त्यानंतर अर्धा तास संशोधन संस्थेची माहिती आणि पुढील तीन तास प्रत्यक्ष संशोधन केंद्रावर भाताच्या विविध जातींमधील संशोधन, पीक व्यवस्थापन, तण नियंत्रणाबाबत प्रत्यक्ष तज्ज्ञांचे मार्गदर्शन असे सकाळी ८ ते १२ पर्यंत शिवारफेरीचे नियोजन होते. शिवारफेरी संपल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना एकत्रित जेवण होते. या जेवणामध्ये खास भारतीय पुलावाचादेखील समावेश होता.        आमच्या शिवारफेरीमध्ये सुमारे ३०० शेतकरी होते. येथील भात उत्पादकांचे लागवड क्षेत्र हे सुमारे ४०० ते ४००० एकरापर्यंत आहे. विद्यापीठाच्या भात संशोधन केंद्रातील संशोधनाचे नियोजन, विविध जातींचे संशोधन प्रक्षेत्र आणि तेथील शेतकरी, तज्ज्ञांच्या बरोबरीने झालेल्या बोलण्यातून असे समजले की, येथील भात उत्पादक विद्यापीठातील संशोधन आणि भातशेतीतील उत्पन्नाबद्दल समाधानी होते. शिवारफेरीमध्ये आम्हाला संशोधन केंद्रातील तज्ज्ञ कासम अल खतीब आणि शामल तालुकदार यांनी भात पिकाच्या विविध जाती, पीक व्यवस्थापनातील आधुनिक तंत्रज्ञान, उत्पादन वाढीबाबत सुरू असलेले संशोधन, तणनियंत्रण तसेच भविष्यातील संशोधनाची माहिती दिली. या देशातील पीक लागवड क्षेत्र आणि संशोधनाची प्रगती पाहून आपल्या कोकणातील भातशेती आणि अमेरिकेतील प्रगत यांत्रिकी भातशेतीची तुलना करणे चुकीचे होईल. मात्र येथील भात शेतीमधील संशोधन पाहिल्यावर असे लक्षात आले की, आपल्याकडेदेखील भात उत्पादन वाढीसाठी पीक व्यवस्थापन तसेच संशोधनात बदलाची गरज आहे. 

विद्यापीठांचा इतिहास    अमेरिकेत आजही शेती हा महत्त्वाचा व्यवसाय आहे. या देशातील ४ ते ५ टक्के नागरिक अत्याधुनिक पद्धतीने शेती करतात. अमेरिकेचे अध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी कृषी विद्यापीठाच्या स्थापनेसाठी पुढाकार घेतला होता. अमेरिकी काँग्रेसचे एक सभासद मॉरील यांनी कृषी विद्यापीठासंबंधीचा एक कायदा सभागृहात मांडला होता. म्हणून यास 'मॉरील कायदा' असेही म्हणतात. त्यानुसार प्रत्येक राज्यातील सिनेटर आणि काँग्रेस सदस्यांना आठ हजार हेक्टर जमीन सुपूर्त करण्यात आली. या जमिनीची विक्री अगर उपयोगातून जी रक्कम उपलब्ध होईल तिचा वापर कृषी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी ठरविण्यात आला. म्हणूनच अमेरिकेतील कृषी विद्यापीठांना ' लँड ग्रॅंड कॉलेज' म्हणजेच जमिनीच्या अनुदानातून निर्माण झालेली महाविद्यालये असे म्हणतात.

- अनिल पाटील, ९९७०९७८७००

(लेखक सांगे, ता. वाडा, जि. पालघर येथील कृषिभूषण पुरस्कार विजेते शेतकरी आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com