‘कृषी’च्या विद्यार्थ्याने विकसित केले कृत्रिम रेतन उपकरण

‘कृषी’च्या विद्यार्थ्याने विकसित केले कृत्रिम रेतन उपकरण
‘कृषी’च्या विद्यार्थ्याने विकसित केले कृत्रिम रेतन उपकरण

माळेगाव, जि. पुणे ः बारामतीच्या कृषी महाविद्यालयातील प्रफुल्ल नेहरे या विद्यार्थ्याने २०१७ पासून गाई, म्हशी, शेळी आणि मेंढी तसेच तत्सम प्राण्यांत कृत्रिम रेतन करण्यासाठी किफायतशीर उपकरणाची निर्मिती केली आहे. त्याचे प्रात्यक्षिक कृषी विज्ञान केंद्रातील जनावरांवर यशस्वीपणे केले आहे. इंडियन व्हेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूट (IVRI) येथे समृद्धी २०१९ या स्पर्धेत भाग घेत त्याने २५ लाख रुपये बीज भांडवल मिळवण्याच्या यादीत आपले स्थान पक्के केले आहे.   उद्यमशीलतेला प्रोत्साहन देत नव उद्योजक व संशोधकांना घडविण्याच्या उद्देशाने बारामतीतील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचालित कृषी महाविद्यालयात वेगाने प्रयत्न सुरू आहेत. अटल इनोव्हेशन मिशनअंतर्गत देशात शंभर अटल इन्क्युबेशन सेंटर्सची स्थापना झाली आहे. त्यातील चौदा राज्यात असून नवउद्योजक व संशोधकांना अभिनव कल्पना मूर्त स्वरूपात उतरविण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.  या इनक्युबेशन सेंटर्सच्या माध्यमातून प्रदर्शन, कार्यशाळा, ग्रुप डिस्कशन्स, नेटवर्किंग इव्हेंट आदींचे आयोजन कृषी महाविद्यालयात आयोजित केले जात आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे याला वयाची अट नसून सर्व वयोगटातील नवसंकल्पना असलेल्यांसाठी हे सेंटर खुले असेल.  संशोधनासाठी जागा, प्रयोगशाळा, मूलभूत सुविधा, मार्गदर्शन अशा सुविधा या सेंटरकडून दिल्या जाणार आहेत. संशोधकांनी बनवलेले उपकरण, यंत्र याची तपासणी करून त्यांची मोठ्या प्रमाणात निर्मिती करण्यासाठी उद्योजकाला प्रोत्साहन देण्याचे कामही होईल. एखाद्या विद्यार्थ्याला किंवा शैक्षणिक संस्थेला कृषी, अभियांत्रिकी आणि औषधनिर्माण क्षेत्राशी संबंधित संशोधन करून त्याचे उत्पादन बाजारात आणण्यासाठी सिड फंड (बीजभांडवल) स्वरूपात आर्थिक मदतही केली जाणार आहे. पेटंट, परवाना, कायदेशीर मान्यता याची पूर्तता करण्यासाठी पाठिंबा दिला जाईल. संशोधक किंवा विद्यार्थ्यांनी केलेले संशोधन हे फक्त प्रयोगशाळेपर्यंत मर्यादित न राहता सर्वांपर्यंत पोचण्यासाठी सेंटरकडून प्रयत्न होतील. 

प्रफुल्ल नेहरेची यशोगाथा  विद्यार्थी पदवी मिळण्याची वाट न पाहता स्वतःच्य नवसंकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी धडपडताना दिसतात. बारामतीच्या कृषी महाविद्यालयातील प्रफुल्ल नेहरे याची यशोगाथा अशीच प्रेरणादायी आहे. तृतीय कृषी पदवीच्या विद्यार्थ्याने इंडियन व्हेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूट (IVRI) येथे समृद्धी २०१९ या स्पर्धेत भाग घेत २५ लाख रुपये बीज भांडवल मिळवण्याच्या यादीत आपले स्थान पक्के केले आहे. या विद्यार्थ्याने २०१७ पासून गाई, म्हशी, शेळी आणि मेंढी तसेच तत्सम प्राण्यांत कृत्रिम रेतन करण्यासाठी किफायतशीर उपकरणाची निर्मिती केली आहे. त्याचे प्रात्यक्षिक कृषी विद्यान केंद्रातील जनावरांवर यशस्वीपणे केले आहे.  कृत्रिम रेतन अयशस्वी होण्यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे जनावरांचा माज ओळखण्यात होणारी चूक, अयोग्य पद्धतीने रेतमात्रेची हाताळणी आणि कृत्रिम रेतन करताना रेतमात्रा अयोग्य ठिकाणी सोडणे. यातील तिसऱ्या कारणावर उपाय म्हणजे कृत्रिम रेतन करतेवेळी गर्भाशयाच्या मुखाजवळ रेतमात्रा इंडोस्कोप सारख्या उपकरणाने सोडणे. या पद्धतीत गाई फलित होण्याची शक्यता ७० % पेक्षा जास्त वाढते.  आज बाजारात महागडी वा परदेशी बनावटीची कृत्रिम रेतन बंदूक (AI Gun) उपकरणे उपलब्ध आहेत, परंतु सर्वसामान्य शेतकरी वर्ग व कृत्रिम रेतन तंत्रज्ञ यांना परवडणारी नाहीत. या समस्येवर उपाय म्हणून प्रफुल्ल याने कृत्रिम रेतमात्रेचे योग्य ठिकाणी रेतन व्हावे यासाठी डिजिटल कॅमेऱ्याची जोड आपल्या कृत्रिम रेतन बंदुकीला जोडली आहे. त्यामुळे रेतमात्रा योग्य ठिकाणी सोडली जाऊन गाई गाभण राहण्याची शक्यता वाढते. या उपकरणाची यशस्वी चाचणी करून गाई, म्हशी, हरिण, शेळी आणि मेंढी या प्राण्यांमध्ये यशस्वी कृत्रिम रेतनदेखील केले आहे. विसाव्या वर्षी स्वतःची कंपनी... या उपकरणाचे पेटंट मिळण्याकरिता अर्ज दाखल केला असून वयाच्या विसाव्या वर्षी या मुलाने स्वतःची एन टेक डिजिटल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन केली आहे. उपकरण विकसित करणे व प्राथमिक चाचण्यांसाठी त्याला अटल इन्क्युबेशन सेंटरमधील कर्मचारी, तंत्रज्ञ व केव्हीकेमधील पशू अधिकारी यांचे सहकार्य लाभले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com