द्राक्षशेतीत हवी कृत्रिम बुद्धिमत्ता ः डॉ. सोमकुवर

भविष्यात कीड-रोग, अन्नद्रव्य आणि सिंचन व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेची (एआय) कास धरावी लागेल. त्यामुळे आपण तंत्रज्ञानाच्या वापराला सज्ज राहायला हवे, असे सूतोवाच राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ. आर. जी. सोमकुवर यांनी केले.
Artificial intelligence needed in vineyards: Dr. Mon.
Artificial intelligence needed in vineyards: Dr. Mon.

पुणे ः देशाच्या द्राक्षशेतीला आधुनिक वळण मिळण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर अत्यावश्यक ठरणार आहे. भविष्यात कीड-रोग, अन्नद्रव्य आणि सिंचन व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेची (एआय) कास धरावी लागेल. त्यामुळे आपण तंत्रज्ञानाच्या वापराला सज्ज राहायला हवे, असे सूतोवाच राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ. आर. जी. सोमकुवर यांनी केले. 

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या ६१ व्या वार्षिक अधिवेशनाच्या उद्‍घाटन सोहळ्यात ते बोलत होते. दूरदृश्‍यप्रणालीद्वारे झालेल्या अधिवेशनात संघाचे अध्यक्ष राजेंद्र पवार, उपाध्यक्ष शिवाजीराव पवार, कोशाध्यक्ष कैलास भोसले, मध्यवर्ती विज्ञान समितीचे अध्यक्ष अरुण कांचन तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, कृषिमंत्री दादा भुसे, कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी संघाच्या अधिवेशनाला शुभसंदेश पाठविले. 

 डॉ. सोमकुवर यांनी द्राक्षशेतीमधील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेतला. ‘‘द्राक्षशेती मजबूत करायची असल्यास कृत्रिम बुद्धिमत्तेची साधने विकसित करून त्याचा अंगीकारही करावा लागेल. सर्वांत अत्यावश्यक बाब म्हणजे मजुरांना तंत्रशुद्ध प्रशिक्षण द्यावे लागेल. याशिवाय बदलत्या वातावरणाचा अभ्यास करून संशोधनाच्या दिशा ठरवाव्या लागतील. देशी-विदेशी बाजारपेठा आणि उपहारगृहे क्षेत्राच्या पसंतीचा अभ्यास करीत द्राक्ष व्यवसायाला चालना द्यावी लागेल,’’ असे ते म्हणाले. 

शेतकरी किंवा खासगी संस्थांकडून विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानाच्या वापराला स्टार्टअपच्या माध्यमातून वापराच्या प्रवाहात आणावे लागेल, असे स्पष्ट करून डॉ. सोमकुवर म्हणाले, की राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राच्या जनुकीय संग्रहात ४८० वाणांचे संकलन करण्यात आले आहे. डावणीला प्रतिकार करणाऱ्या २० वाणांवर मोलाचा अभ्यास सुरू आहे. द्राक्षशेतीला पारंपरिक वाणांमधून बाहेर काढून नव्या व गुणवत्तापूर्ण वाणांच्या शोधासाठी शास्त्रज्ञ परिश्रम घेत आहेत. त्यातूनच मांजरी संशोधन केंद्रातून नवीन, मेडिका, किशमिश, श्यामा अशा नव्या वाणांचा यापूर्वीच प्रसार झाला आहे. याशिवाय अजून काही नव्या वाणांवर चाचण्या सुरू आहेत.’’

ज्ञानाची परंपरा अखंडित ः अध्यक्ष पवार संघाचे अध्यक्ष श्री. पवार म्हणाले, की द्राक्ष बागायतदारांच्या अडचणी सोडविण्यासाठी वार्षिक अधिवेशनाला अनेक वर्षांची परंपरा आहे. कोरोनामुळे या परंपरेवर सावट होते. मात्र दूरदृश्‍यप्रणालीचा वापर करीत संघाने ही ज्ञानपरंपरा निर्धारपूर्वक अखंड सुरू ठेवली आहे. बदलत्या तंत्रज्ञानाचा, विदेशी बाजारपेठांचा अभ्यास संघ करीत असून बिगर पेटंट वाणदेखील उपलब्ध होण्यासाठी परिश्रम घेत आहे. बागायतदारांचा वाढीव खर्च कमी करण्यासाठी उपयुक्त सल्ला आणि पीक संरक्षणाची उत्पादने किफायतशीरदरात संघाकडून उपलब्ध करून दिली जात आहेत.’’ फळपीक विमा योजनेत सुधारणा करणे, द्राक्ष विकास परिषदेची स्थापना, अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त झालेल्या बागांना भरपाई, मनरेगामधून लागवडीसाठी मदत अशा मुद्द्यांवर संघाकडून पाठपुरावा सुरू असल्याचे श्री. पवार यांनी नमुद केले. ‘‘कर्जपुरवठा, निर्यात, देशी बाजारपेठांमधील सुविधा तसेच द्राक्षशेतीच्या बळकटीकरणासाठी सरकारी विभागांप्रमाणेच अपेडा, शेतकरी उत्पादन कंपन्या व निर्यातदारांसोबत सतत समन्वय ठेवण्याचा प्रयत्न बागाईतदार संघाचा राहील,’’ अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com