मराठवाड्यात कृत्रिम पाऊस कधी पाडणार?

मराठवाड्यात कृत्रिम पाऊस कधी पाडणार?
मराठवाड्यात कृत्रिम पाऊस कधी पाडणार?

औरंगाबाद : दोन-तीन दिवसांपासून मराठवाड्यातील काही भागांत ढग दाटून येतात. पाऊस खूप येतो असे वाटत, पण प्रत्यक्षात चार-दोन ठिकाणे वगळता तुरळक ते हलकाच पाऊस होतो. ढग असताना कृत्रिम पावसासाठी नसलेली तयारी पाहता कृत्रिम पावसाचा प्रयोग मराठवाड्यातही केला जाणार असल्याची घोषणा प्रत्यक्षात कधी उतरणार हा प्रश्न शेतकरी विचारत आहे.   जसजसे पावसाळ्याचे दिवस संपत चालले आहेत. तसतशी मराठवाड्यातील जनतेची धाकधूक वाढत चालली आहे. काही भागात पिकापुरता पाऊस दिसत असला तरी बहुतांश भागात पावसाची प्रतीक्षा आहेच. एकूण ७६ पैकी ३६ तालुक्‍यात अपेक्षीत पावसाच्या तुलनेत ५० टक्‍केही पाऊस झाला नाही. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणसह, जालना जिल्ह्यातील तीन, परभणीमधील पाच,  हिंगोलीतील तीन, नांदेड व बीडमधील प्रत्येकी आठ, लातूर व उस्मानाबादमधील प्रत्येकी चार तालुक्‍यांचा समावेश आहे. अपेक्षेच्या तुलनेत ५०  टक्‍क्‍यांच्या आत पाऊस झालेल्या ३८ तालुक्‍यांपैकी १२ तालुक्‍यात तर अपेक्षेच्या ४० टक्‍केही पाऊस झाला नाही. सर्वांत कमी २७ टक्‍के पाऊस हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्‍यात झाला.  पावसाची भीषण स्थिती असताना मराठवाड्यातील काही भागात गत दोन तीन दिवसांपासून आकाशात ढगांचा मंडप दिसतो. परंतु प्रत्यक्षात काही ठिकाणीच तुरळक वा हलका पाऊस पडण्यापलीकडे पावसाची हजेरी दिसत नाही. त्यामुळे दुष्काळी भागात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी शासनाने आधीच केलेली ३० कोटी रुपयांची तरतूद पाहता त्या मार्गाचा अवलंब शासनाकडून केव्हा केला जातो हा प्रश्न आहे. यंदा या प्रयोगासाठी सोलापूर, औरंगाबाद व शेगाव ही तीन स्थान निश्चित करण्यात आली आहेत.  

यापूर्वी २०१५ मध्ये कृत्रिम  पावसाचा  प्रयोग औरंगाबाद येथील विभागीय आयुक्‍तालयाच्या इमारतीवर रडार बसवून करण्यात आला होता. आता कृत्रिम पाऊस पाडायचा असेल तर ही यंत्रणा सर्वांत आधी उपलब्ध करून घेणे आवश्‍यक आहे. आकाशात ढगांची गर्दी होत ते ढग पावसाचे आहेत की नाही याची कल्पना रडार यंत्र देत असते.  त्यासाठी कृत्रिम पाऊस पाडायची यंत्रणा आधीच सज्ज असायला हवी. परंतु मराठवाड्यात ती अजून प्रत्यक्षात आली नाही. तीन  दिवसांपूर्वी कृत्रिम पाऊस पाडण्यासंदर्भातील रडारचे स्टॅंडसारखे दिसणारे लोखंडी साहित्य आयुक्तालयाच्या आवारात येऊन पडले. परंतु  हे साहित्य रडारचे दिसते, मात्र ते नेमके कुणी आणून टाकले, याची माहितीच उपलब्ध नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

आयुक्‍तालयाला कृत्रिम पावसाच्या प्रयोगाविषयी अजून कोणत्याही सूचना शासनस्तरावरून नाहीत. त्यामुळे शासन कृत्रिम पावसाच्या प्रयोगाविषयी गंभीर आहे की नाही हा प्रश्न आहे. साधारणतः आषाढ महिन्यात आकाशात काळे ढग असतात. परंतु पाऊस त्या ढगांच्या प्रमाणात पडत नसल्याचा अनुभव आहे. दुसरीकडे कृत्रिम पावसाचा प्रयोग सप्टेंबरमध्ये केल्यास त्या वेळी आकाशात फारसे ढग नसतात. त्यामुळे त्यावेळी कृत्रिम पावसाचा प्रयोग केल्यास त्याचा उपयोगच होणार नसल्याचे जाणकार सांगतात. 

कृत्रिम पावसाविषयीची स्थिती...

  • मराठवाड्यात बहुतांश भागांत पावसाची प्रतीक्षा
  • ३८ तालुक्यांत सरासरीच्या ५० टक्‍क्यांपेक्षा कमी पाऊस
  • कृत्रिम पावसासाठी शासनाकडून ३० कोटींची तरतूद
  • दिवसभर ढगांची दाटी होत असल्याने कृत्रिम पावसाला पोषक स्थिती
  • रडार यंत्रणाही बसविण्यात आली नाही
  • आयुक्‍तालयाला अद्यापही शासन स्तरावरून सूचना नाहीत  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com