आज आषाढी एकादशी

पंढरपुरात रविवारी (ता.२२) सकाळच्या प्रहरापासूनच चंद्रभागेतील स्नानासाठी वारकऱ्यांची उडालेली झुंबड.
पंढरपुरात रविवारी (ता.२२) सकाळच्या प्रहरापासूनच चंद्रभागेतील स्नानासाठी वारकऱ्यांची उडालेली झुंबड.

पंढरपूर :  त्रिविध तापांची झाली बोळवण । देखील्या चरण वैष्णवांचे ।। एका जनार्दनी घडो त्याचा संग । न व्हावा वियोग जन्मोजन्मी ।। अशी आर्त भावना मनात ठेवून आषाढी सोहळ्यात सहभागासाठी राज्यभरातून सुमारे सहा लाखाहून अधिक वारकऱ्यांची मांदियाळी रविवारी (ता.२२) पंढरीत दाखल झाली. या सोहळ्यात दशमीच्या स्नानाला विशेष महत्त्व असल्याने रविवारी पहाटेपासूनच चंद्रभागा तिरावर वारकऱ्यांची गर्दी झाली होती. टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषाने अवघी पंढरी भक्तिरसात न्हाऊन गेली.  दरम्यान, सोमवारी (ता.२३) आषाढी यात्रेचा मुख्य सोहळा साजरा होत असून, पहाटे श्री विठ्ठल-रुक्‍मिणीची शासकीय महापूजा होणार आहे.  राज्यासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशातूनही लाखो भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. आषाढी यात्रेच्या सोहळ्यात सहभागासाठी राज्यभरातून निघालेल्या विविध संतांच्या पालख्यांनीही आज पंढरपुरात प्रवेश केला. त्याशिवाय दर काही मिनिटाला एस. टी. बसेस, खासगी गाड्या आणि रेल्वेने वारकरी पंढरपुरात दाखल होत असल्याने चोहोबाजूने भक्तिरसाचा प्रवाह पंढरीत एक होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. चंद्रभागा वाळवंट आणि शहरातील विविध मठ, धर्मशाळांमध्ये "टाळ, मृदंगाचा गजर आणि हरिनामाचा अखंड जयघोष सुरू आहे. रविवारी वाखरी (ता. पंढरपूर) येथून निघालेल्या श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासह विविध संतांच्या पालख्यांनी पंढरपुरात प्रवेश केला. शहरातील मठ, धर्मशाळा आदी ठिकाणांसह चंद्रभागेच्या वाळवंटात वारकऱ्यांच्या राहुट्यांमधून भजन, कीर्तनाचे कार्यक्रम सुरू आहेत. चंद्रभागेतील स्नानासाठी लाखो भाविकांची चंद्रभागेतीरी झुंबड उडाली आहे. विठ्ठल पदस्पर्श दर्शनाची रांग गोपाळपुराच्या पुढे गेली आहे. दर्शनरांगेत जवळपास दीड लाखाहून अधिक वारकरी दर्शनासाठी उभे आहेत. क्षणोक्षणी वारकऱ्यांची गर्दी वाढतेच आहे. शासकीय महापूजेला मुख्यमंत्री येणार नाहीत परंपरेप्रमाणे आषाढी वारीतील मुख्य शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्निक होते. परंतु यंदा मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणावरून जिल्ह्यातील विविध भागात आंदोलने सुरू केले आहे. तसेच ही महापूजा रोखण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आपण या महापूजेला येणार नसल्याचे जाहीर केल्याने यंदा पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांविना हा सोहळा पार पडणार आहे. 

पंढरीतील क्षणचित्रे 

  • चंद्रभागेवर दशमीच्या स्नानासाठी वारकऱ्यांची गर्दी.
  • विठ्ठल दर्शनाची रांग गोपाळपुरापर्यंत 
  • दर्शनरांगेत दीड लाखाहून अधिक वारकरी.
  • दर्शनरांगेतून दर्शनासाठी २० तासांचा अवधी 
  • प्रतिमिनिटाला ३५ ते ४० वारकऱ्यांना दर्शन.
  • विविध मंदिरे, मठ, धर्मशाळात कीर्तन, भजनाचे सूर  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com