बचत गट करणार ‘ऑनलाइन रिटेलिंग’; ‘अस्मिता बाजार’ला प्रारंभ

बचत गट करणार ‘ऑनलाइन रिटेलिंग’; ‘अस्मिता बाजार’ला प्रारंभ
बचत गट करणार ‘ऑनलाइन रिटेलिंग’; ‘अस्मिता बाजार’ला प्रारंभ

मुंबई : ग्रामीण भागातील महिला बचत गटांना त्यांच्या उत्पादनांची आता ‘अस्मिता’ ॲपच्या माध्यमातून ऑनलाइन विक्री करता येणार आहे. याशिवाय खाद्यपदार्थ, लहान मुलांना लागणाऱ्या आवश्यक वस्तू, सौंदर्य प्रसाधने, घरगुती उपयोगी वस्तू, पशू खाद्य आदी साहित्याचीही या ॲपच्या साह्याने बचत गटांना रिटेलर म्हणून विक्री करता येणार आहे.  जागतिक महिलादिनी ग्रामविकास आणि महिला-बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते या संदर्भातील ‘अस्मिता बाजार’ या योजनेला सुरवात करण्यात आली. प्ले स्टोअरवर यासाठीचे ‘अस्मिता ॲप’ उपलब्ध असून त्या माध्यमातून महिला बचत गटांना ई-कॉमर्सची संधी मिळाली आहे. येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामीण जीवनोन्नती अभियान विभागामार्फत आयोजित या कार्यक्रमात महिलांना दर्जेदार सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून देणाऱ्या ‘अस्मिता प्लस’ योजनेची सुरवातही मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आली. अस्मिता प्लस हे फोल्‍डिंग नसलेले, लिकप्रूफ टेक्नॉलॉजी असलेले व अधिक लांबीचे (२८० एमएम) सॅनिटरी नॅपकीन आहे. या सॅनेटरी नॅपकीनमुळे शरीरावर कोणत्याही प्रकारचे रॅशेस येणार नाहीत व वापर कालावधीत ओलसरपणा जाणवणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. फक्त ५ रुपयांमध्ये ग्रामीण भागातील मुलींना हे सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध होणार आहेत. मंत्री पंकजा मुंडे या वेळी म्हणाल्या, महिला या जोपर्यंत कुटुंबाचा आर्थिक आधार बनत नाहीत तोपर्यंत त्यांचे खऱ्या अर्थाने सक्षमीकरण होणार नाही. यासाठीच ग्रामविकास आणि महिला-बालविकास विभागामार्फत बचतगटांच्या चळवळीला गती देण्यात आली आहे. राज्यात साडेतीन लाख बचत गट स्थापन झाले असून, त्या माध्यमातून ४० लाख कुटुंबे उमेद अभियानाशी जोडली गेली आहेत. बचत गटांना फक्त पारंपरिक बाजारपेठेत अडकवून न ठेवता ई-कॉमर्सच्या माध्यमातून त्यांच्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून दिली जात आहे. यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत (माविम) बचत गटांची काही उत्पादने ॲमेझॉनवर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. उमेद अभियानामार्फत ‘सरस महालक्ष्मी’ हे मोबाईल ॲप सुरू करण्यात आले आहे. आज सुरू करण्यात आलेल्या ‘अस्मिता बाजार’ योजनेच्या माध्यमातून बचत गटांची ऑनलाइन व्यापाराची चळवळ  अजून गतिमान होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता म्हणाले, मासीक पाळीच्या काळात महिलांनी सॅनिटरी नॅपकीन वापरण्याचे प्रमाण फक्त १७ टक्के इतके आहे. येत्या काही काळात अस्मिता योजनेच्या माध्यमातून हे प्रमाण ८० ते ९० टक्क्यांपर्यंत नेण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. आज सुरू करण्यात आलेल्या ‘अस्मिता प्लस’ योजनेतून ही चळवळ अधिक गतिमान होईल. ‘अस्मिता बाजार’ योजनेतून महिला बचतगटांना रोजगार मिळण्याबरोबरच ग्रामीण ग्राहकांना विविध वस्तू माफक दरात उपलब्ध होणार आहेत, असेही त्यांनी या वेळी सांगितले. उमेद अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला या वेळी म्हणाल्या, ग्रामीण भागातील महिला आता ऑनलाइन व्यवहार, ई-कॉमर्स आदींमध्ये पारंगत होत आहेत. उमेद अभियानामार्फत यासाठी त्यांना विविध प्रशिक्षणे देण्यात येत आहेत. यासाठीच ‘अस्मिता बाजार’ योजनेचा प्रारंभ करण्यात आला असून या माध्यमातून बचत गटांच्या उत्पादनांना मोठे ऑनलाइन मार्केट मिळेल. पहिल्या टप्प्यात पालघर, नाशिक, रायगड, पुणे, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांत ही योजना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमास निवृत्त अपर मुख्य सचिव सुधीरकुमार गोयल, उमेद अभियानाचे मुख्य परिचालन अधिकारी रवींद्र शिंदे, उपसंचालक प्रकाश खोपकर, अनिल सोनवणे यांच्यासह बचत गटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com