विधानसभा निवडणुकीचा आज निकाल

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई  ः चौदाव्या विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल आज (ता. २४) लागणार आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरवात होऊन दुपारपर्यंत राज्यात कुणाची सत्ता येईल याचे चित्र स्पष्ट होईल. मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून, मतमोजणीस्थळी तसेच निकालानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस खात्यानेही कंबर कसली आहे. 

विधानसभेच्या २८८ मतदारसंघांसाठी सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर आज मतमोजणी होत आहे. २८८ विधानसभा मतदारसंघांसाठी जवळ जवळ तितक्याच मतमोजणी केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यभरातील २६९ ठिकाणी ही मतमोजणीची प्रक्रिया पार पडेल, काही ठिकाणी एकापेक्षा अधिक मतदारसंघांची मतमोजणी होणार आहे. सकाळी आठ वाजता टपाली मतदानाने मोजणीची सुरवात होईल, त्यानंतर ईव्हीएम यंत्रातील मते मोजली जातील. ‘ईव्हीएम’मधील मतमोजणीआधी प्रत्येक मतदारसंघातील पाच व्हीव्हीपॅट यंत्रांमधील मतांची मोजणी केली जाईल, चिठ्ठ्या टाकून ही व्हीव्हीपॅट यंत्रे निवडली जाणार आहेत. व्हीव्हीपॅट यंत्रांमधील मतांची ‘ईव्हीएम’मधील मतांशी पडताळणी करून खात्री केली जाणार आहे.  प्रत्येक मतदारसंघांमधील बूथनिहाय मतमोजणीसाठी साधारण १४ ते २० टेबल्स ठेवण्यात येणार आहेत.  

प्रत्येक टेबलवर एक पर्यवेक्षक, दोन सहायक, एक मायक्रो ऑबझर्व्हर आणि इतर तांत्रिक कर्मचारी उपस्थित असणार आहेत. साधारण २५ हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचारी मतमोजणीसाठी तैनात करण्यात आले आहेत. तसेच उमेदवारांच्या प्रतिनिधींनाही मतमोजणीवेळी उपस्थित राहण्याची मुभा राहणार आहे. मतमोजणीला सुरवात झाल्यानंतर फेरीनिहाय निकालाची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी करणार आहेत. ईव्हीएम यंत्रे ठेवलेल्या ठिकाणी म्हणजेच स्ट्राँगरूमपासून ते मतमोजणीच्या ठिकाणी आणेपर्यंत आणि मतमोजणीनंतर पुन्हा स्ट्राँगरूमपर्यंत पोचेपर्यंतच्या सर्व घटनाक्रमाचे व्हिडिओ शूटिंग केले जाणार आहे. ‘ईव्हीएम’च्या सुरक्षेसाठी स्ट्राँगरूम परिसरात त्रिस्तरीय पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच मतमोजणीस्थळी आणि निकालानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. राज्यभर चोख पोलिस फौजफाटा तैनात असणार आहे. 

दरम्यान, मतदानोत्तर निवडणूक चाचण्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचेच सरकार राज्यात पुन्हा येईल असे अंदाज वर्तवले आहेत. त्यामुळे महायुतीच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. निकालानंतर विजयोत्सव साजरा करण्यासाठी भाजप, शिवसेनेचे उत्साही कार्यकर्ते सज्ज आहेत. विजयी मिरवणुकांसाठी गुलाल, फटाके आदींची व्यवस्था केली जात आहे. राज्यातील जनता भाजप-शिवसेनेच्या सरकारला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, असा आत्मविश्‍वास काँग्रेस आघाडीकडून व्यक्त केला जात आहे. सत्तेसाठी दोन्ही बाजूंकडून असे दावे-प्रतिदावे केले जात असल्याने नागरिकांमध्ये निकालाबाबत कमालीची उत्सुकता लागली आहे. मतमोजणीला सुरवात झाल्यानंतर साधारण तासाभरात निकालाचे कल समजू शकणार आहेत, तसेच दुपारपर्यंत सर्व मतदारसंघांतील निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. जनता सत्तेचे माप कुणाच्या पदरात टाकणार हे समजू शकणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com