शेतकऱ्यांना प्रतिहेक्‍टरी २५ हजारांची मदत करा ः प्रवीण दरेकर

Assist farmers for Rs 25,000 per hectare: Praveen Darekar
Assist farmers for Rs 25,000 per hectare: Praveen Darekar

नागपूर ः राज्यात मॉन्सूनोत्तर पावसामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हेक्‍टरी २५ हजार रुपयांची मदत तातडीने जाहीर करा, अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी गुरूवारी (ता. १९) सभागृहात दिला.

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान सत्ताधाऱ्यांवर टीका करीत दरेकर यांनी विविध मुद्यांवरून सरकारला धारेवर धरले. 

श्री. दरेकर म्हणाले, की तत्कालीन काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याकरिता एकूण दहा हजार कोटींची घोषणा केली होती. हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून केवळ चार हजार ५०० कोटी रुपयांची तुटपुंजी मदत जाहीर करण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. नवीन सरकार सत्तेत आल्यानंतरचे हे पहिलेच अधिवेशन असताना यामध्ये महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील भव्य स्मारकाबाबत कोणताच उल्लेख नाही. यावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मत मागणारे सरकार आज दैवतालाच विसरले असल्याचा टोलाही त्यांनी हाणला. दहा रुपयांमध्ये जेवणाची थाळी, अशी घोषणा राज्यपाल यांच्या अभिभाषणात केली आहे. मात्र या योजनेची अवस्था सन १९९५ मध्ये घोषित केलेल्या ‘झुणका भाकर’ केंद्रासारखी होऊ नये, असा चिमटा शिवसेनाला काढला. एक रुपयामध्ये क्‍लिनिकल सुविधा देण्याच्या योजनेची केलेली घोषणा ही अत्यंत स्तुत्य आहे. परंतु सद्यःस्थितीत प्रत्येक सार्वजनिक आरोग्य केंद्राला एमबीबीएस दर्जाचे वैद्यकीय अधिकारीसुद्धा नाहीत. त्यामुळे सर्वप्रथम किमान मूलभूत सुविधा पुरवाव्यात. अन्यथा, ही पण एक घोषणाच होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. 

ग्रामीण भागाच्या विकासासोबतच शहरी भागातील नागरिकांसाठी शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून विकासकामांवर भर देण्यात यावा. ग्रामीण भागाचा विकास करीत असताना शहरी भागाकडे शासनाने दुर्लक्ष करू नये. शहरातील मलनिस्सारण, अंतर्गत रस्ते, गटारे, पुरेसा पाणीपुरवठा, मूलभूत सुविधा पुरविण्यात याव्यात. शहरी भागातील नागरिकांनाही दिलासा द्यावा, असेही दरेकर म्हणाले.  अवकाळी पावसामुळे जीवन मरणाच्या दारात उभ्या असणाऱ्या या बळिराजाला पुन्हा उभारी देण्यासाठी प्रतिहेक्‍टरी २५ हजार रुपयांची मदत तातडीने घोषित करावी. अन्यथा त्याकरिता या सर्व अस्वस्थ शेतकऱ्यांसह विरोधी पक्ष निश्‍चितच रस्त्यावर उतरेल, असा इशाराही दरेकर यांनी दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com