अजातशत्रू

अजातशत्रू
अजातशत्रू

देशाच्या राजकारणात आपल्या शालीन, सभ्य राजकारणाने विरोधकांच्याही मनात आदराचे स्थान निर्माण करणाऱ्या अटलबिहारी वाजपेयी यांनी देशाचे पंतप्रधान या नात्याने आपल्या कार्यकर्तृत्वाची मुद्रा उमटवली. भारतीय जनता पक्षाची मुहूर्तमेढ रोवून पक्षाची काँग्रेसला पर्यायी आघाडी निर्माण करण्यापर्यंत वाटचाल केली. पाकिस्तानला धूळ चारली तर चीनसारख्या शेजाऱ्याशी जवळीक साधताना परराष्ट्र धोरणाला वेगळा आयाम दिला... स्वातंत्र्यानंतरच्या काळात भारतात देशव्यापी लोकप्रियता लाभलेले आणि देशाचे नेतृत्व केलेल्या नेत्यांच्या यादीत अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव फार वरचे असेल. कार्यकर्त्यांसह विरोधकांमध्येही लोकप्रिय असलेल्या वाजपेयींनी राजकीय, सामाजिक आणि मानवीय पातळीवर स्वतःचे तत्त्वज्ञान तयार केले. त्याचे बाळकडू कार्यकर्त्यांच्या गळी उतरवून त्यांची मोठी फळी उभी केली. त्यांनी कधीही वाक्‍युद्ध करून आपला हिनकसपणा दाखवला नाही. वाजपेयींनी पत्रकार म्हणून सार्वजनिक जीवन सुरू केले. दिल्लीतून प्रकाशीत होणाऱ्या ‘वीर अर्जून’साठी त्यांनी काम केले. प्रसिद्ध पत्रकार के नरेंद्र त्याचे संपादक होते. डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासोबत कार्याला सुरवात करण्याआधी पन्नासच्या दशकात त्यांनी सहायक संपादक म्हणून काम केले. नंतर ‘वीर अर्जून’ या दैनिकाची लोकप्रियता आणि खप घसरला, त्याचा जोश घटला तरीही वाजपेयींच्या मनावर त्याने अखेरपर्यंत अधिराज्य केले. वाजपेयी पंतप्रधान असताना असो नाहीतर ते आजारपणातून बाहेर पडत असताना प्रत्येकवेळी त्यांच्याकडील वर्तमानपत्राच्या गठ्ठ्यात ‘वीर अर्जून’ असायचा आणि ते तो आवर्जून वाचायचे. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधील शिंदे की छावणी भागात २५ डिसेंबर १९२४ रोजी कृष्णादेवी आणि कृष्णा बिहारी वाजपेयी यांच्या पोटी अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म झाला. वाजपेयी आयुष्यभर अविवाहीत राहिले, ते देशाचे पहिले अविवाहित पंतप्रधानही ठरले. वाजपेयी यांनी राजकारणात जसा आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला होता, त्याचप्रमाणे साहित्य आणि पत्रकारिता या क्षेत्रातही योगदान दिले.      

दूरदृष्टीचा नेता अटल बिहारी वाजपेयी यांनी १९९८- ९९ या काळात पंतप्रधान म्हणून देशाचे नेतृत्व केले. याच काळात मे १९९८ मध्ये पोखरण येथे आण्विक चाचणी घेऊन भारताने जगातल्या निवडक देशात आपले स्थान निर्माण केले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कटूता कमी करून उभयतांमधील चर्चेला नवे वळण देणे आणि तिढा सोडविण्याच्या प्रयत्नाला गती देण्यासाठी फेब्रुवारी १९९९ मध्ये उभय देशांमधील बससेवेने गती देण्यात आली. भारताच्या या प्रामाणिक प्रयत्नाचे जगभरातून कौतुक झाले. भारताने पुढे केलेल्या या मैत्रीच्या हाताला झिडकारत पाकिस्तानने कारगिलमध्ये घुसखोरी करून घातकी राजकारण केले; तेव्हा त्यांच्या नेतृत्वाखाली चोख प्रत्युत्तर देण्यात येऊन भारतीय भुमीवरील हल्ला परतवून लावण्यात आला. जगभरात मंदीची लाट असताना वाजपेयींच्या नेतृत्वाखाली १९९८- ९९ मध्ये भारताने देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात (जीडीपी) ५.८ टक्के वाढ केली, ती आधीच्या वर्षापेक्षा जास्त होती. वाढलेले शेती उत्पादन आणि परकीय चलनाच्या साठ्यात झालेल्या वाढीने देशाच्या अर्थकारणाला नवी दिशा मिळत असल्याचे संकेत मिळाले. ग्रामीण भागातील गरिबांच्या उत्थानासाठी आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी, ‘‘आपल्याला वेगाने वाढले पाहिजे, याशिवाय आपल्याला तरणोपाय नाही,’’ असे विधान वाजपेयींनी केले होते. एकविसाव्या शतकात भारताला आर्थिक महासत्ता बनविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या नेत्याने सरकार पातळीवर अनेक धाडसी निर्णय घेतले. ग्रामीण अर्थकारण सक्षम करण्याचा प्रयत्न केला. पायाभूत सुविधांच्या विस्ताराला चालना दिली, मानवी साधन संपत्ती विकासाला प्रोत्साहन दिले. बावन्नव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला उद्देश भाषण करताना वाजपेयी यांनी, ‘‘मी भारताचे एक चित्र पाहिले आहे ः भूक आणि भयापासून मुक्त असलेला भारत, निरक्षरता आणि दारिद्रयापासून मुक्त असलेला भारत.’’ 

पददलितांबद्दल कळवळा वाजपेयी हे स्वातंत्र्य चळवळीत योगदान दिलेले नेते होते. १९४२ च्या आंदोलनात त्यांनी तुरूंगवासही पत्करला होता. १९७५- ७७ या काळातील आणिबाणीच्या काळातही ते काही महिने तुरूंगात होते. जगात मोठ्या प्रमाणात भ्रमंती केलेल्या वाजपेयींना आंतरराष्ट्रीय राजकारण, अनुसूचीत जाती आणि जमातींचे उत्थान, महिला आणि बालकांचे कल्याण यामध्ये विशेष रूची होती.  देशाच्या सेवेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल १९९२ मध्ये वाजपेयींनी पद्मविभूषणने सन्मानीत करण्यात आले. १९९३ मध्ये कानपूर विद्यापिठातर्फे सन्माननीय डॉक्‍टरेट ऑफ फिलॉसॉफीने त्यांना विभुषीत करण्यात आले. कवी आणि लेखक म्हणूनही वाजपेयी यांनी साहित्यविश्‍वावर आपल्या अभिजात रसिकतेची मोहोर उमटवली.   

भाजपची मुहूर्तमेढ १९७९ मध्ये मोरारजी देसाई यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आणि जनता पक्ष त्यानंतर विसर्जित करण्यात आला. या काळात भारतीय जनसंघाने विरोधी आघाडी होण्यासाठी मोठी किंमत मोजली होती, पण निराशा पदरी आली; तर डावे पक्ष आघाडीच्या अंतर्गत बंडाळीने हैराण झाले होते. अखेरीस वाजपेयी यांनी भारतीय जनसंघ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांमधील आपल्या जुन्या सहकाऱ्यांना विशेषतः लालकृष्ण अडवानी, भैरोसिंह शेखावत यांच्यासारख्यांना बरोबर घेऊन भारतीय जनता पक्षाची (भाजप) मुहूर्तमेढ रोवली. वाजपेयी भाजपचे पहिले अध्यक्ष बनले आणि त्यांनी जनता पक्षाच्या वाटेने जाणाऱ्या काँग्रेसवर टिकेची झोड उठवली. भाजपने शिख दहशतवादाला कडाडून विरोध केला, तत्कालीन पंतप्रधान आणि काँग्रेसच्या नेत्या इंदिरा गांधी यांच्या फुटिरतवादी आणि भ्रष्ट कारभारावर टीका करण्याचा सपाटा लावला. भाजपने ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ला पाठिंबा दिला नव्हता, तसेच इंदिरा गांधी यांची १९८४ मध्ये त्यांच्या अंगरक्षकांनी हत्त्या केल्यानंतर शिखविरोधी झालेल्या हिंसाचाराबद्दल तीव्र विरोधाची भुमिका घेतली होती. या हिंसाचारात तीन हजारांवर शिखांना प्राणाला मुकावे लागले होते. गांधींच्या हत्त्येचा बदला घेण्यासाठी सरसावलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांपासून शिख नागरिकांना वाचवण्याचा प्रयत्न वाजपेयींनी केला होता. १९८४ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपचे दोनच संसद सदस्य निवडून आले होते. तथापि, त्यानंतर पक्षाने मुख्य प्रवाहाचे राजकारण करत, संघटनात्मक बांधणी तळागाळापर्यंत नेत आणि देशातील युवकांना आपल्याकडे आकर्षित करत काँग्रेस विरोधातील प्रबळ विरोधी पक्ष ही आपली प्रतिमा निर्माण केली. या सर्व काळात भाजपचे अध्यक्ष आणि संसदेतील विरोधी पक्ष नेते या नात्याने वाजपेयींनी आपले मोठे योगदान दिले. 

    गोध्रा दंगलीच्यावेळी वाजपेयी यांनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना ‘राजधर्माचे पालन करा,’ अशी सक्त सूचना केली होती. वाजपेयी सार्वजनिक जीवनातून निवृत्त झालेल्याला सुमारे दहा वर्षे झाल्यानंतर त्यांनी स्थापन केलेल्या पक्षावर आता नरेंद्र मोदी यांचे वर्चस्व आहे. वाजपेयी यांचे काही अनुनायी आणि समर्थक आज पक्षाच्या प्रमुख प्रवाहापासून काहीसे दूर फेकले गेलेले आहेत.      भाजपचे दिल्लीत अशोका मार्गावर मुख्यालय आहे, त्याच्यापासून जेमतेम पाच मिनिटांच्या अंतरावर वाजपेयी यांचे निवासस्थान कृष्ण मेनन मार्गावर आहे. गेली काही वर्षे ते व्हिलचेअरवरूनच घरातल्या घरात वावरायचे. प्रकृती खालावत गेल्याने पक्षासह कोणत्याही घडामोडींपासून ते तसे दूरच होते.      २००४ च्या निवडणुकीत ‘एनडीए’ला पराभवाचा झटका बसला त्यानंतर दोन महिन्यांनी वाजपेयी यांनी चार पानी लेख लिहिला होता आणि त्यात ‘एनडीए’चा आघाडीचा प्रयोग कसा यशस्वी झाला आणि काँग्रेसलाही आघाडीच्या वाटेने कसे जावे लागले, हे त्यात नमूद करताना वाजपेयींनी आघाडीचा प्रयोग कसे सुरूच राहतील, हे नोंदवले होते.  वाटचाल १९५१  भारतीय जनसंघाचे (बी. जे. एस.) संस्थापक सदस्य  १९५७  दुसऱ्या लोकसभेवर निवडून आले  १९५७ -७७  भारतीय जनसंघ पक्षाच्या  संसदीय पक्षाचे नेते  १९६२  राज्यसभा सदस्य  १९६६-६७ सरकारच्या ॲश्‍युरन्स कमिटीचे अध्यक्ष  १९६७ चौथ्या लोकसभेवर फेरनिवड (दुसऱ्यांदा) १९६७-७० सार्वजनिक लोकलेखा समितीचे अध्यक्ष  १९७१ पाचव्या लोकसभेवर फेरनिवड (तिसऱ्यांदा)  १९७७ सहाव्या लोकसभेवर फेरनिवड (चौथ्यांदा)  १९७७-७९ केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री  १९७७-८० जनता पक्षाचे संस्थापक सदस्य  १९८० सातव्या लोकसभेवर फेरनिवड (पाचव्यांदा)  १९८०-८६ भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष १९८०- ८४,  १९८६  १९९३- ९६ भाजपच्या संसदीय पक्षाचे नेते  १९८६  राज्यसभा सदस्य, जनरल पर्पज कमिटीचे सदस्य  १९८८-९०  हाऊस कमिटी आणि बिझनेस ॲडव्हायजरी कमिटी यांचे सदस्य  १९९०-९१  पिटीशन्स कमिटीचे अध्यक्ष १९९१ दहाव्या लोकसभेवर फेरनिवड (सहाव्यांदा)  १९९१-९३  सार्वजनिक लोकलेखा समितीचे अध्यक्ष १९९३-९६  लोकसभेतील विरोधी पक्ष नेते, परराष्ट्र व्यवहार समितीचे अध्यक्ष १९९६ अकराव्या लोकसभेवर फेरनिवड (सातव्यांदा)  १६ मे १९९६ ३१ मे १९९६  तेरा दिवसांचे पंतप्रधान. या काळात त्यांच्याकडे रसायन आणि खते, सार्वजनिक वितरण आणि ग्राहक व्यवहार, कोळसा, वाणिज्य, दळणवळण, पर्यावरण आणि वने, अन्नप्रक्रिया उद्योग, मानव साधनसंपत्ती विकास, कामगार, खाणी, अपारंपरिक उर्जा स्त्रोत, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, नियोजन आणि कार्यअंमलबजावणी, उर्जा, रेल्वे, ग्रामीण आणि रोजगार, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पोलाद, भूपृष्ठ वाहतूक, वस्त्रोद्योग, जलसंपत्ती, अणू उर्जा, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, जम्मू आणि काश्‍मिर व्यवहार, सागरी विकास, अंतराळ एवढ्या खात्यांचा कार्यभार होता  १९९६-९७  लोकसभेतील विरोधी पक्षनेते  १९९७-९८  परराष्ट्र व्यवहार समितीचे अध्यक्ष १९९८  बाराव्या लोकसभेवर फेरनिवड (आठव्यांदा)  १९९८-९९  भारताचे पंतप्रधान, परराष्ट्र व्यवहारमंत्री  १९९९   तेराव्या लोकसभेवर फेरनिवड (नवव्यांदा)  १३ ऑक्‍टोबर १९९९  १३ नोव्हेंबर २००४   भारताचे पंतप्रधान

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com