महाराष्ट्रात भावांतर योजना लागू करण्यासाठी प्रयत्न ः संजय धोत्रे

महाराष्ट्रात भावांतर योजना लागू करण्यासाठी प्रयत्न ः संजय धोत्रे
महाराष्ट्रात भावांतर योजना लागू करण्यासाठी प्रयत्न ः संजय धोत्रे

परभणी ः शेती एवढ्या समस्या कुठेच नाहीच. सर्व पिकांचे उत्पादन वाढले असले तरी उत्पादन खर्चही वाढल्याने मिळकत कमी झाली आहे. शेतकऱ्यांपुढील सर्वात भीषण संकट बाजारभावाचे आहे. त्यामुळे भावांतर योजना लागू झाली पाहिजे. महाराष्ट्रात भावांतर योजना लागू करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. पावसाअभावी सोयाबीनसह अन्य खरीप पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याची मागणी कृषिमंत्र्याकडे करणार आहोत, अशी ग्वाही महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष संजय धोत्रे यांनी सोमवारी (ता. १७) येथे दिली.

मराठावाडा मुक्‍तिसंग्राम दिनानिमित्त सोमवारी (ता. १७) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये विस्तार शिक्षण संचालनालय आणि कृषी विभागातर्फे आयोजित रब्‍बी शेतकरी मेळाव्याचे उद्‌घाटन श्री. धोत्रे यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. कुलगुरू डॉ. अशोक ढवण अध्यक्षस्थानी होती.

पुणे येथील कृषी तंत्रज्ञान उपयोजन संशोधन संस्‍थेचे संचालक डॉ. लाखन सिंग यांची प्रमुख उपस्थिती होती. विस्तार शिक्षण संचालक डॉ. पी. जी. इंगोले, संशोधन संचालक डॉ. विलास पाटील, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, जिल्हा परिषद उपाध्यक्षा भावना नखाते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी. आर. शिंदे, कार्यकारी परिषदेचे सदस्य बालाजी देसाई, अजय गव्हाणे, लिंबाजी भोसले आदी उपस्थित होते. या वेळी श्री. धोत्रे पुढे म्हणाले, कृषी विद्यापीठांचे संशोधन शेतकऱ्यांच्या शेतावर जात नाही तोपर्यंत त्याचा उपयोग नाही. शेतकरी आणि कृषी विद्यापीठ यांच्यात समन्वय आवश्यक आहे.

डॉ. लाखन सिंग म्हणाले, हवामानबदलाचे शेतीव्यवसायापुढे मोठे आव्हान आहे. त्यामुळे हवामानाचा अचूक अंदाज व्यक्त करण्यावर भर द्यावा लागणार आहे.

डॉ. ढवण म्हणाले, शेतकऱ्यांच्या समस्यांची कृषी विद्यापीठाला जाण आहे. हमीभाव जाहीर केल्यानंतर त्यानुसार खरेदीसाठी यंत्रणा उभी करणे आवश्यक आहे. ‘अॅग्रोवन’च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांसोबतच भावनांची दखल घेतली जाते. अॅग्रोवनचे मोबाईल अॅप तसेच संकेतस्थळ शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरत आहे, असेही डॉ. ढवण यांनी या वेळी नमूद केले. प्रास्ताविक डॉ. इंगोले यांनी केले. तांत्रिक सत्रात रब्बी पीक लागवड तंत्रज्ञान विषयावर माहिती देण्यात आली. रब्बी पीक बियाणे विक्रीस प्रारंभ करण्यात आला. शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पंचनाम्याच्या मागणीवरून गोंधळ सेलू तालुक्यातील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, शेतकऱ्यांनी वाळलेले सोयाबीनचे पीक मंचावर धोत्रे यांच्या समोर टाकले. पंचनाम्याची मागणी केली. यामुळे काही वेळ गोंधळ निर्माण झाला. मेळावा सुरू होण्यास उशीर झाला. त्यात दुष्काळी स्थिती असतांना हार-तुरे स्वीकारले, त्यामुळे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते कमालीचे संतप्त झाले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com