कापूस उद्योगाचे अमेरिका-चीनच्या चर्चेकडे लक्ष

कापूस उद्योगाचे अमेरिका-चीनच्या चर्चेकडे लक्ष
कापूस उद्योगाचे अमेरिका-चीनच्या चर्चेकडे लक्ष

जळगाव : चीन व अमेरिकेत मागील नऊ महिन्यांपासून सुरू असलेले व्यापार युद्ध समाप्त होण्याचे संकेत या दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या चर्चेमुळे मिळत आहेत. याच वेळी आंतरराष्ट्रीय कापूस बाजारासंबंधीच्या न्यूयॉर्क वायदामध्ये कापूस दरात सुधारणा झाली असून, कापूस दर ७३.४१ सेंटवर पोचले आहेत. भारतीय चलनानुसार ३५० रुपयांची वाढ या बाजारात कापसासंबंधी मागील दोन दिवसांत झाली आहे. चीन व अमेरिकेतील या चर्चेतून काय सकारात्मक बाबी मिळतात, याकडे शेतमाल प्रक्रिया, कापसाशी संबंधित जगभरातील उद्योजक, व्यापारी मंडळीचे लक्ष लागून आहे.  मागील दोन दिवस (ता. ८ व ९) व्यापार युद्ध चर्चा अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये झाली आहे. गुरुवारी (ता. १०) या चर्चेचा तिसरा दिवस होता. व्यापार युद्धामुळे अमेरिकेच्या कापसासह इतर शेतमाल व उत्पादनांच्या बाजाराला फटका बसला आहे. तर, चीनलाही फटका बसला असून, कापड, स्टील यांसंबंधी निर्यातीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. चीनच्या चलनाचे मागील तीन-चार महिन्यांत १० टक्‍क्‍यांनी, तर तुर्कीच्या चलनाचे पाच टक्‍क्‍यांनी अवमूल्यन झाले आहे. पाकिस्तानला एक डॉलर १४२ रुपयांत पडत आहे. अशा सगळ्या स्थितीत जगभरातील कापूस आयातदार देशांसमोर चीन व अमेरिकेतील व्यापार युद्धामुळे अडचणी उभ्या ठाकल्याने मोठी पडझड मध्यंतरी न्यूयॉर्क वायदामध्ये झाली. भारतासारख्या प्रमुख कापूस निर्यातदार देशातही उत्पादन कमी झालेले असताना, हवी तशी कापूस दरवाढ निर्यात रखडत सुरू असल्याने झालेली नाही. परंतु, मागील दोन दिवसांत जशी चीन व अमेरिकेतील अधिकाऱ्यांमध्ये व्यापारासंबंधी चर्चा सुरू झाली, तशी न्यूयॉर्क वायदामध्ये सुधारणा झाल्याची माहिती जाणकारांनी दिली.  भारतात मात्र दर स्थिर न्यूयॉर्क वायदामध्ये कापूस बाजारात सुधारणा झालेली दिसत असली, तरी याचा सकारात्मक परिणाम भारतीय कापूस बाजारात दिसत नाही. भारतीय कापूस बाजार स्थिर असून, खंडीचे दर (३५६ किलो रुई) ४२५०० व ४३५०० रुपयांवर स्थिर आहेत. कापसाचे दरही स्थिर आहेत. या महिन्यात कापूस गाठींची बाजारातील आवक वाढली आहे. सूत निर्यातीला हवी तशी चालना नसल्याने बाजारावर दबावाची स्थिती असल्याचे सांगण्यात आले.   भारतात उत्पादन घटीचा नवा अंदाज नुकतीच कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाची वार्षिक सर्वसाधारण सभा मुंबई येथील कॉटन ग्रीन स्टेशननजीकच्या कॉटन बिल्डिंगमध्ये झाली. यात असोसिएशनने कापूस उत्पादनासंबंधी नवा अंदाज व्यक्त केला असून, उत्पादन घटीची चिंता व्यक्त केली. ३३५ लाख गाठींचे (एक गाठ १७० किलो रुई) उत्पादन यंदा हाती येईल. पण, गाठींची गरजही काहीशी कमी होईल. भारतात कापसाची उत्पादकता वाढावी, अशी अपेक्षा  असोसिएशनने व्यक्त केल्याची माहिती खानदेश जिनींग प्रेसिंग कारखानदार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अरविंद जैन यांनी दिली.  अमेरिका व चीनमध्ये मागील दोन दिवस व्यापारासंबंधी चर्चा सुरू आहे. यातून काय सकारात्मक कापूस उद्योगाला मिळाले, हे तूर्त सांगणे कठीण आहे. सुताची हवी तशी निर्यात सध्या होत नसल्याने बाजारात दबाव आहे.  - राजाराम दुल्लभ पाटील, कार्यकारी संचालक, लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणी, शहादा  (जि. नंदुरबार)

चीन व अमेरिकेतील व्यापार युद्ध मागील आठ-नऊ महिन्यांपासून सुरू आहे. याचा परिणाम दोन्ही देशांच्या शेतमाल आयात-निर्यातीवर झाला असून, उद्योगाला मोठा फटका बसत आहे. परंतु, या दोन्ही देशांमध्ये मागील दोन दिवस वॉशिंग्टनमध्ये सकारात्मक चर्चा झाली असून, यामुळे कापसासंबंधी न्यूयॉर्क वायदामध्ये काहीशी उसळी दिसत आहे. ही चर्चा गुरुवारीही (ता.१०) सुरू होती. ती पुढेही सुरू राहील, असे मला वाटते.  - दिनेश हेगडे,  कापूस निर्यातदार, मुंबई

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com