औरंगाबाद जिल्ह्यात पावसाअभावी टोमॅटोचे आगार संकटात

पाण्याचे संकट पाहता गतवर्षी एका एकरात दीड हजार कॅरेट टोमॅटो उत्पादन झाले. ते यंदा हजार कॅरेट होईल का नाही, हा प्रश्‍न‌ आहे. आजही शेतकरी टॅकरने पाणी घालून टोमॅटोचे पीक वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. - संदीप गवळी,टोमॅटो उत्पादक, माळीवडगाव, जि. औरंगाबाद. पुरेसे पाणी नसल्याने विक्रीला येणाऱ्या टोमॅटोचा दर्जा चांगला नाही. त्यामुळे दरही कमी झालेत. पावसाची कृपा झाली तरच टोमॅटोचे उत्पादन शक्‍य होईल, अन्यथा काही खरे नाही. - इलियास बेग, टोमॅटो उत्पादक, वरूडकाजी, जि. औरंगाबाद.
औरंगाबाद जिल्ह्यात पावसाअभावी टोमॅटोचे आगार संकटात
औरंगाबाद जिल्ह्यात पावसाअभावी टोमॅटोचे आगार संकटात

औरंगाबाद :  जिल्ह्यातील टोमॅटोचे आगार संकटात सापडले आहे. पावसाची अत्यल्प हजेरी व आता आठवड्यापासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा आगारातील टोमॅटो उत्पादकांसमोर संकट उभे केले आहे. पाण्याच्या ताणामुळे टोमॅटोच्या दर्जावर परिणाम झाला आहे. डाग व करप्याचे संकट उत्पादन खर्चात वाढ करून गेल्याची स्थिती आहे.  

जिल्ह्यातील गंगापूर, वैजापूर, कन्नड तालुक्यांत जवळपास १२०० ते १५०० हेक्‍टर टोमॅटोचे क्षेत्र आहे. गंगापूर तालुक्‍यातील माळीवडगाव, ताडपींपळगाव, तासगाव, गवळी शिवरा, सावंगी, देवगाव, वडाची वाडी, फतीयाबाद, माळीवाडासह कन्नड आदी ठिकाणी टोमॅटोची खरेदी केली जाते. गंगापूर तालुक्‍यातील गाजगाव शिवारातच जवळपास शंभर हेक्‍टरवर टोमॅटोची लागवड झाली आहे. शिवाय औरंगाबाद तालुक्‍यातील वरूडकाजी, सुलतानपूर, हिरापूर, कच्ची घाटी, रामपूर, गंगापूर, बनगाव, गेवराई कुबेर, वरझडी, वडखा आदी गावशिवारात टोमॅटोची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. 

शेततळे असलेल्या शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवडीला प्राधान्य दिले. त्यातील पाण्यावर नियोजनपूर्वक टोमॅटोचे जतन केले. पाऊस येईल ही आशा होती. परंतु, लांबलेल्या व सर्वव्यापी न पडणाऱ्या, अत्यल्पच हजेरी लावणाऱ्या पावसाने टोमॅटोचे नुकसान केले. आजही अनेक टोमॅटो उत्पादक टॅंकरने विकत पाणी घेऊन पीक वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. जलस्रोतांनाही पाणी आलेले नाही. त्यामुळे आता पाऊस लांबल्यास टोमॅटोच्या उत्पादनात मोठा फटका बसण्याची शक्‍यता आहे. 

जूनच्या पहिल्या आठवड्यात लागवड केलेल्या टोमॅटोची खरेदी सुरू झाली आहे. २० जूननंतर लागवड केलेल्या टोमॅटोची आवक होण्याला मात्र अजून किमान पंधरवड्याचा अवधी लागणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. १५ ऑगस्टपासून गंगापूर तालुक्‍यात विविध ठिकाणी, औरंगाबाद तालुक्‍यातील वरूडकाजी येथे टोमॅटो खरेदीला सुरवात झाली आहे. पहिल्या दिवशी चारशे ते साडेचारशे रुपये कॅरेटचे मिळणारे दर आता २०० ते २८० रुपये प्रतिकॅरेटवर आले आहेत. वातावरणही पोषक नसल्याने करपा व डागांमुळे टोमॅटोचे दर घसरले असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

टोमॅटोची आवक गतवर्षी याचवेळच्या खरेदीचा विचार करता निम्म्यापेक्षाही कमी झाली आहे. दरवर्षी १५ ऑगस्टपूर्वी जिल्ह्यातील टोमॅटोच्या आगारात तळ ठोकून बसणारे विविध राज्यातील व्यापारीही यंदा फिरकले नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. वरूडकाजी परिसरात लोकल व्यक्‍तींकडूनच खरेदी सुरू आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com