शेतीकामावेळी उडणाऱ्या धूलिकणांपासून करा बचाव

शेतीमध्ये विविध यंत्रे, अवजारांचा वापर करताना उडणाऱ्या धूळ किंवा सूक्ष्म कणांमुळे शेतकऱ्यांच्या आरोग्याच्या अनेक समस्या उद्‌भवू शकतात. त्या टाळण्यासाठी यंत्रांचे आरेखन, निर्मिती आणि उत्पादन पातळीवर योग्य ते बदल करण्याची आवश्यकता असते.
The size of the dust and its effects on the human body
The size of the dust and its effects on the human body

शेतीमध्ये विविध यंत्रे, अवजारांचा वापर करताना उडणाऱ्या धूळ किंवा सूक्ष्म कणांमुळे शेतकऱ्यांच्या आरोग्याच्या अनेक समस्या उद्‌भवू शकतात. त्या टाळण्यासाठी यंत्रांचे आरेखन, निर्मिती आणि उत्पादन पातळीवर योग्य ते बदल करण्याची आवश्यकता असते. त्याच प्रमाणे प्रत्यक्ष काम करताना कामगारांनी योग्य ती काळजी घेतली पाहिजे. शेतामध्ये कृषी यंत्रे व अवजारे चालवताना यंत्र - माती, यंत्र -पीक यामध्ये विविध क्रिया होत असतात. त्यातून अनेक वेळा विविध घटकांचे सूक्ष्म कण (धूळ) तयार होते. सातत्याने धुळीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना श्‍वसनाशी संबंधित आजार होतात. शरीराच्या उघड्या त्वचा व अवयवांवरही वेगवेगळे विपरीत परिणाम किंवा आजार होतात. उदा. त्वचारोग इ. धुळीचे अजैविक आणि जैविक असे दोन प्रकार आहेत.

  • अजैविक धूळ ही मुख्यत्वे मूळ मातीच्या कणांपासून तयार होते. दुसऱ्या भाषेत सांगायचे म्हणजे यामध्ये मातीचे व खनिजाचे ते सूक्ष्म कण असतात.
  • जैविक धूळ ही वनस्पती आणि प्राण्यांच्या अवशेषापासून तयार होते.
  • शेतातील काम किंवा कष्ट करत असताना श्‍वसनाचा वेग वाढतो. संबंधित अवयवांना रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी हृदयावरील आणि श्‍वसन यंत्रणेवरील ताण वाढतो. यात ह्रदयाची गती वाढते. श्‍वासोच्छ्वास वाढल्यामुळे धुळीचे कणही श्‍वासासोबत अधिक प्रमाणात मानवी शरीरात शिरकाव करतात. श्‍वसनाची समस्या ही सर्वांत सामान्य आजार वाटत असला, तरी त्यांचा सर्वांत मोठा प्रभाव शेतकऱ्याच्या आरोग्यावर होतो. कृषी क्षेत्रात कार्यरत असलेल्या ट्रॅक्टरचालकांना नियंत्रित गटाच्या तुलनेत चारपट ॲलर्जीचा सामना करावा लागतो. ट्रॅक्टर आणि कम्बाइन हार्वेस्टरसारख्या यंत्राच्या चालकांना अन्य कृषी कामगारांपेक्षा दुप्पट अधिक समस्यांना सामोरे जावे लागते. हे लक्षात घेऊन गव्हाची मळणी करताना चालकांसोबत शेती कामगारांना उडणाऱ्या जैविक आणि अजैविक धूळिकणांचा सामना करावा लागतो. धुळीच्या आकारानुसार त्यांची मोजणी करण्यासाठी आधुनिक तंत्र उपलब्ध आहे. त्या कणांचे मानवी शरीरावर होणारे परिणाम जाणणे, संशोधन करणे शक्य होते. संशोधनातून उपाययोजना करता येते. धुळीच्या कणांचा आकारानुसार आरोग्यावरील परिणाम 

  • धुळीच्या कणाचे आकार ०.०१ ते १०० मायक्रॉनपर्यंत असतात. हे धुळीचे कण श्‍वसन करण्याच्या श्रेणीत ४० टक्क्यांपर्यंत अडकतात.
  • हवेतील धुळीचे आकार हे १ ते ३० मायक्रॉनपर्यंत असतात. १० ते २० मायक्रॉन (m) पेक्षा जास्त मोठे धुळीचे कण हे खडबडीत धूळ मानले जातात. त्यांचा मानवाच्या शरीरातील वरच्या हवेच्या परिच्छेदांमध्ये अडवले जातात.
  • १० मायक्रॉनपेक्षा लहान धूलिकणांना ‘सूक्ष्म धूलिकण’ असे म्हणतात. हे धूलिकण मानवी शरीरात हवेसोबत प्रवेश करू शकतात. ५ मायक्रॉनपेक्षा कमी आकाराचे धुळीचे कण फुफ्फुसाच्या अल्व्होलर प्रदेशात पोहोचू शकतात. सूक्ष्म धूलिकणातील काही भाग श्‍वसन नलिकेत जाऊन अडचणी निर्माण करू शकतात. यामुळे मानवाला श्‍वास घेण्यात बाधा निर्माण होते. त्यामुळे दम्याचा त्रास उद्‌भवू शकतो.
  • धुळीचे मानक प्रदर्शनाची मर्यादा   

    धुळीचे प्रकार ए.सी. जी.आय.एच. (मिलिग्रॅम प्रति मीटर घन ओ.एस.एच.ए. (मिलिग्रॅम प्रति मीटर घन)
    एकूण धूळ १० १५
    प्रतिसाद योग्य धूळ

    आधुनिक तंत्राद्वारे धुळीची तीव्रता मोजणे  धूलिकणांची तीव्रता मोजण्यासाठी एच.ए.झेड. डस्ट सॅम्पलर (ईपीएएम ५०००) या डिजिटल यंत्राचा वापर केला जातो. तीव्रता मोजण्यासाठी धुळीचे कण गोळा करून त्यांचे मापन केले जाते. या यंत्राद्वारे गव्हाची मळणी करताना उडणाऱ्या धूलिकणांची तीव्रता मोजण्याचे प्रयोग करण्यात आले. त्यासाठी या यंत्राचे धूलिकण गोळा करणारा भाग (सॅम्पलिंग हेड) हे २.५ मायक्रॉन, १० मायक्रॉन आणि टीएसपी प्रतिकृती आकार वापरून अभ्यास केला. त्यातून गव्हाची मळणी करतेवेळी निर्माण होणाऱ्या धूलिकणांची तीव्रता प्रत्येक पंधरा मिनिटांनंतर मोजण्यात आली. गव्हाची मळणी करताना मोजलेली धुळीची तीव्रता (मिलिग्रॅम प्रति घनमीटर)   

    धूळ मोजणीची जागा/ धुळीचे प्रकार पीक टाकण्याच्या ठिकाणी (मिलिग्रॅम प्रति घनमीटर धान्य येण्याच्या ठिकाणी (मिलिग्रॅम प्रति घनमीटर) भुस्सा जाण्याच्या ठिकाणी (मिलिग्रॅम प्रति घनमीटर)
    टीएसपी ०.८५४ ०.१६५ १०.६४३
    १० मायक्रॉन ०.५३७ ०.१२३ ५.८५४
    २.५ मायक्रॉन ०.३५६ ०.०७६ ३.९१०

    सर्व धूलिकणांच्या आकारात सर्वाधिक अजैविक धुळीची नोंद झाली. अभ्यासातून एसीजीआयएचनुसार निर्धारित मानक पातळीपेक्षा अधिक धूलिकणांचे प्रमाण असल्याचे आढळले. या धूलिकणांपासून बचाव कशा प्रकारे करायचा, याविषयी माहिती घेऊ. धूलिकणांमुळे मानवाच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम 

  • सातत्याने धुळीने भरलेल्या वातावरणामध्ये काम कराव्या लागणाऱ्या शेतकऱ्याला, कामगाराला विविध आजारांचा सामना करावा लागतो. धूलिकणांसोबतच विविध वायू, धुके आणि बाष्प यांचे एकत्रित परिणाम हे वेगळे असू शकतात. मात्र अभ्यासासाठी आपण केवळ धूलिकणांचा विचार केला आहे.
  • श्‍वसनामध्ये धूलिकण सातत्याने आल्यामुळे उद्‌भवलेल्या फुफ्फुसांच्या काही रोगांना ‘न्यूमोकोनिओसिस’ या नावाने ओळखले जाते. त्याच अर्थच ‘धूळ फुफ्फुस’ असा आहे.
  • धूलिकणाच्या आकार आणि प्रकारानुसार फुफ्फुसांवरील परिणाम वेगवेगळे असू शकतात. उदा. सिलिकायुक्त कणांमुळे फुफ्फुसांच्या पेशींना होणारी जखम वेगळी असते. ती वेगळी लक्षात येऊ शकते. जखम झालेली जागा आणि सामान्य पेशी एकमेकांपासून विभक्त होतात. मात्र या प्रक्रियेत फुफ्फुसांची लवचिकता पूर्णपणे गमावत नाही. याउलट, ॲस्बेस्टॉस, बेरेलिअम आणि कोबाल्ट कणांच्या संपर्कात पेशी आल्यास पेशी व सभोवतालाचा भाग कडक होतो आणि लवचिकता गमावतो. अनेक वेळा अशा कणांचे खोल वायुमार्गाच्या पृष्ठभागावर पूर्णपणे आच्छादन होते.
  • कार्बन आणि लोहाचे सूक्ष्मकण हे मॅक्रोफेजमध्ये राहतात. ते अगदी मृत्यूपर्यंत तसेच राहतात.
  • काही कण रक्तप्रवाहात विरघळतात. रक्तासोबत प्रवाहित होऊन ते ज्या ज्या अवयवांपर्यंत (उदा. मेंदू, मूत्रपिंड व अन्य) जातात. त्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
  • धूलिकणांचे विपरीत परिणाम रोखण्यासाठी उपाययोजना 

  • धोकादायक कचऱ्यांवर नियंत्रण ठेवणे. विविध यंत्रातून किंवा यंत्रामुळे उडणाऱ्या धूलिकणांचे प्रमाण कमीत कमी पातळीवर राखणे. त्यासाठी अभियांत्रिकी पातळीवर आवश्यक त्या सुधारणा यंत्रामध्ये करणे, ही बाब यंत्र उत्पादन, आरेखनकार, निर्माते यांच्या पातळीवर शक्य होते.
  • आवश्यक ती काळजी घेऊनही उडणाऱ्या किंवा निर्माण होणाऱ्या धूलिकणांपासून बचावासाठी योग्य ती वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे विकसित करणे आणि काम करणाऱ्या सर्वांनी ती वापरणे अत्यावश्यक ठरते.
  • स्वतः यंत्राचा मालक, कामगार यांनी धूलिकणांचे धोके आणि आरोग्यावरील विपरीत परिणामांची माहिती करून घेणे आवश्यक आहे. अशा वातावरणामध्ये दीर्घकाळ काम करणाऱ्या प्रत्येकाने योग्य त्या प्रकारच्या मुखपट्ट्या (मास्क) अथवा श्‍वसन यंत्रणा (रेस्पिरेटर्स) यांचा वापर केला पाहिजे.
  • यात यंत्र आणि त्यातून निर्माण होणाऱ्या धूलिकणांच्या प्रकारानुसार अगदी सुती कपड्यापासून विविध प्रकारची सुरक्षा उपकरणे उपलब्ध आहेत. आपल्या आरोग्यासाठी त्यांचा वापर करणे अत्यावश्यक आहे.
  • संपर्क :   शिवानंद शिवपुजे, ९४२१०८५२०२ (कनिष्ठ संशोधन सहायक, राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प, (नाहेप-कास्ट-डी.एफ.एस.आर.डी.ए.), वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com