तासगाव तालुक्यात पाणी सोडण्यास टाळाटाळ

तासगाव तालुक्यात पाणी सोडण्यास टाळाटाळ
तासगाव तालुक्यात पाणी सोडण्यास टाळाटाळ

सांगली ः जिल्हा प्रशासनाने उपसा सिंचन योजनांद्वारे टंचाई निधीतून विविध तलावांत पाणी सोडण्याचे आदेश दोन महिन्यांपूर्वी दिले आहेत. पण पाटबंधारे विभागाने या आदेशांना केराची टोपली दाखवली असल्याचे चित्र तासगाव तालुक्यात पाहायला मिळत आहे. आदेश दिलेल्या ३९ पैकी २० ठिकाणी गेल्या दोन महिन्यांत पाण्याचा एक थेंबसुद्धा सोडलेला नाही. यामुळे शेतकऱ्यांच्यातून संताप व्यक्त होत आहे. तासगाव तालुक्यातील काही भागात पाणी सोडले आहे. तेथील खोटी आकडेवारी पाटबंधारे विभागाचे अधिकारी सांगत असल्याचे आरोप नागरिकांतून होत आहेत. या भोंगळ कारभारामुळे जनतेवर पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. 

गेल्या वर्षी तासगाव तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. येत्या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये याची खबरदारी जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी अगोदरच घेतली आहे. यासाठी ल. पा. तलाव, पाझर तलाव, सिमेंट बंधारा, नदी आणि ओढा पात्र अशा तालुक्यातील ३९ ठिकाणी डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी व मार्च महिन्यात टंचाईतून पाणी सोडण्यात यावेत, असे आदेश त्यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार टेंभू उपसा सिंचन योजनेअंतर्गत येणारी विसापूर - पुणदी योजना, आरफळ योजना, ताकारी उपसा सिंचन योजना आणि म्हैसाळ योजनेतून ३९ ठिकाणी महिन्याला सरासरी पाणी सोडण्याचे नियोजन ठरवून देण्यात आले आहे. तसे लेखी आदेश संबंधित उप अभियंत्यांना देण्यात आहेत. परंतु, पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी फक्त १९ ठिकाणी नाममात्र पाणी सोडले आहे.

अधिकाऱ्यांकडून खोट्या आकडेवारीची टिमकी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर आतापर्यंत १९ ठिकाणी टंचाईतून पाणी सोडल्याचे कागदी घोडे पाटबंधारे विभागाचे अधिकारी नाचवत आहेत. या ठिकाणीसुद्धा नाममात्र पाणी सोडण्यात आले आहे. परंतु, दशलक्ष घनफुटाचे आकडे फुगवून पाणी सोडल्याची टिमकी पाटबंधारे विभागाचे अधिकारी वाजवत असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com