शेती, पूरक उद्योग अन् आरोग्याचा जागर

शेतकरी आणि ग्रामीण महिलांच्या जीवनात आश्वासक बदल करण्यासाठी अकोला जिल्ह्यात लोकजागर मंच ही स्वयंसेवी संस्था कार्यरत आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा तालुक्यात संस्थेने जल-मृदसंधारण, महिला बचत गट, प्रयोगशील शेतकऱ्यांचा गट तयार केला. शेती तसेच पूरक उद्योगाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम लोकसहभागातून राबविले जातात. --------------------- गोपाल हागे ---------------------
The organization office bearers while guiding the villagers.
The organization office bearers while guiding the villagers.

शेतकरी आणि ग्रामीण महिलांच्या जीवनात आश्वासक बदल करण्यासाठी अकोला जिल्ह्यात लोकजागर मंच ही स्वयंसेवी संस्था कार्यरत आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा तालुक्यात संस्थेने जल-मृदसंधारण, महिला बचत गट, प्रयोगशील शेतकऱ्यांचा गट तयार केला. शेती तसेच पूरक उद्योगाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम लोकसहभागातून राबविले जातात. अकोला जिल्ह्यात लोकजागर मंच ही स्वयंसेवी संस्था शेतकरी आणि ग्रामीण महिलांच्या जीवनात नवीन बदल घडविण्याचा उद्देश समोर ठेवून काम करत आहे. लोकजागर मंच या संस्थेचे अनिल गावंडे हे संस्थापक आहेत. अकोट, तेल्हारा तालुक्यात संस्थेने विविध गावांत शाश्वत विकासाची चळवळ पोचविण्यात यश मिळवले. या उपक्रमांना विविध स्तरांतून चांगले पाठबळ मिळत आहे. ग्रामविकासाचे सकारात्मक काम करणाऱ्या तरुणांचे हे संघटन विविध गावांमध्ये विस्तारले आहे. संस्थेने गेल्या तीन वर्षांपासून सामाजिक दृष्टिकोन असणारी तरुणांची पिढी उभी करीत ग्रामविकासाचे काम सातत्याने पुढे नेले. लोकजागरचे पाठबळ आणि लोकसहभागाने विविध प्रकारची कामे ग्रामीण भागात सुरू आहेत. मागेल त्याला शेतरस्ता  

  • अकोला हा प्रामुख्याने कृषीआधारित जिल्हा. अकोट, तेल्हारा या तालुक्यांमध्ये औद्योगिक विकास नसल्याने संपूर्ण अर्थकारण शेती व शेतीपूरक उद्योगावर अवलंबून आहे. या भागातील शेतकरी प्रयोगशील आहेत. तालुक्यात सिंचनाच्या सोयी-सुविधा चांगल्या आहेत. शेतकरीदेखील पीकपद्धती बदलत आहेत. शेतकऱ्यांना काळानुरूप योग्य दिशा देण्यासाठी संस्थेने घेतलेला पुढाकार फायदेशीर ठरला. आजही शेतापर्यंत जाण्यासाठी चांगले रस्ते नसल्याने अनेक अडचणींना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. सिंचनाच्या सोयी-सुविधा असूनही शेती अवजारे, तसेच शेतमाल वाहतुकीची वाहने शेतापर्यंत पोहोचू शकत नाहीत, त्यामुळे शेतकरी हंगामी पिके घेण्यास मागेपुढे पाहतात. शेतकऱ्यांची ही गरज लोकजागर मंचाने ओळखली.  
  • संस्थेने ‘मागेल त्याला शेतरस्ता’ या मोहिमेला सुरुवात केली. या मोहिमेच्या माध्यमातून हिवरखेड ते तळेगाव हा तीन किलोमीटर लांबीचा रस्ता तयार करण्यात आला. हा शेतरस्ता तयार करण्यासाठी दुतर्फा असलेल्या सर्व शेतकऱ्यांनी ना हरकत प्रमाणपत्र देत सहकार्य केले. ही चळवळ पुढे नेत लोकसहभागातून तळेगाव ते बेलखेड, तळेगाव ते घोडेगाव, चांगलवाडी, कार्ला, तेल्हारा, वाकोडी आदी ठिकाणीही शेतरस्ते शेतकऱ्यांनी केले. शेतरस्त्यांचा होणारा फायदा लक्षात घेऊन तालुक्याच्या इतर भागातील शेतकरीदेखील लोकसहभागातून रस्ते तयार करण्यासाठी पुढे आले आहेत.
  • शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन, सहली

  • अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्याच्या विविध भागांत शेतीमध्ये कोणते नवीन प्रयोग सुरू आहेत याची माहिती व्हावी, नवीन पद्धतीने पीक लागवड, मार्केटिंगची जोड कशी देता देईल या उद्देशाने लोकजागरच्या पुढाकाराने सातत्याने शेतकऱ्यांच्या सहली आयोजित केल्या जातात. तज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते.  
  • काही दिवसांपूर्वी संस्थेच्या १०० शेतकऱ्यांचा एक गट बारामती आणि परिसरात प्रयोगशील शेतकऱ्यांकडे भेट देण्यासाठी गेला होता. या गटाने दोन दिवस बारामती कृषी विज्ञान केंद्रात मुक्काम करीत तेथील तंत्रज्ञान जाणून घेतले. सोबतच या भागात जे शेतकरी नवनवीन प्रयोग करीत आहेत, त्यांच्यासोबत संवाद साधला. या गटाची डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसोबत चर्चा झाली.  
  • शेतकऱ्यांनी केवळ उत्पादनावर न थांबता मूल्यवर्धन करीत स्वतः विक्री व्यवस्था उभी करावी या उद्देशाने संस्थेने काम सुरू केले. आज लोकजागरमुळे १२०० शेतकऱ्यांचे संघटन तयार झाले आहे. ‘लोक डेअरी’ प्रकल्पाच्या माध्यमातून दूध संकलन आणि डेअरी उभारणीचे नियोजन सुरू झाले आहे, अशी माहिती अनिल गावंडे यांनी दिली.
  • जल-मृदसंधारणाची जागृती

  • गेल्या काही वर्षांत अनियमित पावसामुळे विविध गावांतील पाणीपातळी खोलवर गेली आहे. हे लक्षात घेऊन संस्थेने जल-मृदसंधारणाची मोहीम हाती घेतली. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्यावर्षी २२ गावे आणि यंदाच्या वर्षी १८ गावांमध्ये जनजागृती केली. जल-मृदसंधारणाच्या कामासाठी यंत्रणा संस्थेने उपलब्ध करून दिली आहे. लोकसहभागातून पाणीटंचाईवर मात करण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे.
  • आरोग्य शिबिरांचे आयोजन

  • संस्थेतर्फे गेल्या तीन वर्षांपासून चार गावांमध्ये ग्रामस्थांसाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येते. शिबिरामध्ये अकोला शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी, संदर्भीय उपचार, औषधे दिली जातात. दरवर्षी सुमारे पाच हजार ग्रामस्थ आरोग्य शिबिराचा लाभ घेतात.
  • स्पर्धा परीक्षेसाठी ग्रंथालयाची उभारणी

  • ग्रामीण भागातील तरुण-तरुणी वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत, यासाठी मोठा खर्च होतो. ही गरज ओळखून लोकजागरच्या सहकार्याने अकोट, हिवरखेड, तेल्हारा, दानापूर या गावांमध्ये स्पर्धा परीक्षेसाठी लागणाऱ्या पुस्तकांचे ग्रंथालय सुरू करण्यात आले. याशिवाय अकोट आणि तेल्हारा येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी मोफत अभ्यासिका सुरू झाली आहे. तरुणपिढी व्यसनांपासून दूर राहावी यासाठी संस्थेतर्फे विविध गावांत उपक्रम राबविण्यात येतात.
  • प्रयोगशील शेतकऱ्यांचा सन्मान

  • अकोला जिल्ह्यातील जे शेतकरी वर्षानुवर्षे चांगले उत्पादन घेत आहेत; परंतु त्यांची कुणी आजवर दखल घेतली नाही, अशा पंचवीस प्रयोगशील शेतकऱ्यांना एकत्र आणत संस्थेच्या पुढाकाराने एक जुलै रोजी खास सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.  
  • यासोबतच जलसंवर्धनाच्या कामात पुढाकार घेणाऱ्या जलमित्रांचा वैदर्भीय कलावंत भारत गणेशपुरे यांच्या उपस्थितीत सामूहिक सत्कार करण्यात आला.
  • शेतीपूरक उद्योग उभारणीचे काम 

  • लोकजागर मंचाने काळाची पावले ओळखत शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायाकडे वळविण्याचे कामही सुरू केले. शेतमालाची विक्री स्वतः शेतकऱ्यांनी करावी यासाठी मार्गदर्शन केले जाते. या भागातील महिलांचे एक मोठे संघटन केले जात आहे. आतापर्यंत २८०० महिलांची लोकजागरकडे नोंदणी झाली आहे. संस्थेच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये वीस महिला बचत गटांची सुरवात झाली आहे. ग्रामीण भागातील महिला गृहउद्योगात पारंगत असतात. त्यांना मार्केटिंगची जोड मिळणे गरजेचे असते. यासाठी महिला बचत गटांचा लोकजागर महिला गृह उद्योग समूह तयार करण्यात आला. गटातील महिला मशरुम पापड, कापडी पिशव्या, गुळपट्टी, मसालेनिर्मिती करतात.  
  • बेलखेड (ता. तेल्हारा) गावातील महिला गटाकडून तयार झालेल्या मशरूम पापडांची विक्री मुंबई शहरात करण्यात आली. या महिला गटांसाठी तेल्हारा येथे स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यात आले. उत्पादनांचा ‘लोकजागर’ हा ब्रँड तयार करण्यात आला. येत्या ८ मार्च रोजी महिला गटांनी उत्पादित केलेल्या वस्तू, खाद्यपदार्थांचे प्रदर्शन भरविण्याचे नियोजन संस्थेने केले आहे.
  • संपर्कः अनिल गावंडे, ९१६७८७३३९९

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com