मातीची धूप थांबविण्यासाठी जागरूक रहा : डाॅ. सय्यद इस्माईल

मातीची धूप थांबविण्यासाठी जागरूक रहा : डाॅ. सय्यद इस्माईल
मातीची धूप थांबविण्यासाठी जागरूक रहा : डाॅ. सय्यद इस्माईल

परभणी ः शेतीसाठी माती हा सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. विविध कारणांनी मातीची धूप होते. परिणामी, जमिनीची सुपीकता कमी होऊन उत्पादकता घटते. जैवविविधतेचा ऱ्हास होते. भविष्यात शेती व्यवसाय टिकविण्यासाठी मातीची धूप टाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी नेहमी जागरुक राहून उपाय योजना करणे गरजेचे आहे. मातीची धूप थांबविण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जाणीवजागृती केली जात आहे, अशी माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील मृदाविज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र विभाग प्रमुख डाॅ. सय्यद ईस्माइल यांनी दिली.

जागतिक मृदा दिनानिमित्त ‘अॅग्रोवन’शी बोलतांना डाॅ. ईस्माइल म्हणाले, की शेती व्यवसायातील मातीचे महत्त्व लक्षात घेऊन, माती निरोगी ठेवण्याच्या दृष्टीने धूप थांबविण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जाणीव जागृती व्हावी या उद्देशाने संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अन्न आणि कृषी संघटनेचे (एफएओ) या वर्षी स्टॉप सॅाइल इरोजन, सेव्ह अवर फ्यूचर (मातीची धूप थांबवा, आपले भविष्य वाचवा) ही थीम आहे. या अनुषंगाने विद्यापीठाच्या मृदाविज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र विभागातर्फे शेतकऱ्यांमध्ये मातीची धूप थांबविण्याच्या उपाय योजनांबाबत प्रबोधन केले जात आहे. 

डाॅ. ईस्माईल पुढे म्हणाले, की जमिनीवर दोन ते तीन सेंटिमीटर सुपीक मातीचा थर निर्मितीसाठी निसर्गाला जवळपास एक हजार वर्षांचा कालावधी लागतो. अतिवृष्टी, वादळी वारे, जंगल तोड, मशागतीच्या चुकीच्या पद्धती, स्थलांतरित शेती, अति चराई आदी कारणांनी मातीची धूप होते. आपल्या राज्यात दरवर्षी अब्जावधी टन मातीची धूप होते. धूप झाल्यामुळे सुपीकता कमी होते. उत्पादकता घटते. अन्नधान्य, चारा आदी शेतीमालाचा दर्जा खालावतो. जलधारण क्षमता कमी होते. पूर, भूस्सखलन यांचे प्रमाण वाढते. धूप होत असताना मातीचे कण रासायनिक घटकांसह मिसळल्यामुळे पिण्याचे पाणीसाठे दूषित होतात. हवामान बदलानुकलता राहत नाही. जैवविविधतेचा ऱ्हास होतो. गाळ जमा होऊन नद्यांची पात्रे अरुंद होतात. शेतातील बांधबंधिस्ती, उताराला आडवे बांध (कंटूर बंडिग), नाला बांध, नदीवर बंधारे, शेततळी आदी उपाययोजना केल्यामुळे मातीची धूप कमी होण्यास मदत होते. दरवर्षी नांगरटीसारख्या मशागतीच्या चुकीच्या पद्धती बंद कराव्यात. जोरदार पावसामुळे होणारी धूप टाळण्यासाठी शेतातील मोकळ्या जमिनीवर सीताफळ, रामफळ यासारख्या रुंद पानांच्या बहुवार्षिक फळपिकांची लागवड करावी, असे डॉ. ईस्माइल यांनी सांगितले.

पेरणीसाठी रुंद वरंबा सरी (बीबीएफ) पद्धतीचा अवलंब करावा. संवर्धित मशागतीवर भर द्यावा. त्यामुळे मातीची धूप कमी होऊन सुपीकता टिकून राहील. माती हेच शेतीसाठी सर्वात महत्त्वाचे भांडवल आहे. मातीची धूप थांबविण्यासाठी शेतकऱ्यांनी नेहमी जागरूक राहणे गरजेचे आहे. - डाॅ. सय्यद ईस्माइल, विभाग प्रमुख,  मृदाविज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र, वनामकृवि, परभणी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com