कलेढोणात अतिपावसामुळे द्राक्षबागांवर कुऱ्हाड

द्राक्षबागेवरील संकटातून वाचण्यासाठी बॅंकांचे कर्ज काढूनही खर्चाचा मेळ बसणार नाही. माझी दोन एकर बाग असून त्यातील एक एकर बाग केवळ औषधांच्या खर्चाचा बोजा न परवडणारा असल्यामुळे काढून टाकली आहे. शासनाने नुकसान भरपाईसाठी मदत द्यावी. त्यामुळे शेतकरी संकटातून सावरू शकेल. - हसन कुमठेकर, कलेढोण
द्राक्षबाग तोडली
द्राक्षबाग तोडली

कलेढोण, जि. सातारा : अतिपावसामुळे खटाव तालुक्यातील मायणी, कलेढोण, विखळे, म्हासुर्णे, कानकात्रेसह मायणी मंडळातील १८७ हेक्‍टर क्षेत्रावरील द्राक्षबागांचे नुकसान झाले. त्यात कलेढोणच्या १२५ हेक्‍टरवरील द्राक्षबागांचा समावेश आहे. द्राक्षबागेत साठलेल्या पाण्यामुळे घड जिरणे, घडकुज, डाऊन्या, भुरीमुळे १८७ हेक्‍टर क्षेत्रावरील द्राक्षबागांच्या उत्पादनात सुमारे २८ कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर बागांवर होणाऱ्या खर्चाचा मेळ बसत नसल्याने द्राक्ष बागायतदारांनी बागांवर कुऱ्हाड चालविण्यास सुरवात केली आहे.  खटाव तालुक्‍यातील कलेढोणसह, मायणी, निमसोड, विखळे, पाचवड, मुळीकवाडी, तरसवाडी, गारुडी, कानकात्रे, हिवरवाडी, अनफळे, गारळेवाडी, गुंडेवाडी आदी भागांतील द्राक्षे जिल्ह्याला परकीय चलन मिळवून देतात. यंदाच्या पावसामुळे मायणी मंडळात द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले. त्यात घडकुज, घड जिरणे, डाउन्या, भुरीचा प्रादुर्भाव झाल्याने युरोपला जाणाऱ्या मालाच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. ज्या निर्यातक्षम बागेतील झाडांवर ३५ ते ४० घड असतात, त्या झाडांवर पाच ते सातच घड आले आहेत. पावसामुळे अनेक बागा छाटणीविना उभ्या आहेत. तर काही द्राक्ष बागायतदारांनी बागा काढण्यास सुरवात केली आहे.  ज्या शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात विकतचे पाणी आणून बागांना दिले, त्याच बागेतून आता अतिपावसामुळे पाणी निघता निघेना. या पावसाने बाधित झालेल्या झाडांना वाचविण्यासाठी मारलेल्या औषधांचा खर्च न परवडणारा असल्याने कलेढोणच्या हसन कुमठेकर व धनंजय कारंडे यांनी बागांवर कुऱ्हाडी चालविल्या आहेत. तर अनेकांनी बागा छाटण्याचे काम हाती घेतले नाही.   द्राक्षबागेसाठी छाटणीपासून मालापर्यंत हेक्‍टरी सुमारे साडेसात ते आठ लाखांचा खर्च येतो. या मालास परदेशात ६० ते ६५ रुपये तर लोकलसाठी २५ ते ३० रुपये प्रतिकिलो असा दर मिळतो. या द्राक्षबागांचे सरासरी ५० रुपये दराने प्रतिहेक्‍टरी १५ लाखांच्या उत्पादनाप्रमाणे १८७ हेक्‍टरचे सुमारे २८ कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाजात दिसून येत आहे. नुकताच कृषी विभागाने मायणी, कलेढोण, विखळे, पडळ आदी ठिकाणच्या द्राक्षबागांचे पंचनामे करून तालुका प्रशासनास अहवाल सादर केला आहे.  शासनाच्या २०१५च्या शासन निर्णयानुसार फळबागेसाठी एकरी अठरा हजारांची नुकसानभरपाई करण्याची तरतूद आहे. मात्र, सद्य:परिस्थितीत या मदतीच्या रकमेत सुधारणा करून त्यात वाढ करण्याची गरज आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com