अॅझोलाः एक आरोग्यदायी पशुखाद्य

जनावरांचे दूध उत्पादन, प्रजनन, वाढ आणि आरोग्य या बाबींचा विचार करता पशुखाद्यामध्ये विविध पोषण घटकांचे संतुलित प्रमाण असणे आवश्यक आहे. यासाठी पशुखाद्य म्हणून ॲझोलाचा वापर फायदेशीर ठरतो.
azzola production
azzola production

 जनावरांचे दूध उत्पादन, प्रजनन, वाढ आणि आरोग्य या बाबींचा विचार करता पशुखाद्यामध्ये विविध पोषण घटकांचे संतुलित प्रमाण असणे आवश्यक आहे. यासाठी पशुखाद्य म्हणून ॲझोलाचा वापर फायदेशीर ठरतो. ॲझोला एक पाण्यावर तरंगणारी शेवाळवर्गीय वनस्पती आहे. गाय, म्हैस, शेळी, मेंढी, कोंबडी यांना सहजतेने पचणारे पोषक घटक यामध्ये असल्यामुळे पशू आहारात याचा समावेश करावा. ॲझोलामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे, अमिनो आम्ल यांसारखे पोषक घटक आहेत. अॅझोलाचे उत्पादन तंत्र अत्यंत सोपे, कमी खर्चाचे आणि फायदेशीर आहे. उत्पादनाचे तंत्र

  • उत्पादनासाठी सावलीची जागा निवडावी. कारण अति सूर्यप्रकाशामुळे व पाणी कमी झाल्यास अॅझोला वाळून जाण्याची शक्यता असते.
  • निवडलेली जमीन स्वच्छ करावी. जमिनीवर किंवा जमीन खणून चौकोनी किंवा आयाताकृती खड्डा तयार करावा. खड्डा अंदाजे एक फूट खोल असावा.
  • खड्ड्याची खालची बाजू समतल करून त्यामध्ये प्लॅस्टिक आच्छादन करावे. प्लॅस्टिकवर १५ ते २० किलो माती पसरावी.
  • शेण आणि पाणी एकास दोन प्रमाणात घेऊन स्लरी तयार करावी. ३० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट दहा लिटर पाण्यात मिसळावे. हे द्रावण पुन्हा स्लरीत चांगल्या तऱ्हेने मिसळावे.
  • स्लरी आणि सिंगल सुपर फॉस्फेटचे मिश्रण खड्ड्यातील मातीवर ओतावे. खड्ड्यातील मिश्रणाची पातळी १० ते १२ सेंमी. येईपर्यंत त्यात पाणी ओतावे.
  • एका २ मी. X २ मी. आकाराच्या खड्ड्यात अर्धा ते एक किलो शुद्ध अॅझोलाचे मदर कल्चर बीज पसरावे. अॅझोला बीज खड्ड्यात पसरून झाल्यावर लगेच त्यावर पाणी शिंपडावे.
  • साधारणपणे ७ ते १० दिवसांत अॅझोलाची वाढ होऊन संपूर्ण खड्डाभर पसरते. अॅझोलाची जोमाने वाढ होण्यासाठी पाच दिवसांच्या अंतराने २० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि अंदाजे एक किलो शेण अॅझोलाच्या खड्ड्यात मिसळावे. अॅझोलातील खनिजांची वाढ होण्यासाठी खड्ड्यात सूक्ष्म अन्नद्रव्य आठवड्यातून एकदा मिसळावे.
  • दर १० ते १२ दिवसांनी खड्ड्यातील ३० टक्के पाणी बदलावे. महिन्यातून एकदा खड्ड्यातील ४ ते ६ किलो माती नव्याने मिसळावी.
  • खड्ड्यातील पाण्याची पातळी सतत १० ते १२ सेंमीपर्यंत ठेवावी. पाण्याची पातळी कमी झाल्यास त्यात पाणी ओतावे.
  • अॅझोला आणि खड्डा सतत स्वच्छ ठेवावा. अन्यथा, अॅझोला खराब होण्याची शक्यता असते. दर सहा महिन्यांनी त्याच खड्ड्यात नवीन अॅझोला पसरावा.
  • साधारणपणे १० ते १५ दिवसांत संपूर्ण खड्डा अॅझोलाने भरून जातो. त्यानंतर काढणी करावी.
  • उत्पादनासाठी एक खड्डा तयार करण्याकरिता लागणारे प्लॅस्टिक, अॅझोला बीज, शेण, सिंगल सुपर फॉस्फेट आणि मजूर यांचा एकत्रित खर्च अंदाजे १५०० ते २००० रूपये येऊ शकतो.
  • काढणी

  • संपूर्ण खड्डा अॅझोलाने भरल्यानंतर दररोज ६०० ते ७०० ग्रॅम अॅझोला चाळणी किंवा ‍ट्रेच्या मदतीने काढावा. हा अॅझोला स्वच्छ पाण्याने धुवावा.
  •  सरासरी पोषक घटक-

    घटक प्रमाण (टक्के )
    प्रथिने २०.६
    कॅल्शिअम ११
    फॉस्फरस ६.१
    पोटॅशिअम १७.४
    सोडिअम
    शुष्क पदार्थ ६.७
    अमिनो आम्ल ७-१०
    तंतुमय पदार्थ १५
    लिग्नीन ११.४
    अॅश १५.९
    पिष्टमय पदार्थ ४.१

    फायदे

  • जनावरांचे वजन, रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
  • दूध उत्पादनात वाढ.
  • मांसल कोंबड्याचे वजन आणि अंडी उत्पादनात वाढ.
  • शेळी, मेंढीचे मांस, केसांची प्रत सुधारते.
  • उत्पादन झाल्यानंतर वाफ्यातील नत्र व खनिजयुक्त पाणी पिकांना देण्यासाठी उपयुक्त.
  • जनावरांच्या खाद्यामध्ये वापर

  • अॅझोला पहिल्यांदा खाऊ घालत असल्यास पहिले काही दिवस आंबोणात एकास एक या प्रमाणात मिसळून द्यावा. त्यानंतर आंबोणाशिवाय अॅझोला जनावरांना खाऊ घालावा.
  • अॅझोला वाळवून आंबवाणामध्ये मिसळून जनावरांना देता येतो.
  • दूध देणाऱ्या गाई, म्हशींना १ ते १.५ किलो अॅझोला आंबोणामध्ये एकास एक या प्रमाणात द्यावा. यामुळे दूध उत्पादन व दुधातील फॅट वाढण्यास मदत होते.
  • वासरांना वयाच्या ६ ते १८ व्या महिन्यापर्यंत संपूर्ण खाद्य मिश्रणाच्या १० टक्के अॅझोला खाऊ घालावा.
  • शेळ्या व मेंढ्यांना प्रति दिवस ३५० ते ४०० ग्रॅम अॅझोला खाद्यामध्ये द्यावा.
  • संपर्क - अपर्णा शेंडे, ९४२३०९२२५७ (कृषी महाविद्यालय, बारामती, जि. पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com