बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण; डॉ. कुकडे पद्मभूषण

बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण; डॉ. कुकडे पद्मभूषण
बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण; डॉ. कुकडे पद्मभूषण

नवी दिल्ली : ‘वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही,’ असे सांगून आयुष्यभर शिवचरित्र सांगण्याचे कार्य करणारे शिवशाहीर बा. मो. ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे यांना ‘पद्मविभूषण’ने सन्मानित करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात वैद्यकीय शिक्षण पोचविण्याचे प्रयत्न करणारे लातूरचे डॉ. अशोक लक्ष्मणराव कुकडे यांना ‘पद्मभूषण’ जाहीर झाला आहे. 

‘पद्मश्री’ विजेत्यांमध्ये अभिनेते मनोज वाजपेयी, गायक शंकर महादेवन, राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे माजी संचालक प्रा. वामन केंद्रे, डॉ. रवींद्र व स्मिता कोल्हे, डॉ. सुदाम काटे यांचा समावेश आहे. केंद्र सरकारने आज रात्री उशिरा ‘पद्म’ पुरस्काराची घोषणा केली. ११२ पुरस्कार विजेत्यांमध्ये चार ‘पद्मविभूषण’, १४ ‘पद्मभूषण’ व ९४ ‘पद्मश्री’ विजेत्यांचा समावेश आहे. ‘पद्म’ पुरस्कारांत यंदा विदेशी नागरिकांची लक्षणीय संख्या आहे. त्याचबरोबर राजकीय सत्तारूढ भाजप व आघाडीच्या नेत्यांची नावे मोठ्या संख्येने दिसत आहेत. 

खासदार हुकूमदेव नारायण यादव, सुखदेवसिंग ढिंढसा, ज्येष्ठ भाजप नेते करिया मुंडा, प्रदीप गोर्धन यांचा यात समावेश आहे. त्याचबरोबर गिर्यारोहक बचेंद्री पाल, ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर आदींनाही ‘पद्म’ सन्मान जाहीर झाला आहे. यंदाच्या विजेत्यांमध्ये २१ महिला व ११ विदेशी नागरिकांचाही समावेश आहे. ‘पद्म’ पुरस्कारांसाठी ऑनलाइन अर्ज मागविणे नरेंद्र मोदी सरकारने सुरू केले. त्यानंतर यंदा यासाठी विविध क्षेत्रातील तब्बल सुमारे ५० हजार लोकांनी विक्रमी अर्ज केले होते. चार ‘पद्मविभूषण’ पुरस्कार विजेत्यांमध्ये पुरंदरे यांच्याशिवाय पंडवानी ही आदिवासी गायनशैली जगभरात लोकप्रिय करणाऱ्या तीजनबाई, आफ्रिकेतील जिबूतीचे सामाजिक कार्यकर्ते इस्माईल ओमर गुलेह व वाणिज्य आणि व्यापार व पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी काम करणारे अनिलकुमार मणिभाई नाईक या तिघांचा समावेश आहे.

हा सन्मान जाहीर झाला, याचा मनापासून आनंद झाला आहे. शिवाजी महाराजांचे कार्यच एवढे उत्तुंग आहे, की त्याची कशाशी तुलना होऊ शकत नाही. महाराजांचे कार्य मला घराघरात पोचविता आले हे माझे भाग्य आहे. आतापर्यंत मी व्याख्यान देणे, लेख लिहिणे यात खूप काळ घालवला आहे. आता उर्वरित आयुष्यात जास्तीत जास्त संशोधन करावे, जी माहिती मी मिळवली आहे, ती माहिती जगापुढे, संशोधकांपुढे मांडावी, अशी अपेक्षा आहे. लहानपणापासून मी ‘सकाळ’ वाचत मोठा झालो. त्यामुळे माझ्या आजच्या आनंदात ‘सकाळ’चाही वाटा आहे.  - बाबासाहेब पुरंदरे, शिवशाहीर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com