‘सिट्रस नेट’ नोंदणीचा पहिला मान मोसंबीला

Citrus Net Registration First Honor Citrus limetta
Citrus Net Registration First Honor Citrus limetta

जालना : ‘‘सीट्रस नेट प्रणालीवर राज्यातून प्रथम बाग नोंदणीचा मान बदनापूर येथील मोसंबी संशोधन केंद्रास मिळाला. या बागेस युनिक क्रमांकदेखील मिळाला आहे,’’ अशी माहिती मोसंबी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. संजय पाटील यांनी दिली. 

राज्यात जवळपास ३३ हजार हेक्‍टरवर मोसंबीचे क्षेत्र विस्तारले आहे. मोसंबीचे उत्पादन ३.५५ लाख टन आहे. संत्र्याचे क्षेत्र १ लाख ७ हजार हेक्‍टर, तर उत्पादन ८.३४ लाख टन आहे. लिंबूचे क्षेत्र १ लाख ६७ हजार हेक्‍टर व उत्पादन १४.३१ लाख टन आहे.  

डॉ. पाटील म्हणाले, ‘‘राज्यातील बागांच्या ऑनलाइन नोंदणीमध्ये ‘हॉर्टनेट’ या संगणक प्रणालीवर आता ‘सिट्रस नेट’ या आणखी एका प्रणालीची भर पडली आहे. या प्रणालीवर पहिला नोंदणीचा मान वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत बदनापूर येथील मोसंबी संशोधन केंद्रास मिळाला. त्यामुळे मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, नांदेड, परभणी आदी जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना फळांच्या निर्यातीची संधी चालून आली आहे. या नोंदणीसाठी कुलगुरू डॉ. अशोक ढवण, संचालक संशोधन डॉ. डी. पी. वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढाकार घेतला.’’ 

‘‘द्राक्षाच्या निर्यातीसाठी ग्रेपनेट, डाळिंबासाठी अनारनेट, आंब्यासाठी मॅंगोनेट, भाजीपाल्याचे व्हेजनेट या ऑनलाइन प्रणाली विकसित केल्यानंतर भारताच्या या शेतीमालाच्या निर्यातीमधील टक्‍का वाढण्यास मदत झाली. द्राक्षबागांच्या नोंदी वाढून निर्यात वाढीस प्रोत्साहन मिळाले. मराठवाड्यात मोसंबी, लिंबू पिकाखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. शेतकऱ्यांना मार्केटिंगमध्ये पारांगत करून त्यांना शेतीमालाच्या निर्यातीमध्ये उतरविण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे. मोसंबी, संत्रा, लिंबाच्या ‘सिट्रस फूड्‍‌स’ वर ऑनलाइन नोंदणी करण्याची मोहीम १ डिसेंबरपासून सुरू झाली आहे,’’ असेही डॉ. पाटील यांनी सांगितले. 

डॉ. पाटील म्हणाले, ‘‘मराठवाड्यातील मोसंबी, लिंबाच्या निर्यातीला युरोपसह आखाती देशात निर्यातीची संधी उपलब्ध झाली आहे. शेतकऱ्यांनंतर सिट्रस नेटवर बागांच्या नोंदी केल्यानंतर आयातदार देशांना उर्वरित कीडनाशक अंशमुक्‍त शेतीमालाची हमी देण्यासाठी शास्त्रोक्‍त पद्धतीने उत्पादन घेण्याबाबत शेतकऱ्यांना कृषी विभाग व कृषी विद्यापीठाकडून मार्गदर्शन करण्यात येते. जागतिक बाजारातील अटी, शर्तीची पूर्तता करण्याच्या नोंदी, अहवाल फॉर्म, खते, औषधांच्या नोंदी, कीड व रोगांच्या नोंदी, त्याचबरोबर आयातदार देशांना कीड-रोगमुक्‍त शेतीमालाची हमी द्यावी लागते.’’

‘अपेडा’कडे नोंदणी करा शेतकऱ्यास युनिक क्रमांक आधार कार्डासारखा दिला जाणार आहे. तो आल्याशिवाय कोणत्याही देशात माल निर्यात करता येत नाही. त्यामुळे मराठवाड्यातील जास्तीत जास्त मोसंबी बागायतदारांनी बागेची नोंदणी अपेडाकडे करवी, असा सल्लाही डॉ. पाटील यांनी दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com