खानदेशात बाजरी पीक निसवणीत

बाजारी
बाजारी

जळगाव ः खानदेशात बाजरी पिकाची या हंगामात बऱ्यापैकी पेरणी झाली असून, पिकाची अवस्था चांगली असून, निसवणीच्या अवस्थेत आहे. शेतकरी सिंचनाच्या लगबगीत दिसून येत आहेत.  अनेक भागांत जानेवारीच्या अखेरीस पेरणी केलेल्या बाजरीत निसवण झालेली नाही. कमाल शेतकऱ्यांनी संकरित बाजरीची पेरणी केली आहे. लांब व जोमदार कणीस असून, उंचीही बऱ्यापैकी दिसत आहे. चारा चांगला मिळावा यासाठी उंच बाजरी पेरणीस यावल, चोपडा, पाचोरा भागांतील अनेक शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. सर्वाधिक सुमारे आठ हजार हेक्‍टरवर जळगाव जिल्ह्यात पेरणी झाली आहे. तर धुळे, नंदुरबारात मिळून सुमारे सहा हजार हेक्‍टरवर पेरणी झाली आहे.  जळगाव जिल्ह्यात जळगाव, चोपडा, पाचोरा, चाळीसगाव व यावल या भागांतील तापी, गिरणा नदीकाठी पेरणी झाली आहे. जामनेरातही वाघूर प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात बाजरीचे पीक आहे. मुक्ताईनगर, रावेरात कमी पेरणी आहे. धुळ्यात शिरपूर, शिंदखेडा भागांत पांझरा, तापीकाठी पेरणी झाली आहे. तर शहादा तालुक्‍यात शहादा, तळोदा व नवापूर तालुक्‍यांत कमी अधिक क्षेत्रात पेरणी झाली आहे. मका पिकाऐवजी अनेक शेतकऱ्यांनी बाजरीची पेरणी केल्याने या हंगामात क्षेत्र काहीसे वाढले आहे.  कणसावर आलेल्या बाजरी पिकात पक्ष्यांपासून संरक्षण करावे लागत आहे. त्यासाठी कर्मचाऱ्याची नियुक्ती अनेक शेतकऱ्यांना १०० रुपये प्रतिदिन, अशा मजुरी दरात करावी लागली आहे. महिनाभर राखण करावी लागणार आहे. तर काही शेतकऱ्यांनी दीड क्विंटल बाजरी देण्याच्या कबुलीवर कर्मचाऱ्याची नियुक्ती केली आहे.  तसेच रानडुकरांचाही उपद्रव जळगाव, चोपडा, चाळीसगाव भागात बाजरी पिकात सुरू आहे. यामुळे रात्रीच्या वेळेसही संबंधित शेतकऱ्याला शेतात जाऊन काही वेळ थांबावे लागते. सध्या दर २१०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत. खानदेशात दोंडाईचा (जि. धुळे), चोपडा, चाळीसगाव, अमळनेर, जामनेर व मुक्ताईनगर बाजार समिती बाजरीसाठी प्रसिद्ध आहे. कुठेही आवक अजून सुरू झालेली नसल्याची माहिती मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com