डॉ. पंजाबराव देशमुख यांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोचवा : बाळासाहेब थोरात

dr. pajabrao deshmukh
dr. pajabrao deshmukh

अमरावती : लोकशाहीच्या मूल्यांची जपणूक करण्यासाठी आजच्या तरूण पिढीपर्यंत भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांचे विचार पोहोचविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी (ता.२७) येथे केले.

श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२१ व्या जयंती उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान संस्थेच्या सहकार्याने डॉ. पंजाबराव देशमुख सायन्स इनोव्हेटिव अॅक्टिव्हिटी सेंटरचे उद्गाटन ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते यावेळी झाले. संशोधनाला चालना मिळण्यासाठी संस्थेच्या विस्तीर्ण परिसरात सुमारे अडीच कोटी खर्चून हे केंद्र उभारण्यात आले आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन राऊत, आमदार यशोमती ठाकूर, आमदार सुलभा खोडके, आमदार बळवंत वानखडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे, महापौर चेतन गावंडे, संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, उपाध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे, डॉ. रामचंद्र शेळके, गजानन पुंडकर, सचिव शेषराव खाडे, कोषाध्यक्ष दिलीप इंगोले आदी यावेळी उपस्थित होते.

महसूल मंत्री श्री. थोरात म्हणाले की, गत शतकातील सन १९०० ते १९५० हा कालखंड विविध अंगांनी घडलेला आहे. दोन महायुद्धे, कम्युनिस्ट क्रांती, महात्मा गांधींची चळवळ अशा अनेक महत्वपूर्ण घटना जगभरात याच कालखंडात झाल्या. याच कालखंडात अमरावतीच्या भूमीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख अशी महनीय व्यक्तिमत्वे घडली. आधुनिक व पुरोगामी समाजाची पायाभरणी त्यांनी केली. भाऊसाहेब हे घटना समितीचेही सदस्य होते. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक कार्यात त्यांचा सहभाग होता.

श्री. थोरात पुढे म्हणाले की, संविधानाच्या प्रास्ताविकेत लोकशाही मूल्यांचे सार आहे. संतांच्या विश्वव्यापी करूणेचे परिमाण या प्रास्ताविकेला लाभले आहे. लोकशाहीच्या या मूल्यांचे संरक्षण करणे ही आजच्या काळाची गरज आहे. त्यामुळे भाऊसाहेबांसारख्या आधुनिक व पुरोगामी समाजाची पायाभरणी करणा-या व्यक्तिमत्वाचे विचार तरूणांपर्यंत पोहोचविले पाहिजेत. भाऊसाहेबांनी शेतक-यांसाठी मोठे कार्य केले. त्यांच्या नेतृत्वात दिल्ली येथे झालेल्या जागतिक कृषी प्रदर्शनाला जगभरातून मान्यवर आले होते. त्यानिमित्त जगभरातील कृषी तंत्रज्ञान त्यांनी देशातील शेतकरी बांधवांपुढे आणले. या घटनेच्या गौरवार्थ श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या नियोजित उपक्रमाला शासन निश्चित सहकार्य करेल.  

सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. राऊत म्हणाले की, भाऊसाहेबांनी तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहोचवून सर्व समाजाच्या हितासाठी कार्य केले. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वांनीही एकदिलाने काम केले पाहिजे तरच भाऊसाहेबांचे स्वप्न पूर्ण होईल.

डॉ. काकोडकर म्हणाले की, भाऊसाहेबांचे शिक्षण व कृषी क्षेत्रातील कार्य अतुलनीय आहे. आजच्या काळात शिक्षणाच्या नव्या दिशा चोखाळण्याची गरज आहे. त्या दृष्टीने सायन्स इनोव्हेटिव अॅक्टिव्हिटी सेंटरची स्थापना महत्वपूर्ण ठरेल. विद्यार्थ्यांत आविष्कार व संशोधनाची वृत्ती निर्माण करण्यासाठी हे केंद्र योगदान देईल. भविष्यात प्रत्येक जिल्ह्यात असे केंद्र उभारण्याचा प्रयत्न करण्यात येतील.

संस्थेचे अध्यक्ष श्री. देशमुख म्हणाले की, महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजाला ज्ञान व प्रबोधनाची दिशा दाखवली, त्या दिशेने भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांनी वऱ्हाड प्रांतात कार्य केले. बहुजन समाजापर्यंत शिक्षण पोहोचविले. भारत कृषक समाजाची स्थापना केली. त्यांनी भरवलेल्या ऐतिहासिक कृषी प्रदर्शनाला ६० वर्षे झाल्यानिमित्त संस्थेतर्फे उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. भाऊसाहेबांच्या जन्मगावी पापळ येथे कृषी महाविद्यालय सुरू करण्याचा मानस असल्याचे ते म्हणाले. आमदार श्रीमती खोडके यांनीही मनोगत व्यक्त केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com