बांबूशेतीमध्ये शेतकऱ्यांचे अर्थकारण बदलण्याची ताकद : राजशेखर पाटील

बांबूशेतीमध्ये शेतकऱ्यांचे अर्थकारण बदलण्याची ताकद : राजशेखर पाटील
बांबूशेतीमध्ये शेतकऱ्यांचे अर्थकारण बदलण्याची ताकद : राजशेखर पाटील

सोलापूर : ‘‘बांबू हे गवतवर्गीय पीक आहे. त्यामुळे त्याचे व्यवस्थापन फारसे कष्टाचे वा जिकिरीचे नाही, कमी पाण्यात, कमी खर्चात अगदी कोणत्याही जमिनीच्या प्रकारात बांबू लागवड यशस्वी ठरू शकते. दुष्काळी भागाला ही शेती केवळ फायदेशीर नव्हे, तर शेतकऱ्यांचे अर्थकारण बदलवण्याची ताकद त्यात आहे, त्या दृष्टीने त्याचा विचार करावा,’’ असे आवाहन निपानी (ता. कळंब) येथील प्रगतशील बांबू उत्पादक शेतकरी राजशेखर पाटील यांनी केले.  कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या वतीने ‘बांबूची सधन लागवड'' या विषयावर श्री. पाटील यांच्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. आत्माचे प्रकल्प संचालक विजयकुमार बरबडे, कृषी उपसंचालक रवींद्र माने, माजी कृषी उपसंचालक पी. डी. पाटील, तालुका कृषी  अधिकारी श्रीधर जोशी आदी या वेळी उपस्थित होते. श्री. पाटील म्हणाले, की बांबूसाठी जमीन मध्यम-हलक्‍या प्रतीची, कोणतीही चालू शकते. पण जूनमध्ये बांबूची लागवड करावी, कधीही लागवड होऊ शकते, पावसाळ्यात योग्य वेळ असते. शक्‍यतो पाच बाय पाच फुटांवर लागवड करावी. सामान्यपणे १० बाय १० फूट, घनपद्धतीने ८ बाय ८ फूट आणि अतिघन पद्धतीत साडेचार बाय साडेचार फूट अंतर ठेवले तरी चालते. ड्रीपवर लागवड केल्यास दिवसातून एकवेळ अर्धातास पाणी आणि पाटाने पाणी द्यायचे असल्यास पंधरा दिवसांतून एकवेळ चालेल. लागवडीवेळी अर्धा किलो सिंगल सुपरफॉस्फेट आणि पाटीभर शेणखत, गावखत द्यावे. याशिवाय वाढीसाठी खते देऊ शकता, पण काही करावेच, याची आवश्‍यकता नाही. बांबू हे गवतवर्गीय पीक आहे, पण त्याला जनावरे खात नाहीत, त्याचा धोका राहिला नाही. शिवाय बांबूवर कोणत्याही प्रकारचा रोग पडत नाही, त्यामुळे औषध खर्चाचा विषय नाही. एका बांबूपासून कमीत कमी चार आणि सर्वाधिक २०० बांबूचे फुटवे अर्थात बांबू मिळतात. एका बांबूची किमान उंची ४० फूट आणि सर्वाधिक ९० फूटापर्यंत मिळते. एखाद्या वर्षी बांबूला पाणी मिळाले नाही, तर ते सुप्तावस्थेत  जाते, पण जळून जात नाही, त्याला पाणी दिल्यास तेच बांबूझाड पुन्हा जोमाने वाढू शकते. तीन वर्षात उत्पादन सुरु होते. देशभरात कागदासह सुमारे १८०० प्रकारासाठी बांबू वापरला जातो. त्यामुळे मार्केट मिळू शकते. साडेचार हजार रुपये टन बांबूचा दर आहे.''''ऊस किंवा अन्य पिकापेक्षा विशेषतः दुष्काळी भागासाठी हे पीक फायदेशीर ठरु शकते.  प्रास्ताविकात श्री. बरबडे म्हणाले, की पारंपरिक किंवा अधिक खर्चाच्या पिकांपेक्षा बांबू हा उत्तम पर्याय ठरू शकतो. शेतकऱ्यांनाही आर्थिकदृष्ट्या ही परवडणारी शेती होऊ शकते. नानीण्यपूर्ण शेती म्हणूनही याचा विचार करावा. लवकरच शेतकऱ्यांची शिवारफेरी पाटील यांच्या शेतावर नेण्यात येईल, असेही ते म्हणाले. कृषी उपसंचालक माने यांनीही बांबू लागवड सोलापूर जिल्ह्याला फायदेशीर ठरणारे पीक आहे. कमी पाणी, खर्चाचा विचार करता आर्थिकदृष्ट्याही ते खूपच उत्तम पीक आहे, असे सांगितले. या वेळी बांबू लागवडीच्या घडीपत्रिकेचे तसेच सेंद्रिय उत्पादनाच्या लोगोचे प्रकाशन करण्यात आले. तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक कल्पक चाटी यांनी सूत्रसंचालन केले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com