महाराष्ट्रात बांबू क्रांती घडावी ः केंद्रीय राज्यमंत्री रुपाला

महाराष्ट्रात बांबूमध्ये क्रांती घडून येथील शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा. या करिता या क्षेत्रात काम करीत असलेले शेतकरी नेते व राज्य कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी पुढाकार घ्यावा, असे मत केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी व्यक्त केले.
Bamboo revolution should take place in Maharashtra: Union Minister of State Rupala
Bamboo revolution should take place in Maharashtra: Union Minister of State Rupala

लातूर ः गुजरातमध्ये ज्या प्रमाणे दुधाची क्रांती होऊन शेतकरी आर्थिक समृद्ध झाला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात बांबूमध्ये क्रांती घडून येथील शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा. या करिता गेली काही वर्षे या क्षेत्रात काम करीत असलेले शेतकरी नेते व राज्य कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी पुढाकार घ्यावा, असे मत केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी (ता. ५) ‘बांबू शेती’ या विषयावर वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. इंडियन बांबू फोरमच्या वतीने आयोजित या वेबिनारमध्ये बीजिंग येथे मुख्यालय असणाऱ्या ‘इनबार’ या संस्थेचे इथिओपिया येथील प्रोजेक्ट मॅनेजर डॉ. सलीम रझा, डेहराडून येथील जेनेटिक्स अॅण्ड ट्री इंप्रूव्हमेंट फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटचे प्रमुख डॉ. अजय ठाकूर, सिंधुदुर्ग येथील कॉनबॅक या संस्थेचे निर्देशक संजीव करपे, मुंबई विश्‍व विद्यालयाचे माजी कुलपती डॉ. संजय देशमुख आणि पाशा पटेल हे सहभागी झाले होते.

बांबूला अर्थव्यवस्थेशी जोडण्याचा प्रयत्न बांबू मिशनच्या माध्यमातून केला जात आहे. याकरिता कायद्यात बदलही केला आहे. बांबूला कौशल्य विकासासोबत जोडण्याचा प्रयत्न आहे. बांबू लागवडीत आर्थिक फायदा आहे, हे शेतकऱ्यांना पटवून सांगण्याची गरज आहे. गुजरातमध्ये दुधाची क्रांती घडली. अशीच क्रांती महाराष्ट्रात बांबूमध्ये घडावी. याकरिता श्री. पटेल यांनी पुढाकार घ्यावा. केंद्र शासनाने बांबूलाही ॲग्रिकल्चर इन्फास्ट्रक्चर फंडमधून निधी देण्याचे जाहीर केले आहे. या निधीचा त्यांनी वापर करून घ्यावा, असे आवाहन श्री. रुपाला यांनी या वेळी केले.

जगभरात बांबूच्या ७६ प्रजाती व बाराशे उपजाती आहेत. यात भारत दुसऱ्या स्थानावर आहे. केवळ कागद उद्योगात १९ लाख टन बांबूचा वापर केला जात आहे. वर्षाला पाच कोटी २० लाख मनुष्य दिन रोजगार उपलब्ध करून देण्याची क्षमता बांबूच्या क्षेत्रात आहे, असे श्री. देशमुख म्हणाले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत बांबूमध्ये पाच लाख कोटीची उलाढाल आहे. भारतात वीस हजार कोटींचा बाजार आहे. कोरडवाहू तसेच नदी काठच्या जमिनीत बांबू चांगला येऊ शकतो. एकदा लावल्यानंतर ४० वर्षांपर्यंत ते पीक घेता येते, असे डॉ. ठाकूर म्हणाले. आज बांधकामक्षेत्रापासून ते ज्यूस करण्यापर्यंत बांबूचा वापर करता येत आहे. पूर्व आफ्रिकेमध्ये याचे मोठे काम सुरू आहे, असे श्री. रझा म्हणाले.

महाराष्ट्रात निश्‍चितच बांबू क्रांती घडवून आणू. त्याची सुरुवात मराठवाड्यातून करण्यात येईल. नदीकाठी वर्षाला वीस लाख बांबूच्या झाडांचे रोपण करण्याचा प्लॅन तयार आहे. यात विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्यासह आठही जिल्हाधिकारी पर्यावरण रक्षक म्हणून पुढे येणार आहेत. सध्या कोरोनामुळे अडचणी आहेत. - पाशा पटेल, माजी अध्यक्ष, राज्य कृषिमूल्य आयोग

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com