परळी थर्मलमध्ये इंधनासाठी बांबूचा वापर होणार 

परळी येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात दगडी कोळशाबरोबर इंधन म्हणून बायोमास ब्रिकेट, अर्थात बांबूच्या तुकड्यांचा वापर करण्यावर राज्य सरकारने शिक्कामोर्तब केले आहे.
Bamboo will be used for fuel in Parli Thermal
Bamboo will be used for fuel in Parli Thermal

लातूर ः परळी येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात दगडी कोळशाबरोबर इंधन म्हणून बायोमास ब्रिकेट, अर्थात बांबूच्या तुकड्यांचा वापर करण्यावर राज्य सरकारने शिक्कामोर्तब केले आहे. त्या अनुषंगाने या केंद्राच्या महानिर्मिती विभागातर्फे बांबू पुरवठ्यासाठी दोन दिवसांपूर्वी निविदा काढली आहे. गेल्या पाच वर्षांपासून इंधन म्हणून दगडी कोळशाला बांबू हा उत्तम पर्याय आहे, असे सांगत देशभर चळवळ उभी करणाऱ्या महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांच्या चळवळीला हे मोठे यश आले आहे.  देशात प्रदूषण ही मोठी डोकेदुखी बनलेली आहे. दगडी कोळशाचा वापर, पेट्रोल डिझेल हे घटक वाढत्या वायू प्रदूषणाला मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरत आहेत. त्यावर रामबाण उपाय म्हणून ग्लासगो येथे झालेल्या पर्यावरण परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन २०५० पर्यंत ५० टक्के कमी करण्याचा संकल्प जाहीर करत इंधन म्हणून वापरल्या जाणाऱ्या दगडी कोळशाला पर्याय म्हणून पर्यावरणपूरक बांबू आणि जैवभारावर आधारित इंधन विटांचा वापर करण्याचे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने केंद्र सरकारने प्रत्येक राज्यातील किमान एका औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात दहा टक्के जैवभारावर आधारित इंधन विटा अथवा बांबूचा वापर बंधनकारक असल्याबाबतचे परिपत्रक जारी केले. पंतप्रधान मोदी यांच्या या संकल्पनेला महाराष्ट्रात मूर्त रूप देण्यासाठी पाशा पटेल यांनी देशभर चळवळ हाती घेतली आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू ठेवला. १६ जुलै २०२१ रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन सादर करून औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात इंधन म्हणून बांबू अथवा जैवभार इंधन विटांचा वापर करण्याची विनंती केली होती. 

...अशा तयार होतात जैव इंधन विटा  शेतामधून धान्य, कडधान्य, फळे इत्यादी शेतीमालाची निर्मिती झाल्यानंतर जे कृषी अवशेष उरतात, त्यापासून या इंधन विटा तयार करता येतात. भाताचा पेंढा, गव्हाचे काड, उसाचे चिपाड, सोयाबीनचे कुटार, कपाशीच्या तुरीच्या तुराट्या, कपाशीच्या पऱ्हाट्या, झाडाझुडपांच्या छाटणीमधून तयार होणारा जैवभार वापरून यंत्राद्वारे इंधन विटा तयार करता येतात, ही बाब पाशा पटेल यांनी मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री पवार यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्याची गांभीर्याने दखल घेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी महानिर्मितीच्या औष्णिक विद्युत केंद्रात जैवभार अर्थात बांबूचा वापर करण्याच्या अनुषंगाने ऑगस्ट २०२१ मध्ये अभ्यास समिती गठित केली होती. इंधन म्हणून दगडी कोळशाऐवजी बांबूचा वापर पर्यावरणासाठी हितकारक ठरू शकतो, या समितीच्या प्रथमदर्शनी निष्कर्षावरून पुरेसा बांबू उपलब्ध होईपर्यंत इंधन म्हणून औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात दगडी कोळसाबरोबरच बांबूचा वापर करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून परळी येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्र आता दगडी कोळशाबरोबरच इंधन म्हणून बांबूचा वापरासाठी बांबूचे तुकडे पुरवठा करण्यासाठी निविदा काढण्यात आली. ही बाब पटेल यांच्या चळवळीचे मोठे यश मानले जात आहे. 

जालन्यात पहिला प्रयोग  चार दिवसांपूर्वी लातूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पाशा पटेल यांच्या संपर्क कार्यालयात बांबू लागवडीसंदर्भात बैठक घेऊन उद्योजकांना मार्गदर्शन करून बॉयलरमध्ये दगडी कोळशाऐवजी पर्यावरणपूरक बांबूचा वापर वाढवून मोदींच्या संकल्पनेला प्रतिसाद देण्याचे आवाहन केले होते. या बैठकीला जालन्यातील उद्योजकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. जालना येथील अनेक कंपन्यांनी इंधन म्हणून दगडी कोळशाऐवजी टप्प्याटप्प्याने बांबूचा वापर वाढवण्याची हमी दिली असून, काहींनी प्रायोगिक तत्त्वावर बॉयलरमध्ये बांबूचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे पुरेशा प्रमाणात बांबू उपलब्ध नसल्याने प्रायोगिक तत्त्वावर का होईना, महाराष्ट्रात जालना येथूनच खऱ्या अर्थाने सर्वप्रथम बांबू वापराच्या चळवळीची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे. 

प्रतिक्रिया 

मानव जात जिवंत ठेवायची असेल तर जमिनीच्या पोटातले अर्थात कोळसा, पेट्रोल डिझेल या घटकाचा वापर थांबवून त्याऐवजी जमिनीच्या पाठीवरील पर्यावरणपूरक बांबू अथवा कृषी निविष्ठा, धान्यापासून तयार करण्यात येणाऱ्या इंधन विटा आदी घटकाचा वापर करावा लागणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केलेला पत्रव्यवहार तसेच पाठपुराव्याची दखल घेत राज्य सरकारने परळीच्या थर्मलमध्ये इंधन म्हणून बांबूचा वापर करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बांबू लागवड चळवळ आणि दगडी कोळशाऐवजी बांबू वापरासंदर्भातील पर्यावरणपूरक चळवळीला हत्तीचे बळ मिळाले आहे. या चळवळीसाठी सहकार्याबद्दल केंद्रीय नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच केंद्र सरकारच्या परिपत्रकाची तातडीने अंमलबजावणी केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार. 

-पाशा पटेल, माजी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोग

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com