खानदेशात केळी पिकाचे अतिउष्णतेमुळे मोठे नुकसान

मागील सात ते आठ दिवसांपासून उष्णता वाढतच असून, दोन महिन्यांच्या कोवळ्या बागांसह निसवलेल्या, निसवणीच्या अवस्थेतील बागांनाही मोठा फटका बसला आहे. शासनाकडून नुकसानीसंबंधी भरपाई मिळावी. - संजय चौधरी, केळी उत्पादक, खेडी खुर्द, जि. जळगाव.
अतिउष्णतेमुळे केळी पिकाचे नुकसान
अतिउष्णतेमुळे केळी पिकाचे नुकसान

जळगाव : खानदेशात मागील आठवडाभर कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत राहिले असून, केळी पट्टा म्हणून ओळख असलेल्या रावेर, यावल, मुक्ताईगर, जामनेर (जि. जळगाव) आणि नंदुरबारमधील शहादा, अक्कलकुवा, तळोदा भागांत केळी पिकाचे अतिउष्णतेमुळे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. 

काही महसूल मंडळांमध्ये तर ४७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. याचा फटका दीड ते दोन महिन्यांचे केळी पीक व निसवणीच्या अवस्थेतील केळी बागांनाही बसला आहे. रावेर, यावल व मुक्ताईनगर भागांत कमाल केळी काढणीवर आहे. चोपडा, पाचोरा, जळगाव भागांत कांदेबाग केळीचे पीक सहा ते साडेसहा महिन्यांचे आहे. 

नंदुरबार जिल्ह्यातही केळी काढणीवर असून, शहादा, तळोदामधून निर्यातक्षम केळी उपलब्ध होत आहे. परंतु, अतिउष्णतेमुळे निसवलेल्या बागांमध्ये केळी घड झाडापासून वेगळे होऊन खाली कोसळत आहेत. उष्णवारा व उष्णतेमुळे केळी पक्व होत नसल्याची स्थिती आहे. रावेरातील खिर्डी, ऐनपूर, निंभोरा, केऱ्हाळे, कर्जोद, निरूळ, वाघोड, चिनावल, यावलमधील न्हावी, हंबर्डी, भालोद, म्हैसवाडी, राजोरा, बामणोद, पाडळसा भागातील केळीलाही मोठा फटका बसला आहे. पुरेसे पाणी उपलब्ध असलेल्या बागेतही उष्णतेमुळे २० ते २२ टक्के नुकसान झाले आहे. तर लहान केळी बागांमध्ये कोवळी पाने करपली आहेत. त्याची वाढ खुंटली आहे. 

शहादामधील सुलतानपूर, ब्राह्मणपुरी, खेडदिगर, आडगाव, तळोदामधील मोड, आमलाड, बोरद, प्रतापपूर, तळोदा भागांतील काढणीवरील केळीला फटका बसला आहे. अक्कलकुवामधील खापर व भागांतही केळी होरपळल्याची माहिती मिळाली.

सतत उष्णता वाढतच असल्याने पुरेसे सिंचन करूनही बागांना फटका बसल्याने जशी अतिवृष्टी, वादळी पावसातील नुकसानीसंबंधी भरपाई मिळते, तशी भरपाई अतिउष्णतेमुळे झालेल्या नुकसानीसाठी देखील मिळावी, अशी मागणी केली जात आहे. विमाधारक शेतकऱ्यांनाही अतिउष्णतेमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्याची प्रतीक्षा आहे. मध्यंतरी वादळ झाले, त्यासंबंधी पंचनामे करताना काही आर्थिक गैरप्रकार चोपडा तालुक्‍यात केल्याच्या तक्रारीदेखील आहेत.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com