जळगाव जिल्ह्यात केळीचे १०० कोटींवर नुकसान 

केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांना यंदा कुकुंबर मोझॅक विषाणू (सीएमव्ही) आणि अलीकडचा वादळी पावसामुळे १०० कोटींचा फटका बसला आहे.
banana damage
banana damage

जळगावः केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांना यंदा कुकुंबर मोझॅक विषाणू (सीएमव्ही) आणि अलीकडचा वादळी पावसामुळे १०० कोटींचा फटका बसला आहे. ‘सीएमव्ही’मुळे सुमारे १४ हजार हेक्टर क्षेत्रावरील लहान (जून, जुलैमध्ये लागवडीच्या बागा) केळी बागांचे नुकसान झाले. तर या आठवड्यातील वादळी पावसात काढणीवरील व लहान सुमारे दीड हजार हेक्टरवरील केळी बागांचे नुकसान झाले आहे. 

रावेर परिसरात ‘सीएमव्ही’चा मोठा प्रादुर्भाव झाला होता. त्यात एकट्या रावेरात ३० ते ३५ कोटी रुपयांचे नुकसान ‘सीएमव्ही’मुळे झाले आहे. जिल्ह्यात रावेरसह मुक्ताईनगर, चोपडा, जामनेर, पाचोरा, भडगाव, यावल या भागातही ‘सीएमव्ही’चा शिरकाव झाला होता. काही शेतकऱ्यांचे २० टक्के तर काही शेतकऱ्यांचे ५० टक्क्यांवरही नुकसान झाले. जामनेरातील गारखेडा तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या तीन हजार केळी रोपांमध्ये तब्बल १८ रोपे सीएमव्हीने १०० टक्के नुकसानग्रस्त झाले. ती उपटून फेकावी लागली. बागेत नांग्या भरणे व नव्याने रोपे खरेदीचा खर्च करावा लागला. वाघोदा (ता.रावेर) येथेही एका शेतकऱ्याच्या चार हजार केळी रोपांमध्ये तब्बल ३२०० रोपे सीएमव्हीमुळे पूर्णतः खराब झाली. ती उपटून फेकावी लागली. जिल्ह्यात सुमारे १४ हजार हेक्टर क्षेत्रावरील केळी बागांमध्ये सीएमव्हीमुळे मोठे नुकसान झाले आहे.  केळी लागवडीसाठी एकरी २५ ते ३० हजार रुपये खर्च येतो. यात मशागत, रोपे आदींचा मोठा खर्च असतो. हा खर्च वाया गेला आहे. ‘सीएमव्ही’मुळे सुमारे ७५ ते ८० कोटी रुपयांचे नुकसान जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सहन करावे लागले आहे. ‘सीएमव्ही’ आटोक्यात आणण्यासाठी शास्त्रज्ञ, खासगी संस्थांचे तज्ज्ञ यांनी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली. जिल्हाभर मोहीम राबविली. शेतकऱ्यांनीही प्रतिसाद देत विविध फवारण्या घेतल्या. रोगग्रस्त रोपांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावली. सध्या अनेक भागात सीएमव्हीला रोखणे शक्य झाले आहे. 

यातच पावसाचा धुमाकूळ या महिन्यात सुरूच आहे. गेल्या चार-पाच दिवसांत जिल्ह्यात रावेर, पाचोरा, भडगाव, यावल, मुक्ताईनगर आदी भागातील काढणीवरील केळी पिकाला वादळी पावसाने भुईसपाट केले आहे. एकट्या रावेर पश्‍चिम भागातील ३८ गावांमध्ये ११२५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. हे नुकसान शासकीय आकडेवारीनुसार दोन कोटी ५५ लाख रुपये एवढे झाल्याचा अहवाल आहे. गेल्या आठवड्यातील वादळी पावसाने केळी व इतर पिकांचे नुकसान झाले. 

रावेरातील कोचूर व लगत काढणीवरील केळीला फटका बसला. यावलमध्येही वादळाने काढणीवरील केळीचे नुकसान झाले आहे. तर पाचोऱ्यातील केळीचे आगार असलेल्या नगरदेवळा व इतर भागालाही वादळी पावसाने फटका बसला. यात जिल्ह्यात सुमारे ५०० हेक्टरवरील काढणीवर आलेल्या केळी पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. हे नुकसानही किमान आठ ते १० कोटी रुपये एवढे झाल्याचा अंदाज आहे.  प्रतिक्रिया ‘सीएमव्ही’ व वादळी पावसात पाचोरा व लगतच्या भागात केळीचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी मेटाकुटीस आले असून, तातडीने नुकसान भरपाई मिळावी, अशी अपेक्षा आहे.  - नाना पाटील , शेतकरी, पिंप्री खुर्द, (जि.जळगाव) 

‘सीएमव्ही’ रोग लहान किंवा दोन ते तीन महिन्यांच्या केळीसाठी मोठा नुकसानकारक ठरला आहे. त्याबाबत सर्व संस्था, शास्त्रज्ञांनी जनजागृती केली. हा रोग अलीकडे आटोक्यात आल्याचे दिसत आहे.  - महेश महाजन, शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, पाल (ता.रावेर, जि.जळगाव) 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com