खान्देशची केळी निर्यातीत आघाडी

Jalgao Banana export
Jalgao Banana export

केळीने जगात जळगावला मोठी ओळख दिली आहे. ही ओळख टिकवून वाढत्या केळी लागवडीमध्ये आखाती राष्ट्रांमधील केळीची बाजारपेठ कष्टी, जिद्दी शेतकऱ्यांनी मिळविली आहे. केळी निर्यातीमध्ये जळगाव जिल्ह्याने मागील तीन वर्षांत केलेली कामगिरी लक्षवेधी अशीच ठरली आहे. 

केळी लागवडीमध्ये जळगाव जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. परंतु, केळीची लागवड राज्यभर वाढत आहे. मागील १० वर्षांत केळीची लागवड २५ ते ३० हजार हेक्‍टरने वाढली आहे. अलीकडे ९५ हजार हेक्‍टवर राज्यात केळी लागवड होऊ लागली आहे. 

जळगाव जिल्ह्यात दरवर्षी ४५ ते ५० हजार हेक्‍टरवर केळीची लागवड केली जाते. याच वेळी केळीचे कमी उत्पादन घेणाऱ्या गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेशातही केळी घेतली जात आहे. देशात सर्वत्र केळीचे उत्पादन घेतले जात असल्याने जळगावच्या केळीचा उत्तरेकडील पंजाब, हरियाना, दिल्ली, काश्‍मिरातील दबदबा काहीसा कमी होऊ लागला. 

वाहतूक खर्च कमी पडत असल्याने गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशातून पंजाब, काश्‍मीरपर्यंत केळी पोचविण्याचे प्रमाण वाढले. गुजरातमधून पंजाब, दिल्लीपर्यंत ट्रकद्वारे केळी पोचविण्यासाठी महाराष्ट्राच्या तुलनेत २० ते २२ हजार रुपये कमी खर्च येतो. राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक भागात पश्‍चिम महाराष्ट्रातील केळीचा शिरकाव झाला. अशा स्थितीत केळीची नवीन बाजारपेठ मिळविण्याची गरज निर्माण झाली. 

अशात जळगावमधील केळी उत्पादक, जागतिक केळीतज्ज्ञ, काही कंपन्यांनी एकत्र येऊन केळी निर्यात कशी वाढेल? यासाठी प्रयत्न सुरू केले. सुरुवातीला २००३-०४ मध्ये महाबनाना या संस्थेने परदेशात केळी निर्यातीसाठी प्रयत्न केले. नंतर केळीची हाताळणी व इतर बाबींच्या अडचणीमुळे या प्रयत्नांना पुढे बळ मिळाले नाही. केळीच्या बाजारात सतत दबाव राहिल्याने उत्पादन परवडेनासे झाले. जळगाव, चोपडा भागात केळी फेकण्याची वेळ २०११-१२ व नंतरच्या काही वर्षांत आली. केळीचा दर्जा सुधारण्याचेही आव्हान परराज्यातील केळीच्या वाढीव उत्पादनामुळे समोर आले. 

अशात शेतकऱ्यांनी केळीचा दर्जा सुधारण्यासंबंधी पारंपरिक वाणांसह उतिसंवर्धित केळी उत्पादनाला सुरुवात केली. फर्टिगेशन, करपा निर्मूलन यावर भर दिला. एकट्या रावेरात सुमारे चार लाख केळी खोडांबाबत फ्रुटकेअर तंत्रज्ञानाचा अवलंब सुरू झाला. केळी लागवडीसंबंधीचे अंतर, गुणवत्तापूर्ण वाण, ड्रिपद्वारे फर्टिगेशन, पाण्याचा काटकसरीने वापर यावर काम केले. परिणामी, केळीचा दर्जा सुधारला. 

जळगावच्या केळीची चर्चा पुन्हा एकदा उत्तरेकडे सुरू झाली. याच वेळी जागतिक केळीतज्ज्ञ के. बी. पाटील यांचा पुढाकार व तांदलवाडी (ता. रावेर) येथील दर्जेदार केळी उत्पादक प्रेमानंद महाजन व प्रशांत महाजन यांच्या ४० मेट्रिक टन केळीची २०१६ मध्ये आखातात निर्यात झाली. निर्यातीच्या केळीला बाजारातील प्रचलित दरांच्या तुलनेत २०० रुपये क्विंटलमागे अधिक मिळाले. यानंतर केळी निर्यातीसंबंधी इराण व इतर भागांतील काही मोठे खरेदीदार, आयातदार यांच्याशी संपर्क वाढला. परिणामी २०१७ मध्ये केळी निर्यात आणखी वाढली. 

याच वर्षी अमेरिकेतील डोल व चिकिता या आघाडीच्या कंपन्यांचे प्रतिनिधीदेखील केळीखरेदीच्या संदर्भात जळगावात आले. या कंपन्यांनी दोन कंटेनर (एक कंटनेर २० मेट्रिक टन क्षमता) केळीची खरेदी करून तिची युरोपात निर्यातही केली. या कंपन्यांनी केळीखरेदीसंबंधी खानदेशात पुन्हा एकदा काम करण्याचे म्हटले आहे.

केळीची निर्यात वर्षागणिक वाढली आहे. सर्वाधिक निर्यात मार्च ते जून यादरम्यान केली जाते. या वेळेस केळीची मागणी राहते, दर अधिक मिळतात. यामुळे रावेर, यावल, मुक्ताईनगर या भागात केळी लागवडीसंबंधीचे वेळापत्रकही शेतकऱ्यांनी काहीसे बदलले आहे. केळीची मार्चपासून निर्यात सुरू होते. देशातील काही बड्या कंपन्या रावेर, यावल, चोपडा, मुक्ताईनगर या भागांत केळीची शिवार खरेदी करून निर्यातीचे काम करतात. 

निर्यातीसंबंधी सुसूत्रता, व्यवस्थितपणा यावा, यासाठी आंतरराष्ट्रीय किंवा आधुनिक प्रकारचे दोन पॅक हाउस जळगाव जिल्ह्यात साकारले आहेत. त्यात एक तांदलवाडी (ता. रावेर) येथे, तर दुसरा जळगावात एका कंपनीकडे आहे. आखातातील बहरीन, इराण, इराक, सौदी अरेबिया येथे केळीची मोठी निर्यात केली जाते. केळीचे दरही मागील तीन वर्षे टिकून आहेत. बाजाराअभावी केळी फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

केळीसाठी आखातातील बाजारपेठ शेतकऱ्यांच्या कष्टी, जिद्दीमुळे प्राप्त झाली आहे. जळगावमधून आखातातील केळी निर्यात अधिक होऊ लागली आहे. ती २०२० मध्ये एक हजार कंटेनरपर्यंत पोचू शकते. - प्रेमानंद महाजन, महाजन बनाना एक्‍सपोर्ट, तांदलवाडी (जि. जळगाव)

निर्यातीच्या केळीला मिळालेले सरासरी दर (प्रतिक्विंटल, रुपयात)
२०१७ ११००
२०१८ ११००
२०१९ १२००
जळगाव जिल्ह्यातील केळीची निर्यात (कंटेनरमध्ये, एक कंटेनर २० टन क्षमता)
२०१७ ११०
२०१८ ५००
२०१९ (जूनपर्यंत) - ८००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com