अकोला जिल्ह्यात केळी लागवडीत घट

केळी लागवड
केळी लागवड

अकोला ः वर्षभरापूर्वीच अकोला जिल्ह्यातील केळी निर्यात होत असल्याच्या बातम्या सर्वत्र झळकल्या होत्या. मात्र, आता याच जिल्ह्यात केळी पिकाला उतरती कळा लागली असून, या हंगामात अनेकांनी केळीऐवजी कापूस, सोयाबीन या पारंपरिक पिकांच्या लागवडीला पसंती दिली आहे. या पीक बदलामुळे केळीभोवती असलेले संपूर्ण अर्थकारण ढासळले आहे. टिश्यू कल्चर रोपे पुरविणाऱ्या अनेक मोठ्या कंपन्यांचे नियोजन त्यामुळे डळमळीत झाले. तर, या पिकाशी निगडित इतर व्यवसायांनाही मोठा फटका सहन करावा लागत आहे.  केळीचा बेल्ट म्हणून ओळख बनलेल्या अकोट व तेल्हारा तालुक्यांत नवीन लागवड क्षेत्रामध्ये कमालीची घट आली आहे. अकोट व तेल्हारा तालुक्यांत मागील काही वर्षांपासून केळी टिश्यू कल्चर रोपांच्या लागवडीमध्ये दरवर्षी उच्चांक गाठल्या जाऊ लागला होता. हंगामात किमान आठ ते दाख लाख रोपांची लागवड व्हायची. केळीला दरवर्षी मागणी वाढत होती. या भागातील केळी आखाती देशांमध्ये निर्यातही झाली. त्यामुळे असंख्य उत्पादकांनी निर्यातक्षम केळीचे पीक घेण्यासाठी नियोजन केले. याला शासनानेही पाठबळ दिल्याने उत्साही वातावरण बनले होते. नगदी तसेच जास्त उत्पन्न देणारे पीक म्हणून जिल्ह्यात पणज, बोचरा, रुईखेड, अकोली, पिंप्री, हिवरखेड या भागातील गावांमध्ये केळीचा पेरा वाढत होता, परंतु गेल्या वर्षात झालेल्या नैसर्गिक घडामोंडीचा मोठा परिणाम केळीला भोगावा लागला. त्याचे दूरगामी परिणाम झाले आहेत. आधी कडाक्याच्या थंडीने नुकसान केले. त्यानंतर तापमान वाढ, या भागातील पाणी कमी झाल्याने केळीच्या असंख्य बागा उभ्याच करपल्या होत्या.   वर्षभरापूर्वी लागवड झालेल्या बागांमधून उत्पादन यायला सुरवात व्हायची असतानाच मोठा आघात या शेतकऱ्यांवर आला. हे संकट झेपावणारे नसल्याने असंख्य शेतकऱ्यांनी केळीच्या बागा उपटून फेकल्या. आता लागवडीचा नवा हंगाम सुरू आहे. मात्र शेतकरी केळी लागवडीसाठी शेतकरी पुढे येण्यास यंदा तयार झालेले नाही. केळीचे टिश्यू कल्चर रोप, ठिबक सिंचन, खत व्यवस्थापन, कीड व्यवस्थापन, आंतरमशागत, मजुरी असा एका झाडाचा सर्व ६० ते ८० रुपयांपर्यंत लागतो. त्यानंतरही उत्पादन न आल्यास हा फटका बसतो. केळीची लागवड करण्याऐवजी शेतकरी हंगामी पिकांकडे वळाले आहेत.  केळीभोवतीचे अर्थकारण डळमळीत केळी या पिकाची लागवड कमी होणे अनेकांसाठी धक्कादायक व नुकसानकारक बनले. टिश्यू कल्चर रोपे पुरविणाऱ्या कंपन्या या वर्षी रोपे देण्यासाठी शेतकऱ्यांशी संपर्क करीत आहेत. यापूर्वी शेतकऱ्यांना रोपांची आगाऊ नोंदणी व पैसे देऊनही दोन-दोन महिने ऑर्डर दिली जात नव्हती. यंदा त्याच्या विपरीत परिस्थिती आहे. रोपे तयार आहेत. मात्र, खरेदीदार नाहीत, अशी स्थिती आहे. कंपन्यांनी तयार केलेल्या रोपांचे काय करायचे, हा पेच आहे. यासोबतच केळीसाठी लागणारी खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये, कीडनाशके, सिंचनाची साधने पुरविणाऱ्या व्यवसायावरही परिणाम दिसू लागला. या भागात केळीचे खरेदीदार, वाहने, त्यावर काम करणारे मजूर वाढले होते. त्यांच्याही रोजगाराचा प्रश्न येत्या काळात भेडसावणार आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com