जळगाव ः खानदेशात चांगल्या दर्जाच्या केळीला रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर चांगला उठाव
अॅग्रो विशेष
नवती केळीचे दर १३५० रुपये प्रतिक्विंटल
खानदेशात नवती केळीचे दर वधारून कमाल १३५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. दरात सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
जळगाव ः खानदेशात नवती केळीचे दर वधारून कमाल १३५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. दरात सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कारण दिल्ली येथील आंदोलनापासून केळी दरांवर सतत दबाव होता.
केळीची मागणी उत्तरेकडील भागात वाढली आहे. मागणी वाढल्याने दरात सुधारणा झाली आहे. शिवाय सध्या केळीची आवक रखडत सुरू आहे. किमान दर ८०० रुपये प्रतिक्विंटलवर स्थिर आहेत. केळीची पाठवणूक उत्तरेकडील पंजाब, काश्मीर, दिल्ली, उत्तर प्रदेशातील बाजारात सुरू झाली आहे. तसेच केळी निर्यातीलादेखील वेग येत आहे. खानदेशात नंदुरबारमधील शहादा, जळगाव जिल्ह्यातील रावेर, मुक्ताईनगर, चोपडा, यावल भागांत केळी परदेशात निर्यातीसंबंधी विविध कंपन्यांनी खरेदी सुरू केली आहे. दोन कंपन्यांचे काम वेगात सुरू आहे. सध्या १३० ट्रक (एक ट्रक १५ टन क्षमता) केळीची आवक बाजारात सुरू आहे.
बाजारात गेल्या वर्षाएवढीच आवक सुरू आहे. परंतु मागणी बऱ्यापैकी असल्याने दरात चांगली सुधारणा झाली आहे. दर्जेदार केळीला किंवा निर्यातक्षम केळीला १३५० रुपये प्रतिक्विंटलचा दर सोमवारी (ता.१) नंदुरबारमधील तळोदा, शहादासह जळगाव जिल्ह्यात मिळाला. दर मध्यंतरी दिल्ली येथील शेतकरी आंदोलनासह केळीचा दर्जा विषम वातावरणामुळे घसरल्याने कमी झाले होते. किमान दर ४०० रुपये प्रतिक्विंटल एवढे होते. तसेच अनेक भागांत खरेदी थांबविण्यात आली होती. परंतु सध्या खरेदीलाही वेग आला आहे. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील बाजार समितीमध्येदेखील केळी दरात सुधारणा झाली असून, तेथूनही उत्तर भारतात केळीची पाठवणूक सुरू झाली आहे.
बॉक्समध्ये पॅकिंग
दर्जेदार केळी बॉक्समध्ये पॅकिंग केली जात आहे. शेतातच ही कार्यवाही करून केळी ट्रकमधून उत्तर भारतासह इतर क्षेत्रात पाठविली जाते. जळगाव जिल्ह्यात चोपडा, जळगाव, पाचोरा भागात कांदेबाग केळीची काढणी मागील महिन्याच्या मध्यातच संपली आहे. यामुळे चोपडा, जळगाव भागात केळीची उपलब्धता कमी आहे. सध्या रावेर, मुक्ताईनगर भागांत पिलबाग व नवती केळीमध्ये काढणी सुरू आहे, अशी माहिती मिळाली.
- 1 of 691
- ››