केळीदराचे अधिकार रावेर बाजार समितीकडेच एकवटलेले

मला मध्यंतरी ४०० रुपये क्विंटलने केळीची विक्री करावी लागली. दर यापेक्षा अधिक जाहीर झाले होते. पण केळीची खरेदी ही विखुरल्या स्वरूपात गावोगावी होते. लिलाव पद्घत नजीकच्या बऱ्हाणपुरात (मध्य प्रदेश) आहे. पण आपल्याकडे लिलावच होत नाही. केळी व्यवसाय एका समूहाकडे एकवटलेला दिसतो. त्यावर कुणाचेही नियंत्रण दिसत नाही. बाजार समित्या दरांची अंमलबजावणीचे काहीएक करीत नाहीत. - विकास महाजन, केळी उत्पादक, ऐनपूर, ता. रावेर, जि. जळगाव
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

जळगाव   ः जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये अपवाद वगळता केळीची खरेदी किंवा लिलाव होत नाहीत. तरीही केळीचे दर बाजार समित्या जाहीर करतात. जिल्हाभरात सर्वत्र कमी अधिक क्षेत्रावर केळी लागवड केली जाते. पण एकट्या रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीलाच दर जाहीर करण्याचे अधिकार आहेत. रावेर येथे कांदेबाग केळीची (ऑक्‍टोबरमधील लागवड) फारशी लागवड होत नाही तरी रावेर बाजार समिती कांदेबाग केळीचे दरही जाहीर करते. हा प्रकार एकाधिकारशाही आणि अनागोंदीला निमंत्रण देणारा ठरत असल्याचा मुद्दा समोर आला आहे.

रावेर येथे सर्वाधिक केळी लागवड केली जाते म्हणून रावेर बाजार समिती जिल्हाभरातील केळी दर रोज जाहीर करते. मोजक्‍याच शेतकऱ्यांना या दरांची माहिती एसएमएसद्वारे जाते. जे दर रोज जाहीर होतात, ते जास्तीत जास्त केळी उत्पादकांपर्यंत पोचविण्याची व्यवस्था, यंत्रणा बाजार समितीकडे नाही. या दरांसाठी एक समिती बाजार समितीत आहे. या समितीची रोज बैठक होते. बाजारातील स्थितीचा आढावा घेतला जातो. मग दर जाहीर होतात.

नवती, कांदेबाग, पिलबाग, वापसी केळीचे दर ही बाजार समिती जाहीर करते. रावेर येथे अपवाद वगळता कांदेबाग केळी नसते, तरी हीच बाजार समिती कांदेबाग केळीचे दरही जाहीर करते. कांदेबाग केळी चोपडा व जळगाव तालुक्‍यात अधिक असते. पण जळगाव व चोपडा येथील बाजार समित्यांना आपले स्वतंत्र दर जाहीर करण्याचे अधिकार नाहीत. रावेर बाजार समिती कांदेबाग केळीचे दर कसे जाहीर करते. तेथे कांदेबागच नाहीत, असा मुद्दा जळगाव बाजार समितीने मध्यंतरी रेटला.

चोपडा बाजार समितीने २०१६ मध्ये यासंदर्भात स्वतंत्र बैठक घेऊन कांदेबाग केळीचे दर जाहीर करू व त्याच्या अंमलबजावणीसाठी पथके नियुक्त केले जातील, असा निर्णय घेतला होता. अर्ली कांदेबाग केळीची कापणी ऑगस्टमध्ये सुरू होते. परंतु कांदेबागांचे स्वतंत्र दर सप्टेंबरमध्ये जाहीर करायला सुरवात होते. कांदेबाग केळीचे स्वतंत्र दर जाहीर होत नाहीत म्हणून नवतीच्या दरांमध्ये कांदेबाग केळीची विक्री शेतकऱ्यांना करावी लागते.

जे दर जाहीर होतात, त्यांची अंमलबजावणी कुठेही १०० टक्के होत नाही. व्यापारी कमी दर्जाची केळी, अधिक पक्व केळी असे मुद्दे सांगून केळी उत्पादकांची कोंडी करतात आणि तडजोड करून खरेदी करतात. हा प्रकार राजरोज सुरू आहे. पण रावेर, चोपडा, जळगाव बाजार समितीने दरांच्या अंमलबजावणीसाठी कुठेही स्वतंत्र यंत्रणा उभी केलेली नाही.

जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये जुनारी बागा किंवा कापणी अंतिम टप्प्यात असलेल्या केळी बागांमधील केळीची किरकोळ आवक होते. ९८ टक्के केळी खरेदीचे व्यवहार खेडी खरेदी पद्धतीने होतात. उन्हाळ्यात तर अनेक बाजार समित्यांमध्ये आवकच होत नाही. बाजार समितीत या केळीला ४०० ते ५०० रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिक दर कधीही मिळत नाही.

अर्थातच केळी खरेदीची सक्षम व्यवस्था बाजार समित्यांमध्ये नाही. कुठल्याही बाजार समितीने शीतगृह, केळी उत्पादकांच्या भागात उत्तम शेतरस्ते यासंबंधी कार्यवाही केलेली नाही. मध्यंतरी तशी घोषणा केली होती. पण ती घोषणा हवेतच आहे. केळीसाठी बाजार समितीचे ठोस काम नाही, मग बाजार समिती दर जाहीर करते कशी, असा मुद्दा शेतकरी खेडी खुर्द, जि. जळगाव येथील शेतकरी संजय चौधरी यांनी उपस्थित केला आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com